जुलैतच अाली गुलाबी बोंड अळी

जुलैतच अाली गुलाबी बोंड अळी

अकोला - वऱ्हाडात माॅन्सूनपूर्व लागवड झालेली कपाशी काही भागात फुलोरावस्थेत अाली अाहे. या कपाशीवर जुलैच्या दुसऱ्या अाठवड्यातच गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसत अाहे. बीटी कपाशीवर गुलाबी बोंड अळी प्रादुर्भावग्रस्त फुले (डोमकळी) आढळून आली आहेत. प्रादुर्भावाची टक्केवारी कमी असली तरी सर्वत्र माॅन्सूनपूर्व अशा डोमकळ्या असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यःस्थितीत बागायती माॅन्सूनपूर्व बीटी कपाशीवरच प्रादुर्भावग्रस्त फुले आढळून आली आहेत. या गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वेळीच रोखणे अावश्यक अाहे. 

या वर्षी शेतकरी सोयाबीन पीक सोडून कपाशीकडे वळले आहेत. वऱ्हाडात कापसाचे वाढीव क्षेत्र लक्षात घेता कृषी विभागानेही नियोजन केले. प्री-मॉन्सून लागवड झालेली बीटी कपाशी कुठे फुलांच्या अवस्थेत, तर कुठे पात्यांवर अाहे. गेल्या महिनाभरात दमदार पाऊस नसल्याने वाढीवर परिणाम झाला अाहे. अाता फुलांमध्ये गुलाबी बोंड अळी दिसून येऊ लागली अाहे. जुलैच्या मध्यातच हा प्रादुर्भाव दिसत असल्याने ही कापूस उत्पादकांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.

तज्ज्ञांनी दिलेली प्रादुर्भावाची कारणे
- बीटी बियाण्यासोबत दिलेले रेफ्युजी (नाॅन बीटी) बियाणे न लावणे.
- बीटी कपाशीच्या संकरीत वाणांची ठिबकवर हंगामाआधी खुप लवकर लागवड करणे. 
- दिर्घ कालावधीच्या बीटी कपाशीच्या संकरीत वाणांची लागवड करणे.
- कपाशीचे पीक नोव्हेंबरनंतर सुध्दा (फरदड) घेवून पिकाचा कालावधी एप्रील-मे पर्यंत लांबवणे.
- गुलाबी बोंड अळयांमध्ये बीटी कपाशीतील क्राय वन एसी व क्राय टू एबी या जनुकांप्रति प्रतिकारक्षमता निर्माण झाली आहे.  
- प्रादुर्भाव ओळखुन वेळेवर व अचुक व्यवस्थापनाचे उपाय न करणे. 

उपाययोजना
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापिठाच्या कापूस संशाेधन व किटकशास्त्र विभागाने सुचविलेल्या उपाययोजना पुढीलप्रमाणे.

सद्यस्थितीत बागायती मॉन्सूनपुर्व बीटी कपाशीवर फुले, पात्या लागल्या अाहेत. कोरडवाहू मॉन्सून लागवड बीटी कपाशीला अजून फुले, पात्या, लागायच्या अाहेत. त्यामुळे मॉन्सूनपुर्व बीटी कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव वेळीच रोखणे अावश्यक अाहे. तसेच बहुतांश शेतकऱ्यांना गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव (डोमकळी) अोळखताच येत नाही. शेतकऱ्यांनी डोमकळी अोळखून वेळीच जर व्यवस्थापनाचे उपाय अंमलात अाणले तर गुलाबी बोंडअळीच्या पुढच्या पीढीस अटकाव करून होणारे संभाव्य नुकसान टाळू शकतो. 

नियमीत बीटी कपाशीच्या शेताचे सर्वेक्षण करावे. कपाशीचे पीक पातीवर अाल्यावर आठवड्यातून एकवेळा शेतातील १२ ते २४  झाडांचे निरीक्षण करावे (क्षेत्रावर अवलंबून). ही झाडे शेताचे प्रतिनिधीत्व करतील अशी निवडावीत. या झाडावरील एकंदर पात्या, कळ्या, फुले आणि हिरवी बोंडे मोजावीत आणि यापैकी गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त किती आहेत ती काळजीपूर्वक पाहून मोजावीत. विशेष करून डोमकळया दिसतात का पाहणे. नुकसानीचे प्रमाण पाच टक्क्यांपेक्षा कमी असल्यास जमा करून नष्ट केल्यास तयार होणाऱ्या पुढच्या पीढीस अटकाव होतो. पीक ४५ ते ५० दिवसांचे झाल्यावर कपाशीच्या शेतामध्ये गुलाबी बोंडअळी सर्वेक्षणासाठी हेक्टरी पाच फेरोमोन सापळे लावावेत. पिकापेक्षा एक ते दिड फुट उंचीवर लावून त्यामध्ये गुलाबी बोंड अळीसाठीची लिंग प्रलोभने (ल्यूर्स) बसवावीत. हे ल्यूर्स दर तीन आठवड्याच्या अंतराने बदलावेत. सापळ्यामधे दाेन ते तीन दिवस सतत अाठ ते दहा पतंग आढळून आल्यास त्वरीत व्यवस्थापनाचे उपाय योजावेत.

नुकसानीचे प्रमाण पाच टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अाढळून अाल्यास गुलाबी बोंड अळ्यांच्या व्यवस्थापनासाठी क्विनालफाॅस (२५ इसी) २ मिली प्रति लिटर पाणी या किटकनाशकाचा वापर पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात फायदेशीर ठरेल. 

मी या वर्षी २६ मेला बीटी कॉटनची लागवड केली अाहे. दोन दिवसांपूर्वी कपाशीचे निरीक्षण करत असताना काही फुलांमध्ये अशा प्रकारची गुलाबी अळी अाढळून अाली. मागील हंगामात ती अाॅगस्टमध्ये दिसली होती. या वर्षी महिनाभर अाधीच दिसून अाली अाहे. याचा परिणाम उत्पादनावर निश्चित होऊ शकतो. 
- गणेशराव नानोटे, कापूस उत्पादक, निंभारा, जि. अकोला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com