मधमाश्‍यांच्या वसाहतींचे पावसाळ्यातील व्यवस्थापन

मधमाश्‍यांच्या वसाहतींचे पावसाळ्यातील व्यवस्थापन

वर्षभरातील तीन ऋतुंमुळे भारतातील हवामान आणि फुलोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विविधता अाढळते. उष्ण कटिबंधीय प्रदेशापासून ते शीत कटिबंधातील प्रदेश भारतात आहेत, यामुळे फुलणाऱ्या वनस्पती आणि त्यांचा फुलण्याचा काळ यामध्ये फरक आढळतो. हवामान आणि फुलोऱ्यातील विविधतेमुळे मध उत्पादनासाठी किंवा वसाहत विभाजन करण्यासाठी एकच पद्धत सर्वत्र अवलंबिता येत नाही. त्यासाठी हंगामानुसार मध उत्पादन किंवा वसाहत विभाजनामध्ये बदल करणे अावश्यक असते. 
 

मध उत्पादन आणि वसाहत विभाजन हे मुख्य चार गोष्टींवर अवलंबून असते.
योग्य आकाराच्या मधुपेट्या
उत्तम बारमाही फुलोरा
मधमाश्‍यांची उत्तम वीण
वसाहतीची योग्य देखभाल
या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून सुसूत्रित कार्यक्रम आखला तरच हवे असलेले ध्येय साध्य करता येते. अापल्या प्रदेशातील फुलोरा आणि हवामाना विषयी माहिती असल्यास योग्य देखभालीचा आराखडा तयार करता येतो. मधमाश्यांच्या वसाहतींच्या देखभालीचे तंत्र दर ५ किलोमीटरनंतरदेखील बदलू शकते. मधमाश्यांच्या वसाहतीच्या देखभालीसाठी वर्षाचे एकूण चार विभाग पाडता येतात.

पावसाळा - जून ते सप्टेंबर, 
पावसाळ्यानंतरचा हंगाम : ऑक्टोबर ते नोव्हेंबर, 
थंडीचा काळ - डिसेंबर ते जानेवारी, 
वसाहत वाढीचा आणि मधउत्पादनाचा मुख्य हंगाम - फेब्रुवारी ते मे 
या चार हंगामात मधमाश्यांच्या वसाहतींची कशी देखभाल करायची ते आपण पाहू. या देखभालीत पुन्हा दोन प्रकार येतात - १) स्थिर किंवा स्थानिक स्थलांतराने मधमाशीपालन आणि २) स्थानिक व दूरस्थ स्थलांतराने मधमाशीपालन 

स्थिर किंवा स्थानिक स्थलांतराने मधमाशीपालन

पावसाळी व्यवस्थापन - 
मे महिन्याच्या अखेरीस मधाचा हंगाम संपत आलेला असतो. पराग आणि मकरंद मिळण्याचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते, त्यामुळे राणी मधमाशी अंडी देण्याचे काम थांबवते. कामकरी मधमाश्‍यांचा जास्तीत जास्त मधाचा साठा करण्याकडे कल असतो. रिकाम्या पिलाव्याच्या चौकटीतदेखील मधमाशा मध साठविण्यास सुरवात करतात. मे महिन्याच्या अखेरीस ढगाचे व वाऱ्याचे प्रमाण वाढू लागते. पावसाळ्यात सततच्या पावसामुळे सूर्यदर्शन होत नाही. खाद्याचा अभाव, पावसामुळे पेटीच्या बाहेर जाता येत नाही, प्रतिकूल हवामान असते. मेणकिडे, बुरशी व इतर शत्रूचे याच काळात प्राबल्य वाढते त्यामुळे मधमाश्यांच्या वसाहती कमजोर होतात. त्यासाठी वसाहतींची योग्य काळजी घेणे गरजेचे असते.

वसाहतींची तपासणी-
मधाचा हंगाम संपत अाल्यावर मधमाश्यांच्या वसाहतींची पूर्ण तपासणी करावी. वसाहतीत पिलावा कोणकोणत्या अवस्थेतील आहे, उदा. अंडी, अळ्या, कोष यांची नीट नोंद करावी. राणी मधमाशी असल्याची खात्री करून घ्यावी. 

वसाहतीत पुढील अडीच ते तीन महिने पुरेल इतका मधसाठा असल्याची खात्री करावी. भरणा जास्त असल्यास मधुकोठीतील काही चौकटीतून मध न काढता मधुकोठीतील मधू चौकटी तशाच ठेवाव्यात. 

पिलाव्याच्या चौकटीत असलेला मध अजिबात काढू नये. राणी माशी दोन वर्षांपेक्षा अधिक वयाच्या असतील आणि वसाहती कमजोर म्हणजेच ४ चौकटीच्या असतील तर अशा वसाहती पावसाळ्यात जगण्याची शक्यता कमी असते. अशा वेळेला जुन्या राण्या काढून टाकून कागद पद्धतीने वसाहती मिसळाव्यात. 

तरुण राण्या असलेल्या वसाहती पावसाळ्यात तग धरून राहतात. तरुण राणीमधमाशी असलेल्या व भरपूर मधाचा साठा असलेल्या सशक्त वसाहती पावसाळ्याच्या प्रतिकूल परिस्थितीवर योग्य प्रकारे मात करतात. 

ज्या घरात मधमाश्‍या राहतात, त्या पेटीचीसुद्धा पुढील प्रमाणे काळजी घेणे गरजेचे आहे.

पेटी पावसाळ्यात झाडाखाली न ठेवता, शक्यतो कमी भिजेल, तसेच वारा, थंडी, पावसाचे तुषार पेटीच्या दारातून आत जाणार नाही, अशा सुरक्षित ठिकाणी ठेवावी. 

पेटीमध्ये इतर कीटकांचा वा प्राण्यांचा शिरकाव होऊ शकतो. उदा. मुंग्या, पाली, सरडे, उंदीर यासाठी पेटीचे दार पुठ्याने वा मातीने लिंपून लहान करावे. मुंग्यापासून पेट्या सुरक्षित राहण्यासाठी योग्य जागेची निवड करावी. 

पेटी ज्या स्टँडवर ठेवली आहे, त्या स्टँडला ग्रीस लावावे म्हणजे मुंग्या त्यावरून पेटीमध्ये जाणार नाहीत. पेटीच्या वरील झाकण व्यवस्थितरीत्या नीट बसले आहे याची खात्री करून घ्यावी. 

मधमाशांना योग्य वायुविजनची आवश्यकता असते. अती दमट व कोंदट हवेमुळे मधमाशांना त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात वसाहतीची १५ ते २० दिवसांच्या अंतरावर जुजबी तपासणी करावी. 

तपासणीदरम्यान मधमाश्‍या सर्व पोकड्यांवर आहेत का ते तपासावे. काही पोकड्या मधमाश्‍यांनी सोडल्या असल्यास त्या काढून टाकाव्यात म्हणजे मेणकिड्यांचा त्रास कमी होतो.

जास्त प्रमाणात फुले फुलू लागतात व मधमाशांना निसर्गात पराग मिळण्यास सुरवात होते. कोषावस्थेत असणाऱ्या मधमाश्‍या बाहेर पडल्यावर पोकड्या एक एक करून काढून टाकणे गरजेचे आहे. 

मेणपत्रा चिकटवलेल्या एक-एक चौकटी देणे गरजेचे आहे. प्रत्येक वसाहतीला या वेळेला सुमारे २०० ते ५०० मिलिलिटर पाक द्यावा. यामुळे मधमाशा नवीन पोकड्यांची निर्मिती करतात. राणी या नवीन पोकड्यांवर अंडी घालू शकते. 

सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीपर्यंत वसाहतीत बऱ्याच प्रमाणात तरुण नव्या कामकरी मधमाशा तयार होतात. 

पावसाळा संपताच या मधमाश्‍या लगेच कामाला लागत असल्यामुळे पावसाळ्यानंतर वसाहतींची वाढ जोमाने होते. पावसाळ्यानंतर ऊन पडू लागले, की बऱ्याच वसाहती, पेट्या सोडून गृहत्याग करतात. 

पावसाळ्यातील पेट्यांच्या योग्य देखभालीच्या पद्धतीमुळे गृहत्यागाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होते, एवढेच नव्हे तर पावसाळ्यानंतर येणाऱ्या मधाच्या हंगामात ताज्या दमदार कामकरी माशांमुळे वसाहतींची संख्या वाढविता येते अाणि जास्त मधाचे उत्पादन घेता येते.
- प्रशांत सावंत, ९१७२९५५५७६, 
- सारिका सासवडे, ९४२३५७७१९६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com