आधुनिक बैलगाडीमुळे होईल बैलांवरील ताण कमी

आरामदायी अशा सुधारित बैलगाडीमुळे बैलावरील ताण कमी होतो.
आरामदायी अशा सुधारित बैलगाडीमुळे बैलावरील ताण कमी होतो.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संशोधक डॉ. जयदीप साळी, प्रा. संजय घोष यांनी २०११ मध्ये विकसित केलेल्या आधुनिक बैलगाडीचे व्यावसायिक उत्पादन होत नसल्याने शेतकऱ्यांपर्यंत आवश्यक तितका प्रसार होऊ शकला नव्हता. मात्र, नुकताच या संशोधनाचा तंत्रज्ञान हस्तांतर करार एका कंपनीसोबत झाला. त्यात आवश्यक त्या सुधारणांसह शेतकऱ्यापर्यंत पोचण्याचा मार्ग सुकर झाला.
 

ग्रामीण भागामध्ये बैलगाडी हेच एकेकाळी वाहतुकीचे साधन होते. कालांतराने अन्य साधने विकसित झाली तरी अद्यापही खेड्यापाड्यातील, चिखलांनी भरलेल्या रस्त्यावरून चालणारी बैलगाडी हीच शेतकऱ्यांची विश्वासाची असते. बैलगाडी म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर येते, ती दोन चाकाची लाकडी गाडी. अशी भरलेली गाडीचे बहुतांश ओझे बैलाच्या खांद्यावर येते. त्यातच हे ओझे ओढण्यासाठीचा ताणही असतो. बैलगाडी चालवणारा शेतकरीही काही आरामात बसलेला असतो असे नाही. मात्र, बैलावरील आणि ती चालवण्यावर येणारा ताण कमी करण्याच्या उद्देशाने २०११ मध्ये जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील प्रा. डॉ. जयदीप साळी व प्रा. संजय घोष यांनी अत्याधुनिक बैलगाडी विकसित केली होती. राज्य शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने केलेल्या लोकोपयोगी संशोधनाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून विकसित केलेल्या या संशोधनाचे व्यावसायिक उत्पादन होत नसल्याने शेतकऱ्यांपर्यंत संशोधन पोचत नव्हते. 

तंत्रज्ञान हस्तांतराचा करार 
डॉ. समाधान पाटील यांनी आयआयटी (मुंबई) येथून पीएचडी केली असून, लिस्बन, पोर्तुगाल आणि ब्रिटनमध्ये अधिक संशोधन केले आहे. नॅनोटेक्‍नोलॉजी, बायो-मेडिकल इंजिनिअरिंग मधील संशोधनाचे व्यावसायिक उत्पादन करण्याच्या उद्देशाने त्यांनी आपला बंधू प्रदीप याच्यासह ‘आय-टेक्‍नोग्लोबल’ या कंपनीची स्थापना केली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातच शिक्षण घेतलेल्या पाटील यांना या अत्याधुनिक बैलगाडी संशोधनाबद्दल माहिती होती. त्यांनी आपल्या कंपनीतर्फे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त बैलगाडीचे व्यावसायिक उत्पादन करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नुकताच उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. पी. पी. पाटील, बैलगाडीचे संशोधक डॉ. साळी व प्रा. घोष यांच्या उपस्थितीत ‘आय-टेक्‍नोग्लोबल’ या कंपनीशी तंत्रज्ञान हस्तांतराचा करार करण्यात आला. 

आवश्यकतेनुसार करण्यात येतील बदल  
व्यावसायिक उत्पादन करताना ग्राहकांच्या मागणीनुसार आराखडा, विविध रस्त्यानुसार चाकांमध्ये बदल करण्याचे नियोजन आहे. बैलगाडीचा वाहन म्हणून व अन्य शेती उपयोगी कामांसाठी परिणामकारकपणे वापर करण्यासाठी आवश्यक बदल करण्यात येतील, अशी माहिती डॉ. समाधान पाटील यांनी दिली. या करारानुसार बनविलेले पहिले मॉडेल पुण्यातील कृषी उद्योजक नरेंद्र मुंदडा यांना हस्तांतरित केले आहे. 
- डॉ. जयदीप साळी, ९४२१६०५२७०
- प्रा. प्रदीप पाटील, ९८२२७८२८७३

अशी आहे अत्याधुनिक बैलगाडी 
आधुनिक बैलगाडीला दोनऐवजी लोखंडाची तीन फुटांची चार चाके आहेत. चाकांना शॉकॲब्सॉर्बरची सोय आहे. यामुळे बैलाच्या मानेवरील भार खूपच कमी होतो. 

बैलगाडीचा आकार, आराखडा, प्रत्येक भागासाठी वापरलेल्या साहित्याचे (चाक, प्लॅटफॉर्म, पूल बीम आदी) ‘ॲनसिस’ या संगणक प्रणालीद्वारे ‘कॉम्प्युटर स्टिम्युलेशन’ करण्यात आले आहे. 

बैलगाडी ओढण्यासाठी एक अथवा दोन बैलांचा वापर शक्य आहे. बैलांच्या मानेवरील दांड्याचा 
तिफणीचा किंवा कोळपाचा दांडा म्हणून उपयोग करता येईल. 

 गाडीवानाला बसण्यासाठी स्वतंत्र सीट, बॅटरी चार्जिंग, पुढे व मागे दिवे, रेडिओ या सुविधाही केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com