‘इनसिटू’ पद्धतीने बोर लागवड

बोर कलमापासून चांगले उत्पादन मिळते.
बोर कलमापासून चांगले उत्पादन मिळते.

बाेर फळबाग करताना ‘इनसिटू’ पद्धत फायदेशीर ठरते. त्यासाठी खड्ड्यात बिया लावून खुंट वाढवून घ्यावे. रोपे पेन्सिलच्या जाडीची झाल्यावर त्यांच्यावर चांगल्या जातीचे डोळे भरावेत.  

बोरीचे पीक हे कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगले येते. गाळाची, निचरा होणारी जमीन या पिकासाठी चांगली असते. खारवट, क्षारयुक्त तसेच थोड्याशा पाणथळ जमिनीतही बोरीचे पीक येते. 

जाती - उमराण, छुआरा, कडाका, सोन्नुर-१, कैथाली, सोन्नुर-२, मेहरुण, गोला, इलायची, सफेदा, सेब, मुक्ता, बनारसी, पेबंदी, चमेली.

अभिवृद्धी 
बोरीची अभिवृद्धी बियांपासून तसेच कलम करून करता येते. बियांपासून तयार केलेल्या झाडाचे गुणधर्म मातृवृक्षासारखे असतीलच याची खात्री नसते. तसेच त्यांना फळधारणाही उशिरा सुरू होते. बोरीचे सोटमूळ फार लवकर वाढून खोल जाते. त्यामुळे कायम जागी बी पेरून तयार केलेल्या खुंटावर डोळे भरणे फायद्याचे ठरते.  

पॅच / ठिगळ पद्धत 
जुलै-आॅगस्ट महिन्यात पेन्सिलच्या जाडीची रोपे झाल्यावर जमिनीपासून २५ ते ३० सें.मी. उंचीवर कलम करावे. या उंचीवरील खुंटाची पाने/काटे काढून टाकावीत. डोळे भरण्याच्या चाकूने खोडावरील साधारणपणे २ सें.मी. उंच व १ ते १.५ सें.मी. रुंद काटकोन चौकोनी आकाराची साल काढून टाकावी. निवडलेल्या डोळा कांडीवरील फुगीर डोळ्यासह वरीलप्रमाणे आकारमानाची साल काढून ती खुंटावरील साल काढलेल्या ठिकाणी बसवावी. डोळा उघडा ठेवून ती खालून वर पाॅलिथीनच्या पट्टीने घट्ट बांधावी. डोळा फुटू लागल्यानंतर कलमाच्या ५ सें.मी. वरील भाग छाटून टाकावा, डोळा जोमदारपणे वाढू द्यावा.

ढाल पद्धत
जुलै-ऑगस्ट महिन्यात पाऊस नसताना खुंटावर २५ ते ३० सें.मी. उंचीवर उभा २-३ सें.मी. लांबीचा काप द्यावा. काप देताना आतील लाकडास (खोडाच्या गाभ्यास) इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. डोळा असलेल्या सालीवर ढालीसारखा काप देऊन डोळा अलगद काढावा. डोळा असलेल्या सालीची लांबी खुंटावरील कापापेक्षा कमी असावी, म्हणजे डोळा चांगला बसतो. डोळा भरलेला भाग २-३ सें.मी. रुंद व २०-२५ सें.मी. लांब पॉलिथीन पट्टीने डोळा सोडून बांधून घ्यावा. डोळा फुटल्यावर खुंटाचा शेंड्याकडील भाग कलमाच्या २-३ सें.मी.वरील बाजूस कापून घ्यावा. 

गावठी झाडांचे सुधारित जातीमध्ये रूपांतर 
गावठी झाडांचे सुधारित जातीमध्ये रूपांतर करण्यासाठी मार्च-एप्रिल महिन्यात गावठी बोरीची झाडे जमिनीपासून २० ते २५ सें.मी. उंचीवर करवतीने कापून टाकावीत. कापलेल्या खोडापासून पावसाळ्यात भरपूर फुटी येतात. त्यातील ३ फुटी ठेवून इतर फुटी कापून टाकाव्यात. या फुटींवर जून-जुलै महिन्यात पॅच किंवा ढाल पद्धतीने सुधारित जातीचे डोळे भरावेत. उदा. उमराण, मेहरुण, कडाका, छुआरा.
- डॉ. शशांक भराड, ९६५७७२५७११ (उद्यानविद्या विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

लागवड
हलक्या जमिनीत ५ मीटर x ५ मीटर अंतरावर, तर मध्यम व भारी जमिनीत ६ मीटर x ६ मीटर अंतरावर लागवड करावी. लागवडीसाठी ६० x६० x ६० सें.मी. आकाराचे खड्डे करावेत. खड्ड्याच्या तळाशी पालापाचोळा टाकावा. खड्डा १५ ते २० किलो शेणखत अधिक १ किलो सिंगल सुपर फाॅस्फेट व चांगल्या मातीच्या मिश्रणाने भरून घ्यावा. खड्डा जमिनीच्यावर १० सें.मी. उंचीपर्यंत भरावा. खड्ड्यामध्ये बिया एकाच ठिकाणी न लावता १५ सें.मी. अंतरावर त्रिकोणी पद्धतीने ३ बिया लावाव्यात. उगवणीनंतर सुमारे ६-७ महिन्यांनी खड्ड्यामध्ये एकच जोमदार रोप ठेवावे. पेन्सिलच्या जाडीची रोपे तयार झाल्यावर त्यांच्यावर डोळे भरावे. 

आंतरपिके
बोरीची लागवड प्रामुख्याने हलक्या जमिनीत केली जाते. अशा जमिनीचा कस व पोत टिकविण्यासाठी आंतरपिके घेणे फायद्याचे ठरते. सुरवातीची २-३ वर्षे मूग, भुईमूग, भाजीपाला, एरंडीसारखी आंतरपिके घ्यावीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com