सेवानिवृत्त प्राचार्य झाले शेतीत प्रयोगशील ‘विद्यार्थी’

सेवानिवृत्त प्राचार्य झाले शेतीत प्रयोगशील ‘विद्यार्थी’

शेती समृद्ध करण्यासाठी कधीच वयाची अट नसते. केवळ लागते आवड, जिद्द आणि अभ्यास. हेच ध्येय डोळ्यांसमोर ठेऊन सावर्डे (जि. सांगली) येथील सेवानिवृत्त प्राचार्य राजाराम व पत्नी सौ. मंगल या माने दांपत्याने उतरत्या वयातही शेतीला प्रयोगशील केले आहे. मजूर व पाणी यांची तुलनेने कमी गरज भासणाऱ्या पिकांची निवड करीत मालाला बाजारपेठही देण्याचा प्रयत्न केला आहे. 
 

सांगली जिल्ह्यातील तासगाव हा द्राक्ष व बेदाणा उत्पादनासाठी राज्यात ओळखला जातो. याच तालुक्‍यातील सावर्डे गाव तासगावपासून अवघ्या दहा किलोमीटरवर वसले आहे. द्राक्षाची निर्यातक्षम करणारे व सांस्कृतिक वारसा जपलेले पैलवानांचे गाव अशा सावर्डेची अोळख आहे. 

याच गावातील राजाराम मारुती माने यांची एकत्रित कुटुंबाची आहे. सात एकर बागायती तर १८ एकर जिरायती आहे. पाण्याची कमतरता असल्याने पिकांवर मर्यादा यायच्या. काका शिवराम नारायण माने व काकी सौ. करुणा यांनी राजाराम व लहान बंधू वसंत यांना शिक्षण दिले. आर्थिक समस्या असल्याने नोकरी करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. राजाराम स्वतःच्या पायावर उभे राहिले. शिक्षणासाठी त्यांचं वास्तव्य सातारा, सांगली जिल्ह्यातच गेलं. सन १९७२ च्या सुमारास कोकणात कणकवली महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी पत्करली. 

सेवानिवृत्तीनंतरची शेती 
माने यांना पत्नी सौ. मंगल यांनी चांगली साथ दिली. सुमारे २८ वर्षे शिक्षण क्षेत्रात सेवा करीत ते प्राचार्यही झाले. सन २००० मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृती घेतली. यादरम्यान ते गावी परतले. घरच्या शेतीतच लक्ष घालायचे ठरवले. नोकरीतून निवृत्ती घेतली असली तरी कामातून ती घेतली नव्हती. सुमारे २८ वर्षांचा जीवनकाळ कोकणात गेल्याने तेथील सौंदर्य, आंबे, फणस, काजू आदी पिकांनी भूरळ घातली. हीच पिकं शेती करण्यासाठी प्रेरणादायी ठरल्याचे ते सांगतात. घरी अशीच शेती करण्याचं त्यांनी मनाशी पक्कं केलं आणि प्रवास सुरू झाला. 

द्राक्ष, शेवग्याची शेती 
सावर्डे पंचक्रोशी द्राक्ष पिकासाठी प्रसिद्ध आहे. सन २००१ च्‍या सुमारास काका आणि बंधू यांच्याशी चर्चा करून द्राक्षाची शेती सुरू केली. आठ एकरांवर हे पीक घेतले. या भागातील प्रगतशील शेतकरी नामदेव बापू माने, सुभाष आर्वे यांचे मार्गदर्शन घेतले. या पिकात माने यशस्वीदेखील झाले. मात्र, पुढे मजूरबळाची मोठी अडचण येऊ लागली. उतरत्या वयात कामाच्या काही मर्यादाही होत्या. अखेर दुसऱ्या पिकाचा शोध सुरू झाला. कोकणात प्रत्येकाच्या घरासमोर शेवगा असतो. हे पीक सातत्याने उत्पादनही देते. त्याचीच प्रेरणा घेत दीड एकरावर शेवगा घेतला. ॲग्रोवनमधील लेखांमधून व्यवस्थापन, छाटणी याबाबत अधिक मार्गदर्शन मिळत गेले. गावातील तरुणांना या पिकासाठी प्रोत्साहन देण्याचे कामही त्यांनी केले 
आहे. 

केशर आंब्याची शेती 
कोकणातील आंबा पिकाचा प्रभाव होता. मात्र, प्रतिकूल हवामानातही येऊ शकेल अशा केशर आंब्याची लागवड करायचे ठरवले. आज झाडे सात वर्षांची होऊन उत्पादनही देऊ लागली आहेत. सध्या बाराशे झाडांचे संगोपन केले जात आहे. विक्रीसाठी कुठेही बाजारपेठ शोधावी लागली नाही. नैसर्गिक किंवा सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेतले जाते. नैसर्गिक पद्धतीनेच तो पिकवला जात असल्याने घरूनच ग्राहक तो घेऊन जातात. त्याचबरोबर मणेराजुरी व तासगाव येथून विक्री केली जाते. त्याचे कारण म्हणजे नैसर्गिक पद्धतीने आंबा पिकविला जातो. प्रतवारीनुसार किलोला १०० ते दोनशे रुपयांपर्यंत दर मिळतो. प्रतिझाडास १५० ते २०० फळे लागतात. हंगामात हाताने सहज फळकाढणी करता येते. छाटलेल्या पाल्याचे आच्छादन केले जाते. यामुळे वाफसा कायम राहण्यास मदत मिळते. 

ड्रॅगन फ्रूटची शेती 
ॲग्रोवनच्या सहा ऑक्‍टोबर, २०१५ या दिवशीचा ड्रॅगन फ्रूट पिकाविषयीचा विशेषांक हाती पडला. या फळाचे महत्त्व, त्यातील पोषणद्रव्ये, यशकथा आदींनी प्रयोगाला प्रेरणा दिली. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे नामदेव माने यांच्या साथीने माळशिरस येथे ड्रॅगन फ्रूटची शेती पाहिली. हा प्रयोग केला. आज सुमारे ६०० वेलींचे संगोपन केले जात आहे. या पिकाला अन्य पिकांच्या तुलनेत मजूरबळ, पाणी या बाबी कमी लागतात. मूरमाड, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन लागते. या बाबी अनुकूल ठरल्या.  

विक्रीचे प्रयत्न 
विक्रीमध्ये पुन्हा ॲग्रोवनचाच आधार झाला. विक्रीसाठी कृषी विभाग, डॉक्‍टर यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला. याविषयी माने सांगतात, की ॲग्रोवनमधील या फळाविषयीच्या माहितीची छायाप्रत आणि फळे घेऊन मी कृषी विभाग आणि डॉक्‍टर यांच्या दारात उभा राहायचो. फळ आणि अंक त्यांना द्यायचो. पहिल्या उत्पादनातील सुमारे एकहजार फळे अशा रितीने वाटली. डॉक्‍टर देखील आपल्या रुग्णांना आमच्याकडे पाठवित. त्यामुळे विक्री व्यवस्था सोपी झाली. सुमारे १०० ते १५० रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला. यंदाच्या हंगामात सांगली, मिरज, पलूस, तासगाव तालुक्‍यातील किरकोळ फळ विक्रेत्यांनाही या दराने विक्री करणे सोपे झाले. 

नर्सरीद्वारे करणार रोपवृद्धी 
रोपांची किंमत सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडली पाहिजे असे माने यांना वाटते. सध्या रोपांची किंमत त्या मानाने जास्त असल्याचे ते म्हणतात. याचदृष्टीने रोपवाटिका तयार करून तुलनेने कमी किमतीला रोपे देण्याचा त्यांचा विचार आहे.  
- राजाराम माने, ९८९०१७०७९४

माने यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 
सेंद्रिय शेतीवर सर्वाधिक भर 
ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन
एप्रिल-मेच्या दरम्यान तापमान वाढते. यामुळे ‘ड्रॅगन फ्रूट’चे वेल वाळू नयेत, यासाठी प्रत्येक वेलीशेजारी हादगा झाडे लावली. याची सावली चांगली मिळते. यामुळे उन्हापासून वेलींचे संरक्षण होते. 
उन्हाळ्यात आठवड्यातून दोन तास ठिबकद्वारे पाणी दिले जाते.  
देशी गाय पाळली असून शेणस्लरीचा वापर केला जातो. गांडूळखत युनिटदेखील आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com