बीजप्रक्रिया करून करा शेवंती लागवड

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 ऑगस्ट 2017

शेवंती या फुलपिकाची लागवड आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी. पावसाळ्यात लागवडीनंतर मुळे ‍कुजण्याची शक्यता असल्याने बीजप्रक्रिया करूनच लागवड करावी.

दसरा, दिवाळी, नाताळ यांसारख्या सणांमुळे शेवंतीसारख्या फुलांना चांगली मागणी असते. शेतकऱ्याला त्यापासून चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. याचा विचार करून, शेवंती या फुलपिकाची तत्काळ लागवड करावी.  

शेवंती या फुलपिकाची लागवड आॅगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी. पावसाळ्यात लागवडीनंतर मुळे ‍कुजण्याची शक्यता असल्याने बीजप्रक्रिया करूनच लागवड करावी.

दसरा, दिवाळी, नाताळ यांसारख्या सणांमुळे शेवंतीसारख्या फुलांना चांगली मागणी असते. शेतकऱ्याला त्यापासून चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. याचा विचार करून, शेवंती या फुलपिकाची तत्काळ लागवड करावी.  

जमीन : 
शेवंतीच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम प्रकारची (सामू ६.५ ते ७) जमीन निवडावी. मात्र जमिनीतून पाण्याचा चांगला निचरा होणे आवश्‍यक आहे. भारी, चोपण, खारवट व चुनखडीची जमीन निवडू नये. 

हवामान : 
शेवंतीला सुरवातीच्या वाढीच्या काळात सूर्यप्रकाश आणि २० ते २७ अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते. 
शेवंतीच्या झाडाला कळ्या येण्यास आणि उमलण्यास दिवस लहान आणि रात्रीचा कालावधी जास्त (१२ ते १४ तास) असावा लागतो. 
वाढीच्या काळात हवेतील आर्द्रता ७० ते ८० टक्के असल्यास फायदा होतो. जास्त पाऊस असल्यास शेवंतीची फुलगळ होते.

जाती : 
बग्गी, सोनाली, तारा, आय.आय.एच. आर सिलेक्शन - ४, शरदमाला, झिप्री, राजा, पांढरी रेवडी, पिवळी रेवडी, सोनार बंगला, चंद्रमा, स्नो बॉल, शरद शृंगार, मोहिनी. 

बीजप्रक्रिया : 
काशाचे १० ते १५ सें.मी. लांबीचे तुकडे कार्बेन्डाझिम २ ग्रॅम प्रतिलिटर पाणी या द्रावणात बुडवून लागवडीसाठी वापरावे. 
रोपांची लागवड करणार असल्यास रोपांची मुळेही वरीलप्रमाणे द्रावणात बुडवून लावावीत. 

लागवड हंगाम : 
लागवड ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करून घ्यावी. लागवडीसाठी ६० सें.मी. अंतरावर सरी वरंबे किंवा सपाट वाफे काढावेत. लागवड करताना सरीच्या दोन्ही बाजूंना दोन रोपातील अंतर ३० सें.मी. ठेवून करावी.

बेणे दर : 
प्रतिहेक्टरी १ ते १.२५ लाख कलम रोपे किंवा काशाचे तुकडे लागतील.

पूर्वमशागत : 
जमिनीची उभी आडवी नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात. त्यानंतर जमिनीचे सपाटीकरण करून प्रतिहेक्टरी २० ते २५ टन शेणखत मिसळावे. 

खतव्यवस्थापन : 
शेवंती पिकाला प्रतिहेक्टरी ३०० किलो नत्र, २०० किलो स्फुरद, २०० किलो पालाश अशी खतमात्रा द्यावी. शेणखत, स्फुरद आणि पालाशची संपूर्ण मात्रा लागवड करण्यापूर्वी जमिनीत मिसळून द्यावी. नत्राची मात्रा दोन समान हप्त्यात विभागून द्यावी. नत्राचा पहिला हप्ता लागवडीनंतर १५ दिवसांनी व दुसरा हप्ता लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा.

पाणी व्यवस्थापन : 
लागवडीनंतर पिकाला ४ ते ५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पाऊस असल्यास पाणी देण्याची आवश्यकता नसते. अतिरिक्त पाऊस झाल्यास सरीमध्ये पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी. फुले येण्याच्या कालावधीमध्ये पाण्याचा ताण पडू देऊ नये. सिंचनासाठी ठिबकसिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास उत्पादनात वाढ होते. 
- सीमा सरवदे, ९७६३६०२०८६ (लोकमंगल कृषी महाविद्यालय, सोलापूर)

लागवड पद्धत : 
मागील वर्षाच्या झाडापासून मिळालेल्या काशापासून शेवंतीची लागवड केली जाते. काशापासून लागवड करताना वाफ्यात जनावरे फिरणार नाहीत, याची काळजी घ्यावी. वाफ्यात गवत वाढलेले नसावे.
शेंडा कलम किंवा खोड कलमाच्या साह्याने रोपे तयार करुनही लागवड करता येते. शेंडा कलम वापरताना त्याची १० ते १५ सें.मी. लांबी असावी. खोड कलम वापरताना १० सें.मी. लांबीचा मध्यभाग निवडावा. शेंडा कलमाला २० ते २५ दिवसांत मुळ्या फुटतात, तर खोड कलमास ३० ते ४० दिवसात मुळ्या फुटतात.
कलमे पॉलिथीन पिशवीत लावून रोपवाटिकेत वाढवावीत. 

कीडनाशके संजीवके वापरासंबंधी

खरेदीवेळी पक्के बिल घ्यावे.

बॅन किंवा ‘रेस्ट्रिक्टेड’ आहे का पाहावे.  लेबल क्लेम वाचावेत.

पुरेशा ज्ञानाशिवाय रसायने एकमेकांत मिसळू नयेत.

रसायनांचा गट तपासावा.

पीएचआय, एमआरएल तपासावेत.

Web Title: agro news shivanti cultivation