मूग, उडीद गेल्यात जमा, कपाशीवर किडींचा हल्ला

चंद्रकांत जाधव
शुक्रवार, 1 सप्टेंबर 2017

यंदाच्या खरिपाला अगदी पेरणीपासून नाट लागली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस आला त्यावर पेरणी केली. नंतर पावसाने २० ते २३ दिवस ओढ दिली. त्यात ज्वारी, कापूस, सोयाबीन उगवलाच नाही. दुबार पेरणी केली. त्यावरही पाणी फिरले. तिबार पेरणी केली. पण उशीर झाल्याने पिकं चांगली नाहीत. उडीद, मूग तर पुरती हातून गेली, कपाशीवर कीड, रोगांनी हल्ला केला आहे. रब्बीबाबतही फारशी आशा नाही, अशी संकटांची मालिकाच शेतकऱ्यांनी सांगितली. 

यंदाच्या खरिपाला अगदी पेरणीपासून नाट लागली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस आला त्यावर पेरणी केली. नंतर पावसाने २० ते २३ दिवस ओढ दिली. त्यात ज्वारी, कापूस, सोयाबीन उगवलाच नाही. दुबार पेरणी केली. त्यावरही पाणी फिरले. तिबार पेरणी केली. पण उशीर झाल्याने पिकं चांगली नाहीत. उडीद, मूग तर पुरती हातून गेली, कपाशीवर कीड, रोगांनी हल्ला केला आहे. रब्बीबाबतही फारशी आशा नाही, अशी संकटांची मालिकाच शेतकऱ्यांनी सांगितली. 

जळगाव जिल्ह्यातील जामनेर, जळगावचा दक्षिण पट्टा, बोदवड व भुसावळ या तालुक्‍यांमध्ये स्थिती भीषण आहे. यातच शासन कुठलीही दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. जळगाव तालुक्‍यातील मेहरूण शिवारापासून पुढे शिरसोली, जळके, विटनेर, डोमगाव, म्हसावद, वावडदा भागांतील पाणी देऊन उभे केलेले कापसाचे पीक तेवढे बरे आहे.

उडीद, मूग, सोयाबीन याची अवस्था तर बिकट बनली आहे. ‘‘आता पाऊस येऊन काय फायदा साहेब... हव्या त्या वेळी तो आला नाही... आता काय करायचं,’’ असे हताशपणे शेतकरी सांगत होते. मेहरूण शिवारात मूग काढणीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पण दाणे बारीक आहेत. शेंगाही हव्या तेवढ्या लागल्या नाहीत. दाण्यांचा रंगही लाल, काळसर आहे. 

जळगाव तालुक्‍यातील शिरसोली व भुसावळातील कुऱ्हे पानाचे येथे मिळून दरवर्षी २०० एकर क्षेत्र पानवेलींचे असते. पण यंदा शिरसोलीत जेमतेम ३० एकरही क्षेत्र नाही, अशी प्रतिक्रिया शिरसोली येथील पानवेली उत्पादक शेतकऱ्यांनी दिल्या आहेत. 

बोदवड तालुक्‍यातील मनूर, शेलवड, बोदवड, मुक्ताईनगरमधील कुऱ्हा, वढोदा, काकोडा आदी भागांतही मूग, उडदाच्या पिकाने दम तोडला. शेतांमध्ये उडदाचे पिवळसर आणि एका झाडाला दोन, चार शेंगांचे पीक दिसते. शिवारे ओस दिसतात. आताच्या पावसाने तुरीचे पीक तेवढे बरे दिसते. जामनेरातील पळासखेडा, नेरी दिगर, पळासखेडा गुजरांचे, नागण खुर्द, वाडिकिल्ला भागांत कृत्रीम जलसाठ्यांवरील कापसाचे पीक हिरवेगार आहे. पळासखेडा परिसरात केळीचे पीक चांगले दिसते, पण पावसाअभावी त्याची निसवण थांबल्याचे नरवेल (ता. मुक्ताईनगर) येथील शेतकरी नीळकंठ महाजन यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव, भडगाव तालुक्‍यांतील प्रकल्प कोरडेठाक आहेत. गिरणा, वाघूर प्रकल्पांतही मागील वर्षाच्या तुलनेत हवा तसा जलसाठा अद्याप नाही. मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त ४२ टक्के जलसाठा आहे. तर मोठ्या प्रकल्पांमध्ये ६३.६४ टक्के जलसाठा आहे. 

जिल्ह्यातील ३० ऑगस्टअखेरच्या पावसाची स्थिती (मिलिमीटरमध्ये)
तालुका    सरासरी    झालेला पाऊस    टक्केवारी

जळगाव    २०८    १३२        ६३
भुसावळ    १६२    ८५        ५२
यावल    २१४    ११०        ५१
रावेर    २०९    १५०        ७२
मुक्ताईनगर    १४४    ८९        ६२
अमळनेर    १३९    ६१        ४४
चोपडा    २१८    १५२        ६९
एरंडोल    १६८    १५७        ९३
पारोळा    १६०    ८२        ५१
चाळीसगाव    १८१    १६८        ९२
जामनेर    २२६    १४६        ६४
पाचोरा    २३८    १०६        ४४
भडगाव    २०४    ९१        ४४
धरणगाव    १६८    १२९        ७७
बोदवड    १६२    १२७        ७८
        
जिल्ह्यातील प्रकल्पांतील पाणीसाठा (३० ऑगस्टखेर)
प्रकल्प    टक्केवारी

हतनूर    ६३.७३
गिरणा    ५५.८६
वाघूर    ६३.३०
अभोरा    १००
मंगरूळ    १००
सुकी    १००
मोर    ५८.८७
अग्नावती    ०.००
हिवरा    ०.००
बहुळा    १.०७
तोंडापूर    ६२.२१
अंजनी    १३.७८
गूळ    ७६.४१
भोकरबारी    १.९४
बोरी    २४.४५
मन्याड    ०.००

जळगाव जिल्ह्यातील खरीप दृष्टिक्षेपात (क्षेत्र हेक्‍टरमध्ये)
सरासरी क्षेत्र (ऊस वगळून) -     आठ लाख ३३ हजार २१६
प्रत्यक्ष पेरणी -     सात लाख ४३ हजार ५१७
पेरणीची टक्केवारी -     ८९.२३
    
विविध पिकांची पेरणी (क्षेत्र हेक्‍टरमध्ये)
पिके    सरासरी क्षेत्र    प्रत्यक्ष पेरणी

गळीतधान्य    २९,९५७    २९,२५८
कडधान्य    ९४,४३६    ६५,५५४
तृणधान्य    १,७७,४२४    १,७३,६४२
कापूस    ५,३१,३९९    ४,७५,०६३

जिल्ह्यातील खरीप कर्जवाटप स्थिती (लाखांत)
बॅंकेचे नाव    लक्ष्यांक    प्रत्यक्ष वाटप        टक्के
जिल्हा मध्यवर्ती 

सहकारी बॅंक    १०१२०२.००    ५२७२३.८०        ५२.१०
राष्ट्रीयीकृत बॅंका    १३६२५०.००    ७६९८३.००        ५६.५०
ग्रामीण बॅंका    २५०६.००    ८९६.००        ३५.७५
खासगी बॅंका    २६८२२.००    ७१६७.००        २६.७२
एकूण    २६६७८०.००    १३७७६९.८०        ५१.६४

यंदा माझे २० गुंठे पानवेलींचे पीक होते. त्यातील एका ओळीत आठ बंडल पाने निघतील, अशी अपेक्षा होती. परंतु एका ओळीत चारच बंडल पाने आली. उत्पादन निम्मे घटले. आमचा पानवेलींचा हंगाम जवळपास उद्ध्वस्त झाला आहे. 
- पुंडलिक बाबूराव बारी, शेतकरी, शिरसोली, ता. जळगाव

मुगाचे पीक जेमतेम आले. तेदेखील लालसर, काळसर दिसते. घरापुरते उत्पादन झाले. पाऊस नव्हता. जून व जुलैत २० ते २५ दिवस ओढ दिली. त्यात कापूस व इतर हंगामही धोक्‍यात आला. पाऊस आला तरी खरिपाला फायदा दिसत नाही. 
- सुभाष घुगे, शेतकरी, मेहरूण, ता. जळगाव

जूनमध्ये पावसाने २५ दिवस ओढ दिल्याने फूलशेतीवर परिणाम झाला. फूलशेतीला कूपनलिकेच्या पाण्यावर वाचविले. परंतु आता हवी तशी फुले येतच नाहीत. यंदा मोठा फटका बसला आहे. 
- जाहीर मोहंमद शफी, शेतकरी, शिरसोली, ता. जळगाव

मी एकदा, दोनदा नव्हे तर तीनदा कापसाची लागवड केली. साडेसात एकरांत ३९ पाकिटे बीटी कापसाचे बियाणे लागले. त्यावर मोठा खर्च झाला आहे. आता पीक कसे येते, हा प्रश्‍न आहे. लागवड उशिराने झाल्याने फटका बसू शकतो. 
- ज्ञानेश्‍वर भागवत शेळके, शेतकरी, पळासखेडा, ता. जामनेर

ज्वारीचे पीक पावसाअभावी अनेक ठिकाणी उगवले नाही. शिवारात मन रमत नाही. दुष्काळ जाहीर केला पाहिजे. कोरडवाहू कापसाची वाढ हवी तशी दिसत नाही. मूग तर गेलाच, आता उडदाचे पीकही जेमतेम आहे. 
- विलास देवकर, शेतकरी, बोदवड

माझी पूर्वहंगामी कपाशी आहे. पावसाने ओढ दिल्याने सिंचन करावे लागले. आमचा हलका व मुरमाड जमिनीचा भाग आहे. आता ऑगस्टच्या अखेरच्या टप्प्यात पाऊस सुरू होताच कापसावर फूलगळ झाली. जवळपास निम्मे फुले गळाली आहेत. 
- उत्तम काळे, 
शेतकरी, कुऱ्हे पानाचे, ता. भुसावळ

Web Title: agro news mug udid loss, worm on kapashi