भात पिकाला द्या शिफारशीत खतमात्रा

शिफारशीनुसार भात रोप लागवडीचे अंतर ठेवल्याने पिकाची चांगली वाढ होते.
शिफारशीनुसार भात रोप लागवडीचे अंतर ठेवल्याने पिकाची चांगली वाढ होते.

भात पिकाचे हेक्‍टरी उत्पादन कमी येण्याचे प्रमुख कारण म्हणजे एकात्मिक पीक व्यवस्थापनाचा अभाव. एकात्मिक पीक व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक म्हणजे रोपांची योग्य पुनर्लागवड आणि खत नियोजन. भातरोपांची शिफारशीत अंतरानुसार लागवड करावी तसेच योग्य खतमात्रा द्यावी.

सध्या पाऊस चांगला झाल्यामुळे अनेक ठिकाणी भाताची पुनर्लागवड सुरू झाली आहे. पुनर्लागवड करताना खालील बाबींकडे लक्ष देेणे आवश्यक आहे.
चिखलणी उभी-आडवी चिखलणी करून, फळी फिरवून शेतात पाणी सर्व भागात समान पातळीत राहील अशा पद्धतीने पूर्वमशागतीची कामे वेळेवर करून घ्यावीत.

पारंपरिक पद्धतीने स्थानिक लाकडी नांगराच्या साह्याने चिखलणी केली जाते. या नांगराचा आकार लहान असल्यामुळे चिखलणीसाठी अधिक वेळ लागतो. (प्रतिदिन सुमारे पाच ते सहा गुंठे) या चिखलणीची प्रत कमी राहते. 

पॉवर टिलर व त्यासोबत रोटाव्हेटर भात शेतीमध्ये पूर्वमशागतीसाठी उपयुक्त ठरतो. याचे रबरी टायर बदलून लोखंडी चाके बसवल्यास त्याने चिखलणीसुद्धा करता येते. 

ज्यांच्याकडे ट्रॅक्‍टर आहे, त्यांनी मागील रबरी टायरला लोखंडी चाके बसवून रोटरीच्या साह्याने चिखलणी करता येते. 

यातून जमिनीची समतलता राहते. तसेच तणांचा नाश होतो. 

चिखलणीचे फायदे 
चिखलणीमुळे शेतात पाणी साचून राहण्यायोग्य स्थिती निर्माण होते. त्यायोगे तणांचा नाश होतो. दिलेल्या खतांची कार्यक्षमता वाढते. 
जमिनीतील कणांतर्गत हवेचे चलनवलन मर्यादित राहते आणि इतर प्रतिक्रिया चालू होतात. त्या म्हणजे अमोनिया साचून राहणे, नायट्रेट कमी होणे, स्फुरद, लोह, मॅंगेनीजची उपलब्धता वाढणे इत्यादी. 

रोप पुनर्लागवड 
हळव्या जातींची  २१ ते २५ दिवसांनी.
निमगरव्या जातींची २३ ते २७ दिवसांनी.
गरव्या जातींची २५ ते ३० दिवसांनी.
हळव्या जातींच्या रोपांची लागवड १५x१५ सें.मी., तर निमगरव्या, गरव्या व संकरित जातींची २०x१५ सें.मी. अंतरावर करावी. एका चुडात ३ ते ४ रोपे ठेवावीत. 
संकरित जातींसाठी एका चुडात फक्त १ ते २ रोपेच ठेवावीत.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन

अधिक उत्पादनासाठी भात पिकास आवश्‍यक ती सर्व अन्नद्रव्ये मिळाली पाहिजेत. अधिक उत्पादनक्षम भात जातींसाठी योग्य प्रमाणात संतुलितपणे खताचा वापर करावा. त्यासाठी माती परीक्षण करणे आवश्यक आहे. मुख्य अन्नद्रव्यात नत्र, स्फुरद व पालाश यांचा समावेश होतो. 
नत्र - भात पिकाची वाढ जोमदार होते.
स्फुरद - मुळांची वाढ चांगली होऊन फुलोरा चांगला धरला जातो.
पालाश - पिकास कणखरपणा येऊन पीक लोळत नाही, तसेच तांदळातील पिष्टमय पदार्थ तयार होण्यास मदत होते. 
जमिनीच्या सुपीकतेमध्ये जैविक, भौतिक आणि रासायनिक सुपीकतेचा सर्वांगीण विचार करणे गरजेचे आहे. या तिन्ही प्रकारच्या सुपीकतेसाठी सेंद्रिय पदार्थ, जैविक खते आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर आवश्यक आहे.

सेंद्रिय खत 
नांगरणीच्या वेळी हेक्‍टरी १० ते १२.५ टन शेणखत अथवा कंपोस्ट खत मातीमध्ये पूर्णपणे मिसळून द्यावे. 
चिखलणीच्या वेळी हेक्‍टरी १०  टन हिरवळीचे खत जमिनीत गाडावे. याकरिता धैंचा अथवा ताग वापरावा किंवा गिरिपुष्पाची शेताच्या बांधावर लागवड केल्यास, लागवडीनंतर दुसऱ्या वर्षापासून या झाडाचा पाला हिरवळीचे खत म्हणून वापरता येतो. गिरिपुष्पाची हिरवी पाने तीन टन प्रतिहेक्‍टरी प्रमाणात भात पुनर्लागवडीच्या ८ ते १० दिवस अगोदर शेतात गाडावीत. यामुळे नत्र खतासाठीच्या  खर्चात बचत होते.

रासायनिक खतांचा वापर 
हेक्‍टरी १०० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश
हळव्या जाती - पुनर्लागवडीवेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले ५० टक्के नत्र लागणीनंतर २५ ते ३० दिवसांनी द्यावे.
निमगरव्या व गरव्या जाती - पुनर्लागवडीवेळी ४० टक्के नत्र आणि संपूर्ण स्फुरद व पालाश द्यावे. लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी ४० टक्के नत्र आणि २० टक्के नत्र लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.
संकरित जाती - हेक्‍टरी १२० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश.
ही खतमात्रा पुनर्लागवडीच्या वेळी ५० टक्के नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश आणि उरलेले २५ टक्के नत्र पुनर्लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी आणि उर्वरित २५ टक्के नत्र पुनर्लागवडीनंतर ५५ ते ६० दिवसांनी द्यावे.

जैविक खतांचा वापर  
निळे हिरवे शेवाळ प्रतिहेक्‍टरी २० किलो हे भात लागवडीनंतर ८ ते १० दिवसांनी शेतात मिसळावे.
ॲझोला (४ ते ५ क्विंटल प्रतिहेक्‍टर) चिखलणीच्या वेळी शेतात मिसळावे.

- डॉ. नरेंद्र काशिद, ९४२२८५१५०५, (प्रभारी अधिकारी, कृषी संशोधन केंद्र, वडगाव (मावळ), जि. पुणे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com