पौष्टिक,लुसलुशीत चाऱ्यासाठी पेरा ओट

ओट पिकाचा चारा सकस, लुसलुशीत असल्याने जनावरांच्या दुग्धोत्पादनात चांगली वाढ होते.
ओट पिकाचा चारा सकस, लुसलुशीत असल्याने जनावरांच्या दुग्धोत्पादनात चांगली वाढ होते.

ओट पिकाचा पाला हिरवागार, पौष्टिक व लुसलुशीत असतो. जनावरांसाठी हिरवा चारा, वाळलेला भुसा किंवा मुरघास म्हणून याचा वापर करता येतो. हिरव्या चाऱ्यात प्रथिने ९ ते १० टक्के आणि पिष्टमय पदार्थ ४५.५ टक्के असतात.
 

ओट हे एकदलवर्गीय चांगल्या प्रतीचा हिरवा चारा देणारे पीक आहे. यास भरपूर फुटवे येतात. पीक पालेदार असून याचा पाला हिरवागार, रसाळ, रुचकर, पौष्टिक व लुसलुशीत असतो. जनावरांसाठी हिरवा चारा, वाळलेला भुसा किंवा मुरघास म्हणून याचा वापर करता येतो. या पिकाचा चारा कोणत्याही अवस्थेत जनावरांना खाऊ घातला तरी चालतो. दुभत्या जनावरांना हा चारा खाऊ घातल्यास दुधाचे प्रमाण वाढते, त्याचबरोबर दुधातील स्निग्धांशाचे प्रमाणदेखील वाढते. 

लागवडीचे नियोजन 
    लागवडीसाठी उत्तम निचरा असणारी जमीन निवडावी. क्षारयुक्त किंवा पाणथळ जमिनीत लागवड करू नये. कमी थंडी किंवा दमट हवामान या पिकास हानिकारक असते.
    पिकास तंतुमय मुळे असतात. त्यामुळे जमिनीत हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने एक खोल नांगरट करून उभी-आडवी कुळवाची पाळी देऊन जमीन भुसभुशीत करावी. जमिनीचा चढ-उतार लक्षात घेऊन सारख्या प्रमाणात पाणी बसेल या दृष्टीने ५ ते ७ मीटर लांब व ३ ते ४ मीटर रुंद वाफे तयार करावेत.
    पेरणी १५ ऑक्‍टोबर ते नोव्हेंबरचा पहिल्या पंधरवड्यापर्यंत करावी. पेरणीसाठी एकरी ४० किलो बियाणे लागते. 
    पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाणास २५० ग्रॅम ॲझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी. दोन ओळीतील पेरणीचे अंतर ३० सें.मी. ठेवावे.
    लागवडीसाठी फुले हरिता (आर.ओ. १९), फुले सुरभी व केन्ट या सुधारित जातींची निवड करावी.

खत व्यवस्थापन 
    पेरणीपूर्वी एकरी २ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. 
    एकरी ४० किलो नत्र तीन समान हप्त्यामध्ये द्यावे म्हणजेच १४ किलो नत्र, २० किलो स्फुरद, १६ किलो पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. पेरणीनंतर नत्राचा दुसरा हप्ता एकरी १४ किलो याप्रमाणात २५ ते ३० दिवसांनी द्यावा. उर्वरित तिसरा हप्ता एकरी १२ किलो नत्र पहिल्या कापणीनंतर लगेच द्यावा. 

    एक कोळपणी व खुरपणी २५ ते ३० दिवसांच्या आत करावी.  जमिनीचा मगदूर व पिकाच्या अवस्थेनुसार दर १० ते १२ दिवसांच्या अंतराने पिकास पाणी द्यावे.

चारा उत्पादन
    हिरव्या चाऱ्याकरिता पहिली कापणी पेरणीनंतर ५० दिवसांनी व दुसरी कापणी पहिल्या कापणीनंतर ३५ दिवसांनी किंवा ५० टक्के फुलोऱ्यात असताना करावी. 
    दुबार कापणी घेतल्यास प्रति एकर २०० ते २४० क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते.
    पश्‍चिम महाराष्ट्रातील मध्यम खोल जमिनीत रब्बी हंगामामध्ये दुहेरी उपयोगासाठी ओट (फुले हरिता) पिकाची हिरवा चारा, बिजोत्पादन आणि आर्थिक फायद्यासाठी पेरणी नंतर ५० दिवसांनी हिरव्या चाऱ्यासाठी जमिनीपासून १० सें.मी. उंचीवर कापणी करावी. त्यानंतर बिजोत्पादन घ्यावे.

पोषण मूल्ये
    पन्नास टक्के फुलोऱ्यातील हिरव्या चाऱ्यात प्रथिने ९ ते १० टक्के, पचनीयता ६५ ते ७० टक्के, काष्टमय पदार्थ ३५.१ टक्के, स्निग्ध पदार्थ १.८ टक्के, खनिजे १० ते ११ टक्के व पिष्टमय पदार्थ ४५.५ टक्के असतात.

- हेमचंद्रसिंह परदेशी, ९८६०७०५४७४ (अखिल भारतीय समन्वित चारा पिके संशोधन व उपयोगिता प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com