दुर्दम्य इच्छाशक्तीतून शेती  घडविलेला हिंमतबहाद्दर एलजी 

रमेश चिल्ले
बुधवार, 7 जून 2017

लातूर जिल्ह्यात आनंदवाड (गौर) येथील एलजी चामे या ३२ वर्षीय हिंमतबहाद्दर तरुणाने गारपीट, दुष्काळ तसेच विविध संकटांचा धैर्याने सामना केला. अखंड कष्ट करीत दुर्दम्य इच्छाशक्तीतून १८ एकरांत विविध प्रयोग केले. केसर आंब्याचे सेंद्रिय उत्पादन घेऊन न थांबता कुशल मार्केटिंगद्वारे ग्राहकांना थेट विक्रीही केली. या तरुणाची सकारात्मकता सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

लातूर जिल्ह्यात आनंदवाड (गौर) येथील एलजी चामे या ३२ वर्षीय हिंमतबहाद्दर तरुणाने गारपीट, दुष्काळ तसेच विविध संकटांचा धैर्याने सामना केला. अखंड कष्ट करीत दुर्दम्य इच्छाशक्तीतून १८ एकरांत विविध प्रयोग केले. केसर आंब्याचे सेंद्रिय उत्पादन घेऊन न थांबता कुशल मार्केटिंगद्वारे ग्राहकांना थेट विक्रीही केली. या तरुणाची सकारात्मकता सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील आनंदवाड (गौर) येथील एलजी बालाजी चामे हा ३२ वर्षीय तरुण भाऊ विक्रमसह घरची १८ एकर शेती पाहतो. जिथे साधे कुसळ गवत उगवत नव्हते अन् कवडीचेही उत्पन्न मिळत नव्हते. तिथे कृषी अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने २००८ मध्ये पाच एकरांत केसर आंबा लावण्याचे धाडस त्याने केले. त्याच्या आजोबांना परिसरातील लोक एलजी पाटील म्हणून ओळखत. पुढे नातवाचेही एलजी बालाजी चामे असेच नाव रूढ झाले. 

 एलजी झाले शेतीचा कणा 
वडील बालाजी भोळ्या स्वभावाचे. पारंपरिक शेती कसत. वाट्याला आलेली १८ एकर शेती दोन ठिकाणी विभागलेली. वडिलांना एकट्याने कसणे होत नसल्याने दूरची शेती पडीक पडलेली. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी ते लाइटच्या पोलवरून शॉक लागून खाली पडले. त्यातून हृदयविकाराचा झटका आला. मोठा एलजी तेव्हा मॅट्रिकमध्ये शिकत होता. दवाखान्याचा त्या वेळचा खर्च एक लाख आलेला. सगळे पैसे सावकाराकडून व्याजी घेतलेले. शेतातून दररोज चूल पेटणं मुश्कील तिथे बचत कुठली असणार? वडील वर्षभर दवाखान्यात. शारीरिकदृष्ट्या अधू झालेले. तेव्हा एलजीलाच शिक्षण अर्धवट सोडून शेतीचा कणा व्हावा लागला. अंगावर जबाबदारी पडल्याने लहान वयात बरीच समज आली. पुढे लहान भाऊ बारावी करून मदतीला आला. 

शेतीचा विकास 
शेतात विहीर खोदली. सहा बोअर घेतले. एकालाही पाणी लागले नाही. मागील वर्षी थोडे पाणी उपलब्ध झाले. त्याच शेतात आंब्याची पाच एकरांत लागवड केलेली. विहिरीचा आधार झाला. भाजीपाला, हंगामी पिके उत्पादन देऊ लागली. सेंद्रिय पद्धतीची जोड दिली. उत्पादन खर्च कमी होऊ लागला. 

बहिणीचे लग्न थाटामाटात 
सेंद्रिय शेतीची जोड दिल्याने हलक्या कोरडवाहू रानात तीळ, मूग, भुईमूग, सूर्यफूल, सोयाबीन ही पिके चांगले उत्पादन देऊ लागली. त्याच उत्पन्नातून लहान्या बहिणीचे चांगल्या घरी मानपानासह लग्न लावून दिले. त्यासाठीचा मोठा खर्चही सहज करता आला, हे एलजी अभिमानाने सांगतो.

आंबा बागेतही सेंद्रिय वा नैसर्गिक पद्धतीचा वापर सुरू केला. आज दहा वर्षे झाली त्या बागेत रासायनिक निविष्ठांचा कणही वापरला नाही, असे एलजी सांगतात. दशपर्णी अर्क, गांडूळ खत, जिवामृत स्लरीचा वापर केल्यामुळे झाडांची सशक्त वाढ झाली. आंबा बागेच्या सहाव्या वर्षी पाच एकरांत अडीच टन उत्पादन मिळाले. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. बऱ्याच जणांना आंब्याची मोफत चव चाखायला दिली. त्यापुढील वर्षात गारपीट झाल्यानं फळे हाती लागली नाहीत. तर त्यानंतरच्या दोन वर्षांत पडलेल्या भीषण दुष्काळामुळे केवळ झाडे जगविण्यासाठी चामे कुटुंची मोठी दमछाक झाली. दुष्काळात पाण्यासाठी तीव्र संघर्ष केला.

यंदाचे उत्पादन आश्वासक 
मागील हंगामात मात्र चांगला पाऊस झाला. पाच एकरांतून सुमारे पाच ते साडेपाच टन उत्पादन यंदा हाती लागले. सुरवातीला पाच क्विंटल आंबा मार्केटला नेला. तिथे हमाली, अडत मिळून पंधरा टक्के पैसे काटले. सर्व कटोतीचा हिशेब केल्यानंतर पन्नास हजार रुपये केवळ अडत्याला जाईल असे लक्षात आले. लातुरातील मेहुण्यांनी थेट विक्रीचा सल्ला दिला.

मार्केटिंग 
मग एलजींनी काही पोस्टर्स बनवून घेत लातूर शहरात काही दर्शनी भागात लावली. नैसर्गिक पद्धतीने दर्जेदार आंबा अशी जाहिरात त्यावर केली. स्वतःचा संपर्क क्रमांकही दिला. हळूहळू ग्राहकांकडून प्रतिसादही येऊ लागला. 
 
आजही आंब्यांना डिमांड 
सेंद्रिय आंब्याची चव, स्वाद पटल्यानंतर आजही ग्राहक फोन करुन आॅर्डर देत आहेत. पण आता माल शिल्लक नाही अशी स्थिती आहे. बागेत येऊन सेंद्रिय शेतीची खात्री करण्याबाबतही एलजी ग्राहकांना सांगतात. एवढी खात्री, चव, रंग व व्यवसायातील प्रामाणिकपणा अनुभवल्यानंतर एलजींनी लातुरातील आंब्याचे मार्केट काबीज केली हे सांगायला नको.

संपूर्ण घरदार शेतीत राबते 
संपूर्ण घरदार शेतीत राबत असल्याने आज चांगले दिवस आले. त्यामागे आत्मविश्वास, चिकाटी व नवीन काही स्वीकारण्याची तयारी असावी लागते. अनेकजण चामे यांच्या शेताल भेट देऊन समाधान व्यक्त करतात. जेवढी शेतीला माया लावाल, कष्ट कराल तेवढे दान काळी आई पदरात टाकते, असे ते अात्मविश्वासाने सांगतात.
 : एलजी चामे,९७६३७८०५८५ 
(लेखक लातूर कृषी विभागांतर्गत कृषी अधिकारी असून, शेती व पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

थेट विक्री 
लातूर शहरातील राजीव गांधी चौकात स्वतः बसून थेट ग्राहकांना विक्री सुरू केली. लातूरपासून गाव सुमारे २२ किलोमीटरवर आहे. तेथून मोटरसायकलवर पाच क्रेट (सुमारे १०० किलो) माल ठेवून तो एलजी लातूरला दररोज घेऊन यायचे व विकायचे. सुमारे साडेतीन टन याप्रकारे विकला. घरून उर्वरित काही आंब्यांची होम डिलिव्हरीदेखील केली. किलोला ५० ते ६० रुपये दर मिळाला. 

शेतीतील ठळक बाबी
सलग दोन वर्षांच्या दुष्काळात चामे कुटुंबाने डोक्यावर पाणी टाकून, जैविक आच्छादन करून बागेतील एकही झाड वाळू दिले नाही. 
यंदा काबुली हरभऱ्याचेही एकरी ९ क्विंटल उत्पादन घेतले. क्विंटलला साडेअकरा हजार रुपये दर मिळाला.  
पाच एकरांत ऊस. एका खासगी कंपनीसोबत करार करून सोयाबीनचे बीजोत्पादन. दहा एकरांत १२० क्विंटल त्याचे उत्पादन घेतले.  
३० बाय ३० मीटर व खोली सुमारे ८ फूट असलेले शेततळेही घेतले आहे. 
शासकीय फळबाग विमा मिळाल्याने खर्चाला हातभार 
पारंपरिक शेतीत पूर्वी डाळ- भाकरीवर गुजराण करावी लागे. आज त्याच शेतात योग्य नियोजन, पाण्याची व्यवस्था, पीकबदल व अभ्यासूवृत्ती यातून प्रगती.  
 आनंदवाडी गाव गाडगेबाबा ग्रामस्वच्छतेत पहिले आले असून, जलयुक्त शिवार अभियानात प्रगतिपथावर  
प्रसिद्ध अभिनेते आमीर खानही वॉटरकप स्पर्धेच्या निमित्ताने या गावात येऊन गेले आहेत.
गावाने या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. एलजी यांना देखील आमीर खान यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली आहे. 

Web Title: agro news LG chame farmer