अवघ्या ३०० रुपयांत बनविले हरभरा शेंडे खुडणी यंत्र

अवघ्या ३०० रुपयांत बनविले हरभरा शेंडे खुडणी यंत्र

एक एकर हरभरा खुडणीसाठी पाच ते सहा मजुरांची आवश्यकता असते. सध्याच्या काळात सर्वसामान्य शेतकऱ्यांना भासणाऱ्या मजूरटंचाईवर केळवद (जि. बुलढाणा) येथील नंदूअप्पा बोरबळे या युवकाने मार्ग काढला आहे. त्याने बॅटरीवर चालणारे शेंडा खुडणी यंत्र तयार केले असून, एका दिवसात सहा एकरांपर्यंत काम होऊ शकते.
 

सध्या शेतीकामासाठी मजुरांची उपलब्धता आणि वाढती मजुरी यामुळे शेतीकामांचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. रब्बी हंगामामध्ये हरभरा पिकामध्ये शेंडे खुडणीचे काम महत्त्वाचे मानले जाते. 
हरभऱ्याचे काही वाणांचे शेंडे खुडल्यास फुटव्यांची संख्या वाढून घाट्यांचे प्रमाण वाढते. कोवळ्या स्थितीमध्ये खुडलेल्या शेंड्याचा वापर ताज्या स्वरुपात किंवा वाळवून दीर्घकाळ भाजीसाठी होतो. या दोन्ही फायद्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या कल हरभरा पिकांच्या शेंडा खुडणीकडे असतो. एकरी पाच ते सहा मजूर लागतात. केवळ मजुरी परवडत नसल्याने शेंडा खुडणी टाळली जाते. यावर मात करण्यासाठी केळवद (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील नंदूअप्पा बोरबळे या युवकाने प्रयोग करून बॅटरीवर चालणारे हरभरा खुडण्याचे यंत्र तयार केले. घरातील अडगळीत पडलेल्या वस्तूंचा वापर केल्याने केवळ तीनशे रुपयांमध्ये ते तयार झाले.  

साधे, सोपे तंत्र
    घरातील बॅटरीवर चालणाऱ्या फवारणी यंत्राचाच वापर केला आहे. या बॅटरीद्वारे ऊर्जा देत किंचित वाकवलेल्या पीव्हीसी पाइपवर एक डिव्ही मोटर (किंमत ः १५० रु.) बसवली. थर्माकोल कापण्याचे दोन कटर जोडून त्याला या मोटरद्वारे गती दिली. चालू बंद करण्यासाठी पीव्हीसी पाइपवर एक टच बटन बसवले. 
    पीव्हीसी पाइपचा वापर केल्याने वजन कमी असून, हाताळणी सुलभ झाली आहे. 
    धारदार कटरमुळे हरभऱ्याच्या कोवळ्या फांद्या सहज तुटतात. 
    चाचणीमध्ये दिवसभरामध्ये सहा एकर क्षेत्राची खुडणी शक्य झाली. 
    एकरी साधारणपणे पाच ते सहा मजूर लागतात. 

पाच एकर क्षेत्रामध्ये हरभरा पेरला असून, दोनदा खुडल्यास चांगले उत्पादन येत असल्याचा अनुभव आहे. या कामासाठी एकरी सहा मजूर लागतात. अाजच्या प्रति दिन दीडशे रुपये मजुरीप्रमाणे ९०० रुपये एकरी खर्च होतो. अर्थात, अलिकडे वेळेवर मजूर मिळत नाहीत. त्यामुळे शेंडा खुडणीसाठी प्रयत्न सुरू केले. समाजमाध्यमामध्ये आलेल्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. गिरीश जेऊघाले यांच्या पोस्टवरून प्रेरणा घेत हे यंत्र तयार केले आहे. 
- नंदूअप्पा बोरबळे, ९८८१३४१४३४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com