चारसूत्री पद्धतीने भात लागवड

डॉ. नरेंद्र काशिद
बुधवार, 19 जुलै 2017

भात लागवडीसाठी चिखलणी करताना गिरिपुष्पाची हिरवी पाने मिसळावीत. सुधारित लावणी दोरीवर १५ सें.मी. अंतरावर असलेल्या (प्रत्येक २ ते ३ रोपे/चूड) प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. त्यानंतर अंदाजाने १५ सें.मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा. अशा प्रकारे एका वेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे. 
 

भात लागवडीसाठी चिखलणी करताना गिरिपुष्पाची हिरवी पाने मिसळावीत. सुधारित लावणी दोरीवर १५ सें.मी. अंतरावर असलेल्या (प्रत्येक २ ते ३ रोपे/चूड) प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. त्यानंतर अंदाजाने १५ सें.मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा. अशा प्रकारे एका वेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे. 
 

उत्तम भात उत्पादनासाठी चार सूत्री पद्धतीचा अवलंब करावा. 
त्यातील चार सूत्रे -

सूत्र १ - भात पिकाच्या अवशेषांचा फेरवापर.
सूत्र २ - वनशेती तंत्रज्ञानाचा उपयोग करून गिरीपुष्प हिरवळीच्या खताचा मर्यादित वापर.
सूत्र ३ - सुधारित किंवा संकरित जातीच्या भाताची रोपे वापरून चुडांची नियंत्रित लावणी.
सूत्र ४ - नियंत्रित लावणीनंतर त्याच दिवशी ब्रिकेट (युरिया - डीएपी) हाताने ७-१० सें.मी. खोल खोचणे.
यातील पहिले सूत्र रोपवाटिका किंवा चिखलणीच्या वेळी, तर सूत्र २ ते ४ हे पुनर्लागवडीच्या वेळी अवलंबावीत.
 

सूत्र १ 
भातपिकाच्या अवशेषांतील (तुसाचा व पेंढ्याचा) सिलिकॉन व पालाश या अन्नद्रव्यांचा फेरवापर.

अ) भाताच्या तुसाची काळी राख रोपवाटिकेत बी पेरण्यापूर्वी मिसळणे
भाताची काळी राख (पूर्ण जळालेली पांढरी राख नव्हे) रोपवाटिकेमध्ये, गादीवाफ्यात भाताचे बी पेरण्यापूर्वी प्रति चौरस मीटर एक किलो या प्रमाणे ४ ते ७ सें.मी. खोलीपर्यंत मातीत मिसळावी. नंतर प्रक्रिया केलेले भाताचे बी त्याच ओळीत पेरावे.

ब) भाताचा पेंढा पुनर्लागवडीपूर्वी शेतात गाडणे 
भाताचा पेंढा पहिल्या नांगरणीच्या वेळी हेक्‍टरी २ टन या प्रमाणात शेतात गाडून घ्यावा.

फायदे -
भातपिकांना सिलिका व पालाश यांचा पुरवठा होतो. पालाश २०-२५ किलो आणि सिलिका १००-१२० किलोपर्यंत उपलब्ध होते. सेंद्रिय पदार्थात वाढ होते.
रोपे निरोगी व कणखर होतात.
 रोपांच्या अंगी खोडकिडा यांना प्रतिकार करण्याची क्षमता वाढते.
 भाताचे उत्पादन वाढण्यास मदत होते.

सूत्र २ 
गिरिपुष्प (ग्लिरिसिडीया) हिरवळीच्या खताचा वापर
गिरिपुष्पाच्या फांद्या जमिनीपासून ३० ते ४० सें.मी. उंचीवर तोडाव्यात. सर्वसाधारणपणे २ ते ४ गिरिपुष्पाच्या झाडांची हिरवी पाने (अंदाजे ३० किलोग्रॅम) प्रति आर पुरेसे होते. त्याच झाडाच्या तोडलेल्या फांद्या चिखलणीपूर्वी ६ ते ८ दिवस अगोदर खाचरात पसराव्यात. आठवड्यात फांद्यांवरील पाने गळून पडतात. उरलेल्या फांद्या गोळा करून जळणासाठी इंधन म्हणून वापराव्यात. चिखलणी करून गळून पडलेली पाने चिखलात चांगल्या रीतीने मिसळून घ्यावीत.

फायदे -
यामुळे भातरोपांना सेंद्रिय - नत्र (हेक्‍टरी १० ते १५ किलोग्रॅम) वेळेवर मिळते. 
खाचरात सेंद्रिय पदार्थ मिसळले गेल्याने जमिनीची जडणघडण सुधारून उत्पादन क्षमता वाढते. 
सेंद्रिय पदार्थ मर्यादित प्रमाणात गाडले जातात. पर्यायाने भात खाचरांतून निर्माण होणाऱ्या मिथेन वायूचे प्रमाणात (म्हणजेच हवेचे प्रदूषण) घट होते.
गिरिपुष्पाच्या झाडापासून उंदीर लांब पळतात. भातातील त्यांचा प्रादुर्भाव कमी राहण्यास मदत होते.  

सूत्र ३ 
नियंत्रित लावणी 
नियंत्रित लावणी करावयाच्या सुधारित दोरीवर २५ सें.मी. व १५ सें.मी. आलटून-पालटून (२५-१५-२५-१५ सें.मी.) अंतरावर खुणा कराव्यात. सुधारित लावणी दोरीवर १५ सें.मी. अंतरावर असलेल्या (प्रत्येक २ ते ३ रोपे/चूड) प्रथम एक व नंतर दुसरा चूड लावावा. त्यानंतर अंदाजाने १५ सें.मी. पुढे आणखी तिसरा व चौथा चूड लावावा. अशा प्रकारे एका वेळी जोड-ओळ पद्धत वापरून त्याच दोरीत लावणीचे काम पूर्ण करावे. लावणी करताना प्रत्येक चुडात २ ते ३ रोपे लावावीत. संकरित भातासाठी एका ठिकाणी एक रोप लावावे. रोपे सरळ व उथळ (२ ते ४ सें.मी. खोलीवर) लावावीत.

फायदे -
प्रचलित पद्धतीपेक्षा बियाण्यांची ३० टक्के बचत होते. 
ओळीत झालेल्या लागवडीमुळे कापणी सुलभ होते. कापणीवरील मजुरीचा खर्च कमी होतो.
चार रोपांच्या मध्ये ब्रिकेट (खतांच्या गोळ्यांचा) कार्यक्षम वापर करता येतो. 
 

सूत्र ४ 
युरिया -डीएपी ब्रिकेटचा वापर

नियंत्रित लावणीनंतर त्याच दिवशी प्रत्येक चार चुडांच्या चौकोनात मधोमध सरासरी २.७ ग्रॅम वजनाची (युरिया - डीएपी) १ ब्रिकेट (खताची गोळी) हाताने ७-१० सें.मी. खोल खोचावी. 
युरिया - डीएपी खत (६०ः४० मिश्रण) वापरून ब्रिकेट (२७ ग्रॅम/ १० ब्रिकेट) उशीच्या आकारात यंत्राच्या साह्याने (ब्रिकेट तयार करण्याचे मशिन) तयार करता येतात. भात लागवड क्षेत्रामध्ये एखादे यंत्र सामुदायिकरीत्या घेतल्यास स्वस्तामध्ये ब्रिकेट उपलब्ध होऊ शकतात. त्याच प्रमाणे एखाद्या व्यक्तीला रोजगार मिळू शकतो.
एक गुंठे क्षेत्रामध्ये ६२५ ब्रिकेट (१.७५ किलोग्रॅम) पुरतात.
यातून उपलब्ध होणारी खताची मात्रा (प्रतिहेक्‍टरी) ः ५७ किलोग्रॅम नत्र + २९ किलोग्रॅम स्फुरद.

फायदे -
पाण्याबरोबर नत्र व स्फुरदयुक्त खत वाहून जात नाही. खतामुळे होणारे प्रदूषण टळते. दिलेल्या खतांपैकी ८० टक्‍क्‍यांपर्यंत नत्र भातपिकास उपयोगी पडते.
खतात ४० टक्‍क्‍यांपर्यंत बचत होते. 
ब्रिकेट खोल खोचल्यामुळे अन्नद्रव्ये तणाला मिळत नाहीत. तणाचा त्रास कमी होतो.
भाताचे उत्पादन (दाणे व पेंढा) निश्‍चित वाढते. भात शेती फायद्याची होते.
लावणी भातासाठी नत्र व स्फुरद वापरण्याची ही कार्यक्षम पद्धत आहे.

तणनियंत्रण
पुनर्लागवडीनंतर १५ दिवसांनी पहिली बेणणी करून तण काढून टाकावे. 
शेताची स्थिती आणि तणांची तीव्रता यानुसार दर १५ दिवसांनी बेणणी अथवा कोळपणी पीक पोटरीत येईपर्यंत करावी.
लावणीनंतर भात खाचरांमध्ये सतत ५ ते ६ सें.मी.पर्यंत पाण्याची उंची ठेवल्यास तणांचा बंदोबस्त होण्यास मदत होते.

Web Title: agro news Planting rice in a four way