नागपंचमी - कृषी संस्कृतीची देणगी

नागपंचमी - कृषी संस्कृतीची देणगी

वारुळात नाग राहतो. म्हणून नागाच्या नावाने ती भूमीचीच पूजा होय. काठसंहितेत वारुळाची माती हा पृथ्वीचा सकस प्राणच आहे असे विधान आहे. म्हणून पूर्वी शेतकरी वारुळाची माती आपल्या शेतात टाकीत व त्यावर चांगली पिके घेत. कारण मुंग्या सकस मातीचे कण जमिनीवर एकत्र आणून ठेवतात. त्यामुळे  तिच्यात एक प्रकारचा कस असतो म्हणून पिके तरारून वाढतात. वारुळाच्या रुपाने भूमातेची पूजा करण्यासाठी वैदिक काळाच्या आधीपासून प्रथा कृषी संस्कृतीत प्रचलित असावी.

निसर्गाच्या अंगाखांद्यावर खेळत बागडत विकसित होणाऱ्या मानवाला निसर्ग हा नेहमीच एक गूढ व अनाकलनीय शक्ती वाटत आला आहे.

निसर्गातल्या काही प्राण्यांच्या शक्तीपुढे आपली ताकद नगण्य असल्याची जाणीव झाल्यानंतर त्याने नागासारख्या जिवांची पूजा सुरू केली असावी. त्याच्याकडून आपले काही बरेवाईट होऊ नये अशी त्या मागची भावना असावी. नागांचे सळसळणे, फणा काढणे, विष, आकर्षक रूप या साऱ्याच गोष्टी अलौकिक व अद्भुत वाटतात. त्यांच्याविषयी माणसाच्या मनात भय आणि आकर्षण निर्माण झाले. एकमात्र खरे की नागर संस्कृती असो की कृषी संस्कृती, वेदकालीन असो वा एतद्देशीय संस्कृती, या दोन्ही संस्कृतीवर दीर्घकाळ आणि खोल परिणाम करणारा प्राणी हा नागच आहे. आदिम जीवनावर त्याचा जितका भयकारी प्रभाव होता तितकाच कृषी जीवनावर जाणवतो. सर्प आणि त्याच्या विषयीच्या संमिश्र धारणा आपल्या साऱ्याच धर्मामध्ये खोलवर रुजलेल्या आढळतात. 

मानववंश शास्त्रज्ञांनी विभिन्न मानवी समुदायांचा अभ्यास करुन मानवी समाजाची सहा धार्मिक प्रतिकांमध्ये विभागणी केली आहे. वृक्ष, लिंग, सर्प, अग्नी, सूर्य आणि पितर ही ती प्रतीके. वृक्षाप्रमाणे नाग किंवा सर्पपूजा प्राचीन आहे. ती जगातल्या अनेक देशांत व्यापक स्वरुपात अस्तित्वात आहे. इजिप्तमध्ये आढळलेल्या पुरावशेषांमध्ये सर्पाकृती कोरलेल्या आढळल्या. सर्प आणि वृक्षांची चित्रे आढळली. आफ्रिकेत सापाला केवळ पवित्र मानत नाहीत तर तिथे साप, वृक्ष आणि समुद्र यांची देवतारूपात पुजा केली जाते.

पेरू आणि मेक्सिको या देशात देवालयाच्या स्थापत्य कलेत नागाच्या चित्रणाला स्थान आहे. आदिम समाज नागाला रक्षक मानतो. कृषी व पर्जन्यदेवता म्हणून ते नागाला पुजतात. इराण, चीन व प. आशियातील काही देशांत सर्पाशी संबंधित धर्मकथा उपलब्ध आहेत. पाऊस आणि संपत्तीचा दाता म्हणून त्याची पूजा होते. कंबोडियात आजही एक विशाल सर्पमंदिर आहे. तिथल्या राष्ट्रध्वजावर दैत्यरुपी नागाचे चित्र आहे. उत्तर अमेरिकेत ओहियो राज्यात अति प्राचीन सर्पाचे सांगाडे आढळतात. कोरियात सापाला श्रद्धापूर्वक खाऊ घातले जाते. नेपाळ, तिबेटमध्ये लोकांची नागपुजेवर श्रद्धा आहे. भारताच्या जवळपास सर्वच राज्यांत नागाची पूजा करण्याची प्रथा आहे. त्याचा जास्त प्रभाव कृषी जीवनावर आढळतो. 

महाराष्ट्रात नागपंचमीला दिंडे करण्याची प्रथा रूढ होती. दुसरा एक गोडपदार्थ म्हणजे पुरणपोळी. वर्षा ऋतूमध्ये सापांची पैदास अधिक होते. याच काळात ते अधिक दृष्टीला पडतात. कृषी संस्कृतीच्या दृष्टीने श्रावण व भाद्रपद हे महिने महत्वाचे व वैशिष्ट्यपूर्ण आहेत. याच महिन्यात अधिक सर्पदंश होत असल्याने त्यांची पूजा केली जात असावी. या विषयी एक आख्यायिका प्रचलित आहे. जन्मेजयाने आपल्या पित्याच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी केलेल्या सर्पसंहार यज्ञात प्रचंड संख्येने सापांची आहुती पडली. नागाचा निर्वंश होणार अशी अवस्था आल्यावर नारद आणि अस्तिक मुनी यांच्या मध्यस्थीने हा संहार थांबला. ज्या दिवशी तो थांबवला तो दिवस श्रावणातला पंचमीचा होता म्हणून नागपंचमी सण साजरा केला जातो.

आपल्याकडे ग्रामीण भागात जी मुंग्याची वारुळे असतात त्याची पूजा करण्यासाठी नागपंचमीला सापाला दूध पाजण्याची खोटी समजुत आहे. वारुळात नाग राहतो. म्हणून नागाच्या नावाने ती भूमीचीच पूजा होय. यज्ञाची वेदी तयार करताना वेदकालीन लोक अशा वारुळाच्या मातीचा वापर करीत. काठसंहितेत वारुळाची माती हा पृथ्वीचा सकस प्राणच आहे असे विधान आहे. म्हणून पूर्वी शेतकरी वारुळाची माती आपल्या शेतात टाकीत व त्यावर चांगली पिके घेत. कारण मुंग्या सकस मातीचे कण जमिनीवर एकत्र आणून ठेवतात. त्यामुळे  तिच्यात एक प्रकारचा कस असतो म्हणून पिके तरारून वाढतात. वारुळाच्या रूपाने भूमातेची पूजा करण्यासाठी वैदिक काळाच्या आधीपासून प्रथा कृषी संस्कृतीत प्रचलित असावी. कारण ‘अग्नीचयन’ या विधीमध्ये वारुळाच्या मातीपासून तयार केलेल्या वाटीचा वापर केला जात असे. वारुळ हे भूमातेचे प्रतीक असल्याचे लोकजीवनात रुढ झालेले आहे. यातूनच ‘देवदाशी’ होणाऱ्या यल्लमादेवीची उपासक होणाऱ्या मुलींचा विवाह प्रथम वारुळांशी लावण्याची प्रथा आली. आपल्याकडे बरेच सण, उत्सव आणि वृत्त यात भूमातेची पूजा आणि तिच्या सुफलीकरणातून समृद्धी प्राप्त व्हावी हाच हेतू आढळतो. 

पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा येथे मोठ्या प्रमाणात साप व नाग पकडून त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. तिथे जत्रा भरवली जाते. मदारी लोक वेळूच्या कामट्यापासून बनवलेल्या पेटीतून किंवा गोलाकार टोपलीतून साप आणून बीन किंवा पुंगी वाजवून वेगवेगळे सापाचे खेळ करून दाखवून पैसे कमावतात. त्यावेळी दूध पाजण्यासाठी लोकांची गर्दी होते. मुळात साप दूध पित नसतो. पण त्याविषयीची अंधश्रद्धा पसरवून धंदा करणारे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काही संघटनांनी आक्षेप घेतल्यामुळे शासनाने बत्तीस शिराळ्यातील प्रकारांवर बंदी घातली आहे.

मराठवाड्यात विशेषतः लातूर- नांदेड- उस्मानाबाद- सोलापूर भागात नागपंचमीला ज्वारीच्या लाह्या करून त्या वारुळाला अर्पण करतात. भोई लोक रस्तोरस्ती भट्ट्या पेटवून ज्वारी घेऊन लाह्या बनवून देतात. ह्या लाह्या पौष्टिक असतात. स्त्रिया नागपंचमीला भुलया खेळतात. म्हणजे एकमेकांच्या हातात हात देऊन, संसारातील व समाजातील सुखदुःखाचे स्वतःच रचलेले गाणे म्हणत गोलाकार फिरतात. खास करुन नव्याने लग्न झालेली नवरी नागपंचमीला चार दिवस माहेरपणाला येते. तिची साडीचोळी देवून ओटी भरली जाते. तसेच दिवसभर सर्व माहेरवाशिणी भुलईच्या निमित्ताने एकत्र जमतात. बालवयातल्या आठवणींत रममाण होतात. त्यांच्यासाठी हा सण म्हणजे सख्या, मैत्रिणी व आईवडीलांना भेटण्याचा हक्काचा सण समजला जातो. काही भागात पंचमीला झाडाला झोके बांधून खेळतात. 

सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले आहे ते उगीच नाही. कारण शेतात उंदराकडून पिकांची नासाडी मोठ्या प्रमाणात व्हायची. शेतकऱ्यांचे हे नुकसान फार असायचे. निसर्गात एखाद्या किटक किंवा प्राण्यांची संख्या वाढली की त्यावर उपजीविका करणारे प्राणी ती खावून मर्यादित ठेवीत. तसेच साप शक्यतो उंदरावर जगणारा प्राणी. त्याच्या थेट बिळात जावून भक्ष्यांचा फडशा पाडणारा असल्याने कदाचित त्याला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले आहे किंवा उंदरांच्या बिळात लपणारा म्हणून `आयत्या बिळात नागोबा` ही म्हण लोकजीवनात प्रचलित झाली असावी. सापाबद्दल अनेक राज्यात, देशात पुजण्या-भजण्याच्या परंपरा, सण, उत्सव वेगवेगळे आहेत. महाराष्ट्रात नागपंचमी हा कृषी संस्कृतीतला एक महत्त्वाचा सण म्हणून आजही त्याचे महत्त्व टिकून आहे. 

- ९४२२६१०७७५ (लेखक कृषी अधिकारी असून शेती व पर्यावरणाचे अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com