लिंबूवर्गीय फळबागेतील अांबिया बहर

लिंबूवर्गीय फळबागेतील अांबिया बहर

लिंबूवर्गीय फळबागेमध्ये आंबिया बहरातील खत, सिंचनाचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. या काळात फळगळचे प्रमाण वाढते. फळ नियंत्रणात ठेवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

लिंबूवर्गीय झाडावर आंबिया बहर 
जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येतात. उन्हाळ्यात झाडाचे चांगले सिंचन व व्यवस्थापन केलेले असेल. जून महिन्यामध्ये पावसाळ्याची सुरवात होते. अधिक पावसाच्या स्थितीमध्ये जून ते सप्टेंबर या काळात दिलेली खते वाहून जातात. परिणामी झाडांना फळाच्या वाढीसाठी आवश्यकतेवढी पोषक द्रव्ये उपलब्ध होत नाहीत. अधिक पावसामुळे जमिनीमध्ये पाणी साचून राहिल्याने फळगळचे प्रमाण वाढते. परिणामी आंबिया बहरापासून फारसे उत्पादन शेतकऱ्यांना मिळत नसल्याचे चित्र आहे. हे टाळण्यासाठी आंबिया बहरामध्ये बागेची काळजी योग्य प्रकारे घेतली पाहिजे. 

आंबिया फळाचे व्यवस्थापन 
एक आठवड्यापेक्षा अधिक काळ पावसामध्ये उघडीप मिळाल्यास आंबिया बहराच्या फळांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी १.५ किलो पोटॅशिअम 
नायट्रेट अधिक २, ४-डी १.५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.

आंबिया बहरचे फळगळ कमी करण्याकरिता, १.५ ग्रॅम २, ४-डी किंवा जिबरेलीक आम्ल अधिक १०० ग्रॅम कार्बेन्डाझिम (५० डब्ल्यू.पी.) अधिक १ किलो युरिया प्रति १०० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी. या द्रावणाची पुढील फवारणी १५ दिवसांनी पुन्हा करावी.

अधिक पावसाची स्थिती असल्यास, पावसाचे पाणी बागेतून बाहेर काढण्यासाठी उताराच्या आडव्या दिशेने व प्रत्येकी दोन ओळीनंतर ३० सें.मी. खोल, ३० सें.मी. खालील रुंदी व ४५ सें.मी. वरील रुंदी असलेले चर खोदावेत. झाडाच्या आळ्यातील जमीन सपाट करून घ्यावी म्हणजे त्यात पाणी साचून राहणार नाही.  

नवीन बागेत आंतरपिके घ्यावयाची असल्यास भुईमूग, उडीद, मूग, सोयाबीन पिके घ्यावीत. 

हिरवळीच्या खताकरिता धैंचाचे बी ४० किलो प्रतिहेक्टर याप्रमाणे 
पेरावे.

जुलै महिन्यामध्ये आंबिया बहराची फळगळ कमी करण्याकरिता १५ दिवसांच्या अंतराने वरीलप्रमाणे दोन फवारण्या कराव्यात. 

फळांसाठी १८० ग्रॅम म्युरेट आॅफ पोटॅश प्रतिझाड याप्रमाणे मातीत ओलावा असताना द्यावे.

या कालात संत्रा बागेमध्ये सिट्रस सायला किंवा पाने पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. 

त्यांच्या नियंत्रणासाठी, (फवारणी प्रमाण प्रतिलिटर पाणी) 
क्विनालफाॅस २ मि.ली. किंवा इमिडाक्लोपिड अर्धा मि.ली. किंवा डायमेथोएट १.५ मि.ली. आवश्यकता भासल्यास वरीलपैकी न वापरलेल्या कोणत्याही एका कीटकनाशकाची फवारणी १५ दिवसांच्या अंतराने करावी. 

झाडातून पानसोट काढून टाकावे. पानसोट त्रिकोणी आकाराचे, अधिक गडद हिरवे आणि सरळ लांब वाढते. पाणसोटवर मोठे आकाराची पाने येतात. 

संत्रा झाडास ४५० ग्रॅम युरिया किंवा १००० ग्रॅम अमोनियम सल्फेट, ६५० ग्रॅम सिंगल सुपर फाॅस्फेट, १०० ग्रॅम झिंक सल्फेट, १०० ग्रॅम फेरस सल्फेट आणि १०० ग्रॅम मॅंगनिज सल्फेट घ्यावे. 

खतांचे व्यवस्थापन
लिंबूवर्गीय फळांच्या कमी उत्पादनाचे जमिनीत अन्नद्रव्याची कमतरता हे प्रमुख कारण आहे. विदर्भातील ५२ टक्के संत्रा बागांमध्ये नत्राची, ३० टक्के बागांत स्फुरदाची, ३५ टक्के बागांत लोह व मॅंगनीजची आणि ७३ टक्के बागांमध्ये जस्ताची कमतरता असल्याचे विविध सर्वेक्षणांत आढळून आले आहे.

फळाचे कमी उत्पादन आणि बागांचे आयुर्मान कमी होण्यामागे शिफारशीनुसार खताचा वापर न करणे तसेच झाडांद्वारे अन्नद्रव्याचे अधिक प्रमाणात शोषण होणे, ही दोन प्रमुख कारणे आहेत.

लिंबूवर्गीय फळवाढीच्या अवस्थांमध्ये वेगवेगळया अन्नद्रव्यांची आवश्‍यकता असते. त्यानुसार वेगवेगळया खतांच्या निर्धारित मात्रांचा योग्य वेळी वापर करणे आवश्यक असते. फळधारणेपूर्वी खतांची ५० टक्के मात्रा देणे लाभकारक असल्याचे प्रयोगात सिद्ध झाले आहे.

खते कशासाठी द्यावीत?
अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी आढळल्यास त्यांची भरपाई करून बागेचे उत्पादन वाढवू शकतो.

मातीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण राखण्यासाठी व बागेपासून चांगले उत्पादन मिळण्यासाठी अन्नद्रव्यांचा योग्य प्रमाणात पुरवठा आवश्यक आहे.
झाडांची उत्पादन क्षमता टिकून ठेवण्यासाठी मातीतून शोषून घेतलेल्या अन्नद्रव्यांचा खताद्वारे समतोल पुरवठा राखणे आवश्यक आहे.

खते देण्याची पद्धत 
बांगडी पद्धत : २० सें.मी. रुंद व ३० सें.मी. खोल अशी नाली झाडाभोवती बाहेरील घेरामध्ये घेतात. 

चौकोनी पद्धत : २० सें.मी. रुंद व ३० सं.मी. खोल नाली झाडाभोवती चारही बाजूला.

खड्डा पद्धत : ४-५ खड्डे १५-२० सें.मी. रुंद व ३० सें.मी. खोल झाडाभोवती बाहेरील घेरात.

पालाश खताचा प्रभाव 
पालाश खतांमुळे फळात अधिक प्रमाणात आंबटपणा तयार होतो. परिणामी फळे परिपक्व होण्यास जास्त कालावधी लागतो. पालाश खतांच्या मात्रांमध्ये बदल करून फळे परिपक्व होण्याचा कालावधी कमी जास्त करता येतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com