उत्कृष्ट दर्जा ठेवल्यानेच चिमणेंच्या डाळिंबाला मागणी

उत्कृष्ट दर्जा असल्यानेच चांगला दर मिळविणे चिमणे यांना शक्य झाले.
उत्कृष्ट दर्जा असल्यानेच चांगला दर मिळविणे चिमणे यांना शक्य झाले.

दुष्काळी परिस्थिती व वातावरणातील बदल यामुळे शेतीत विविध अडचणी निर्माण होत आहेत. मात्र जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी येथील विजय चिमणे यांनी सर्व बाबींवर मात करत सहा एकरांतील डाळिंबबागेत यशस्वी उत्पादन घेत चांगला नफाही मिळवला आहे. पाण्याची शाश्वतता निर्माण करीत त्यांनी दर्जेदार फळनिर्मितीवर भर दिला. म्हणूनच व्यापारीदेखील चांगला दर देऊन त्यांच्याकडून डाळिंबाची खरेदी करण्यात उत्सुकता दाखवत आहेत. 

जालना जिल्हा मोसंबीच्या उत्पादनात आघाडीवर आहे; परंतु २०१२ व त्यानंतरच्या दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या बागा नष्ट झाल्या. अनेकांनी त्या प्राप्त परिस्थितीत जतनही करण्याचा प्रयत्न केला. दुष्काळाचे सावट नियमित राहू लागल्याने या भागातील शेतकरी पिकांचे अन्य पर्याय शोधू लागला. डाळिंबासारखे पीक त्यांना महत्त्वाचे वाटू लागले. काहींना या पिकात यश मिळविता आले; तर काहींना नियोजनाअभावी अपयशदेखील आले. 

चिमणे यांची प्रयोगशीलता 

तीर्थपुरी (ता. घनसावंगी) येथील विजय एकनाथ चिमणे मात्र अत्यंत धडपडी स्वभावाचे शेतकरी. दुष्काळाशी सामना त्यांनाही करावा लागलाच. त्यांचीही वडिलोपार्जित चोवीस एकर जमीन अाहे. आई-वडील व एक बंधू आहेत. बंधू तात्यासाहेब राजकारणात असून, माजी सभापती आहेत. 

शेतीची बहुतांश जबाबदारी विजय यांच्यावरच आहे. वीस एकरांतील सात एकर क्षेत्र माळरानावर आहे. पूर्वी पारंपरिक पद्धतीने शेती करण्यात येत असल्याने फारसे उत्पन्न मिळत नव्हते. ऊस, कापूस, मूग, सोयाबीन अशी पिके होती. विजय यांनी शेतीत बदल करण्याचा निर्णय घेताना आधुनिक पद्धतीचा वापर व पीकबदल महत्त्वाचा ठरवला. 

डाळिंबाची लागवड

पूर्वी १५ एकरांपर्यंत ऊस होता. मात्र ते कालातंराने कमी करून त्या जागी डाळिंब घेण्यास सुरवात केली. बंधू तात्यासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सहा एकरांतील जमिनीची आडवी उभी नांगरट करत जानेवारी २०१२ मध्ये टिश्यूकल्चर अर्थात ऊतिसंवर्धित ‘भगवा’ वाणाच्या डाळिंब रोपांची लागवड केली. लागवडीचे अंतर १४ बाय १० फूट असून, सहा एकरांत सुमारे १४०० झाडे आहेत.

होते आंबिया बहराचे नियोजन

लागवडीनंतर अठरा महिन्यांनी आंबिया बहराचे नियोजन करण्यात आले. यासाठी छाटणी, पाण्याचे नियोजनही करण्यात आले. आवश्‍यकतेनुसार ठिबक सिंचनाद्वारे झाडाला पाणी देण्यात आले. गेल्या पाच वर्षांपासून बागेची निगराणी अत्यंत काळजीपूर्वक करण्यात आली. त्यातून फळाचा दर्जाही सुधारला. विविध रोगांवर नियंत्रण राखण्यात यश आले. व्यापाऱ्यांकडूनही चांगली मागणी असून, चांगला दर दिला जातो आहे.

पाण्याची व्यवस्था

दोन विहिरी, एक बोअरवेल अशी पाण्याची व्यवस्था होती. दुष्काळी परिस्थिती वारंवार निर्माण होत असल्याने पाण्याचे स्रोत कमी पडू लागले. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी डाळिंब लागवडीच्या सात एकरांपैकी एका एकरात शेततळे निर्माण केले. त्यातून सहा एकरांतील डाळिंबबागेतील पाण्याची अडचण दूर झाली. दोन किलोमीटर अंतरावरून डाव्या कालव्यावरून पाइपलाइन करण्यात आली. त्यामुळे कालव्याला पाणी आले की तेवढी पाणीटंचाई भासत नाही. दुष्काळी परिस्थितीत शेततळ्याचा मोठा आधार होत असल्याने त्या काळातही डाळिंबाच्या बागा जतन करण्यास मदत झाली. शेततळ्यासाठी जवळपास साडेसहा लाख रुपये खर्च झाले. आणखी दोन एकरांत शेततळे तयार करण्याचे नियोजन असल्याचे चिमणे यांनी सांगितले.

डाळिंबाचे उत्पादन

सन २०१४ मध्ये सहा एकरांतून सुमारे २० टन उत्पादन मिळाले. त्यास किलोला ६० रुपये दर मिळाला. सन २०१५ मध्ये एकूण क्षेत्रातून ३० टन उत्पादन; तर किलोला ५८ रुपये दर मिळाला. 

मागील वर्षीदेखील किलोला ६० रुपये असा दर मिळाला. यंदा आंबेबहाराचा ३४ टन माल व्यापाऱ्यांना दिला आहे. अद्याप २० टनांची विक्री होईल, अशी चिमणे यांना अपेक्षा आहे. साडे ४२ रुपये दराने आत्तापर्यंत माल दिला. सध्या मात्र हा दर ३० रुपयांप्रमाणे सुरू असल्याचे ते म्हणाले.   

गेल्या तीनही हंगामांत डाळिंबाचे समाधानकारक उत्पन्न मिळाल्याने दुष्काळात मोठा आधार झाला आहे. अजून सहा एकरांत हे पीक वाढवण्याचे त्यांचे नियोजन आहे. एखाद्या वर्षी उत्पादन चांगले असते, त्या वेळी दर कमी असतो आणि बाजारात आवक कमी असते त्या वेळी दर चांगले असतात हा नित्य अनुभव घेत असल्याचे चिमणे म्हणाले. 

- विजय चिमणे, ९०७५७८२५५५

मित्रांचा सल्ला ठरला मोलाचा 
डाळिंबाचा दर्जा चांगला आहे, हीच दर चांगला मिळण्याची जमेची बाजू असल्याचे चिमणे म्हणाले. 

अौरंगाबाद, जालना भागातील अनुभवी डाळिंब उत्पादकांसोबत त्यांनी चांगली मैत्री केली आहे. 

कोणतीही अडचण आली तरी ते मित्रांचा सल्ला घेतात.

तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून त्यांनी खतांचे व व्यवस्थापनाचे वेळापत्रक बसवले आहे. एक वर्षाआड प्रत्येक झाडाला २० किलो शेणखत देण्याचे त्यांचे नियोजन राहते. 
 

अन्य पिकांचे कुशल नियोजन
२४ एकरांपैकी सहा एकरांत ऊस आहे. आठ एकरांत न्यूसेलर मोसंबीची मागील वर्षी लागवड केली आहे. त्यात सोयाबीन व हरभरा यांचे आंतरपीक घेत पूरक उत्पन्नही मिळविले आहे.  

दोन एकर क्षेत्र नव्या शेततळ्यांची राखीव ठेवले अाहे; तर दोन एकर क्षेत्र विहिरी व जनावरांचा चारा यासाठी उपयोगात आणले आहे.  
 

मार्केटचा केला अभ्यास 
डाळिंबाची लागवड करण्यापूर्वी सोलापूर, नाशिक, नांदेड, वाशी अशा सर्व मार्केटला फिरून चिमणे यांनी आवक व दर यांचा अभ्यास केला. त्यामुळे बहाराचे व मार्केटचे नियोजन करणे सोपे झाले.

पूर्णवेळ शेतीत राहणेच महत्त्वाचे 

शेतीत यशस्वी व्हायचे, तर शेतकऱ्याने पूर्णवेळ शेती करायला पाहिजे. मी पहाटे पाच वाजता उठून शेतीकामांना सुरवात करतो. संध्याकाळपर्यंत माझा दिवस शेतीतच व्यतीत होतो. एक ध्येय केंद्रस्थानी ठेवून काम केल्यास यश मिळते, असे चिमणे सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com