डाळिंबही होतेय कडवट

डाळिंबही होतेय कडवट

यंदा डाळिंबाच्या बाजाराने दहा वर्षांतील नीचांकी पातळी गाठली असून, सातत्याने बाजारभाव दबावात आहेत. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. गेल्या दहा वर्षांत डाळिंबाच्या बाजाराने नवनवे उच्चांक गाठले. द्राक्षाच्या तुलनेत सोपे आणि कमी भांडवली गुंतवणुकीचे पीक असल्यामुळे त्याकडे शेतकऱ्यांचा ओढा आहे. मात्र, नोटाबंदीनंतर डाळिंबाचा बाजार सातत्याने मंदीत राहिला असून, गेल्या दहा वर्षांत प्रथमच आठ महिन्यांपेक्षा अधिक काळ मंदी चालली आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या फलोत्पादनविषयक दुसऱ्या आगाप पाहणीत २०१६-१७ मध्ये २४.४ लाख टन उत्पादनाचे अनुमान दिले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादनात एक लाख टन वाढ आहे. चालू पाहणीनुसार देशात २०.९ लाख हेक्टर क्षेत्रावर डाळिंबाची लागवड आहे. गेल्या तीन वर्षांत देशातील डाळिंबाचे उत्पादन व लागवड क्षेत्रात लक्षणीय वाढ दिसत आहे. २०१३-१४ मध्ये १३ लाख हेक्टरवर डाळिंबाचे क्षेत्र होते. ते आजघडीला ६० टक्क्यांनी वाढले आहे. उत्पादन २४.४ लाख टनावर पोचले. ८० टक्क्यांची वाढ दिसतेय. बाजारभावात जो सातत्याने दबाव दिसतोय, त्याचे कारण वरील आकडेवारीत शोधता येईल.

देशातील डाळिंबाखालील क्षेत्र आणि उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा निम्म्याहून अधिक आहे. २०१५-१६ मध्ये राज्यातील क्षेत्र १२.८ लाख हेक्टर तर उत्पादन १४.८ लाख टनापर्यंत पोचले. आधीच्या तीन वर्षांशी तुलना करता क्षेत्रात ४२ टक्के तर उत्पादनात ५७ टक्के वाढ झाली. २०१५-१६ मधील आकडेवारीनुसार देशातील डाळिंबाच्या क्षेत्रात ६६ टक्के तर उत्पादन ६७ टक्के वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्राखालोखाल कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश या राज्यात डाळिंबाचे उत्पादन घेतले जाते.

२०१५-१६ मध्ये कर्नाटकात २.८, गुजरातेत २.१ तर आंध्रात १.१ लाख टन उत्पादन झाले होते. मागील तीन वर्षांत महाराष्ट्रातील उत्पादनाच्या दुप्पट वेगाने कर्नाटक आणि गुजरातमधील उत्पादन वाढले आहे, हे विशेष. 
देशांतर्गत मागणीच्या तुलनेत उत्पादनवाढीचा वेग अधिक असल्याचे महाराष्ट्रातील तज्ज्ञ, अधिकारी आणि शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

"गुजरातमधील भूज, कच्छ यासह राजस्थान, मध्य प्रदेश आदी राज्यांत डाळिंबाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. तेथील काही शेतकरी शंभर एकरापेक्षा अधिक क्षेत्रात लागवड करत आहेत. कर्नाटकातही महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर रोपे जात आहेत. एकूणच देशभरात डाळिंबांच्या पुरवठ्यात वाढ होईल असे दिसते. त्यामुळे बाजारात दीर्घकालीन मंदीचे संकेत मिळत आहेत. मात्र, गुणवत्तापूर्ण मालास तुलनेने चांगला दर मिळेल. दुसऱ्या व तिसऱ्या दर्जाच्या मालास किफायती दर मिळणार नाही," असे महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. विनय सुपे म्हणाले.

डाळिबांत आघाडीवर असलेल्या कसमादे पट्ट्यात तेल्याचा प्रभाव कमी झाला असून, यामुळे नव्याने शेतकरी डाळिंबाकडे वळत आहेत, असे प्रगतिशील शेतकरी नामदेव भामरे सांगतात. राज्यात मराठवाडा, विदर्भात डाळिंबाखालील क्षेत्र लक्षणीय प्रमाणात वाढले. या भागात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव सांगोला-सटाण्याइतका तीव्र नाही. उत्तर व पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत येथील शेतकऱ्यांची जमीनधारणा अधिक आहे. कसमादे विभागात शेतकरी ३०० ते ५०० झाडांपासून सुरवात करतात. विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी १००० ते १५०० झाडांपासून सुरवात करतो. त्यामुळे तेथील पुरवठा भविष्यात वाढणार आहे, असे भामरे यांचे मत आहे.

नोटाबंदीनंतर डाळिंबाचा बाजार पडला, तो अजूनपर्यंत वधारलेला नाही. संपूर्णपणे कॅशवर चालणारा डाळिंबाचा बाजार पूर्णपणे विस्कळित झाला. तेव्हापासून व्यापाऱ्यांकडून मागणी थंडावली असून, मालास पाहिजे तसा उठाव मिळत नाही. नोटाबंदीच्या आधी प्रतिकिलो १०० रुपयांच्या आसपास असणारा बाजार आज ३० ते ४० रुपयांपर्यंत घसरला आहे. सध्याचा डाळिंबावरील खर्च पाहता या भावात फार काही किफायती मोबदला मिळत नाही, असे प्रगतिशील शेतकरी नितीलाल दळवी सांगतात.

भविष्यात डाळिंबाची शेती किफायती करण्यासाठी निर्यातीचा पर्याय आहे. त्यासाठी सध्याचे डाळिंब शेतीचे स्वरूप बदलण्याची गरज आहे, असे मंगळवेढा येथील शेतकरी अंकुश पडवळे यांचे म्हणणे आहे. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारासाठी कीडनाशक अंशमुक्त (रेसिड्यू फ्री) डाळिंबाचे मार्केट विकसित करण्याला अग्रकम दिला पाहिजे. त्यासंबंधी प्रचार-प्रसार होण्याची गरज आहे. यंदा जेव्हा-जेव्हा बाजार प्रतिकिलो ५० रुपयांच्या वर जाऊ पाहत होता, त्यावेळी लगेचच पुरवठा वाढून दर पडत होते. ही धोक्याची घंटा असून, भविष्यात बाजार मंदीत राहील असे दिसते. यामुळे आतापासून निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण मालाकडे वळावे लागणार आहे. अन्यथा सध्याप्रमाणे पुरवठा वाढत राहिला तर कोणालाच परवडणार नाही, याकडे पडवळे लक्ष वेधतात.

सारांश, अत्यंत भरवशाचा आणि खात्रीने उत्पादन देणारा डाळिंबाचा बाजार आता कमालीचा अस्थिर आणि बेभरवशाचा झाला आहे. यामुळे डाळिंबात गुंतवणूक करताना बाजाराचा कल लक्षात घेणे अधिक सयुक्तिक ठरेल.

(लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com