उसाचे ट्रकवरील लोडिंग सोपे करणारी लिफ्ट

उसाचे ट्रकवरील लोडिंग सोपे करणारी लिफ्ट

ऊसतोडणीइतकेच महत्त्वाचे असते, ते ट्रक भरणे. या कामातील श्रम कमी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील गुरुलिंग स्वामी यांनी अनोखी लिफ्ट तयार केली आहे. त्यामुळे केवळ शंभर रुपये डिझेल खर्चामध्ये दोन तासांमध्ये २७ टन ऊस ट्रकमध्ये भरणे शक्य होते. 
 

ऊसतोडणीचा कालावधी सुरू झाला की शिवारात वेगळीच धांदल सुरू होते. राज्यासह देशात ऊसतोडणी व संबंधित कामांमध्ये स्वस्त अशा यांत्रिकीकरणाचा अभाव आहे. राज्यातील ९० टक्के ऊसतोडणी ही मजुरांच्या साह्याने होते. यातील प्रमुख घटक म्हणजे उसाची गाडी (ट्रक अथवा ट्रॅक्‍टरवर) भरणे होय. ही बाब लासोना (ता. जि. उस्मानाबाद) येथील अल्पशिक्षित, परंतु यंत्र, अवजारांच्या निर्मितीमध्ये हातखंडा असलेल्या गुरुलिंग स्वामी यांच्या लक्षात आली. त्यांच्या एकत्र कुटुंबातील चारही भावंडांना शेतीअवजारे बनवण्याचा छंद आहे. सुरवातीला पारंपरिक व बैलचलित नांगर, मोगडा, पेरणी यंत्र तसेच कडबा कुटी यंत्रांची निर्मिती करणाऱ्या गुरुलिंग यांनी ट्रॅक्‍टरचलित अवजारे बनविण्यास सुरवात केली. 

असा सुचला पर्याय
शेतातील अवजारे विकत घेण्यासाठी येणाऱ्या एका मुकादमाकडून सहज बोलताना ऊस ट्रकमध्ये भरण्याची मेहनत गुरुलिंग यांना कळाली. दिवसभर तोडणी केल्यानंतर एखाद्या बैलगाडीवर उभारून ट्रकमध्ये उभ्या असलेल्या माणसांच्या हाती मोळ्या दिल्या जातात. शेतातून मोळ्या आणून सतत वर उचलून मोळ्या देण्यामुळे हात भरून येतात. ही कामे महिलांनाही करावी लागतात. त्यांच्यासाठी परिस्थिती आणखी कठीण होते. 
अशी तयार झाली 

‘स्वामी शुगरकेन लिफ्ट’
    ऊस भरण्याच्या कामाचे नेमके स्वरूप लक्षात घेऊन गुरुलिंग यांनी आपल्या दोन मुलांच्या मदतीने १२ ते १५ फूट उंचीचा लोखंडी सांगाडा तयार केला. त्यावर उसाची मोळी बसणारे कप्पे तयार केले. ते चेनवर बसवून गिअर व गिअरबॉक्सच्या साह्याने फिरण्याची व्यवस्था केली. त्याला गती देण्यासाठी चार एचपी क्षमतेचे डिझल इंजिन वापरले आहे. 
    लिफ्ट नसताना एक ट्रक उसाने भरण्यासाठी किमान सात तास लागत. या लिफ्टमुळे केवळ दोन तासांत २७ टन ऊस ट्रकमध्ये भरता येतो. 
    स्थानिक पातळीवर उपलब्ध अशा इंजिन, गिअर बॉक्‍स अशा घटकांचा वापर केल्यामुळे लिफ्टची किंमत एक ते सव्वा लाख रुपयांपर्यंत येते. मात्र, त्यामुळे मजुरांच्या कष्टामध्ये बचत होते. तसेच मजुरांची संख्या दोनने कमी होत असल्याने शेतकऱ्यांचाही फायदा होतो. 
    दीड ते दोन लिटर डिझेलमध्ये (म्हणजे शंभर रुपयांत) २७ टन क्षमतेची ट्रक उसाने भरली जाते. वर्षानुवर्षे वापरणे शक्य असल्याने साखर कारखान्यांसह शेतकऱ्यांनाही फायदेशीर ठरू शकते. 
फायदे ः 
    हाताळण्यास सोपी -  खालील बाजूला चाके असल्याने ट्रॅक्‍टर, ट्रकला जोडून कोठेही नेणे शक्य आहे. केवळ दीड ते दोन क्विंटलपर्यंत वजन असल्याने दोन माणसांच्या साह्याने आसपासच्या शेतात नेता येते.  
    मेहनत वाचली - यामुळे बैलगाडीवर उभे राहून ट्रकवरील माणसांकडे मोळी देणारे दोन मजूर वाचतात. यात प्रत्येक वेळी खालून वर मोळी देण्यामुळे हात भरून येतात. लिफ्टमुळे मोळी जमिनीलगत टाकूनही स्वयंचलितपणे ट्रकमध्ये जाऊन पडते. 
    वेळेची बचत - ट्रक भरण्याचे सात तासांचे काम दोन तासांत होते. महिन्यातून किमान १५ फेऱ्या जास्तीच्या मिळू शकतात.
    आर्थिक बचत - तोडणी झालेल्या टनांप्रमाणे मजुरी दिली जाते. या प्रक्रियेतील दोन मजूर वाचतात. शिवाय कारखान्याने लिफ्ट पुरविल्यानंतर दोन माणसे (कोयती) कमी लागतात. प्रतिकोयता हंगामात एक लाख रुपयांपर्यंत उचल दिली जाते, त्यातही बचत होईल. 
- बालाजी स्वामी, ९४२३९८९९११, ९८२३८५५७९८.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com