सोयाबीन, तूर, मूग, उडीद पिकावरील रोगनियंत्रण

सोयाबीन, तूर, मूग, उडीद पिकावरील रोगनियंत्रण

वाढत्या आर्द्रतेमध्ये सोयाबीन, तूर, मूग, आणि उडीद या पिकांवर रोगांचे प्रमाण वाढते. या रोगांची लक्षणे ओळखून, त्यांचे वेळीच नियंत्रण करावे. 

उडीद व मूग 
भुरी 

हा रोग वाढीच्या कोणत्याही अवस्थेत आढळतो. पीक फुलोऱ्यात असतांना पानावर पांढरट भुरकट बुरशीची वाढ दिसते. त्यानंतर पानांच्या दोन्ही बाजूंवर पांढरट बुरशीचा प्रादुर्भाव दिसतो. ही वाढ पुढे देठांवर व शेंगावरही आढळून येते. दमट व कोरडे वातावरण हया बुरशीच्या वाढीसाठी पेाषक असते. हवेतील आर्द्रता ८० टक्के किंवा त्याहून अधिक असल्यास रोगाचा प्रादुर्भाव वाढतो. रोगाचा दुय्यम प्रसार हवेद्वारे होतो.

नियंत्रण 
शेत व लगतचा भाग दुधी, सार या तणांपासून मुक्त ठेवावा.  रोगाची लक्षणे दिसताच पाण्यात मिसळणारे गंधक (८० डब्ल्यूपी) २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाणी किंवा कार्बेन्डाझिम (५० टक्के डब्ल्यूपी) १० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

करपा रोग
रोगाची लागण झाडांच्या सर्व भागांवर आढळून येते. रोपावस्थेत असतांना खोडावर व पानांवर सुरवातीस अनियमित आकाराचे तपकिरी ठिपके दिसतात. खोडकूज होऊन रोपे कोलमडतात. रोगग्रस्त झाडे पूर्णपणे वाळतात. पीक फुलोऱ्यात असतांना रोगाची तीव्रता वाढल्यास शेंडे मर होते. पीक काढणीनंतर बुरशी जमिनीत बऱ्याच काळापर्यंत रोगट झाडाच्या अवशेषांवर जिवंत राहते.

नियंत्रण 
शेतात वनस्पतीचे कुजलेले अवशेष, कचरा व काश्या असू नयेत. रोगट झाडे व रोगाचे अवशेष नष्ट करावेत. जेणेकरून मर रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव वाढणार नाही.
दाणे भरत असताना पाण्याचा ताण पडू देऊ नये.
रोग दिसताच मॅंकोझेब २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसरी फवारणी रोगाच्या तीव्रतेनुसार १० ते १२ दिवसांनी करावी.

लीफकर्ल
हा रोग मुगापेक्षा उडीद पिकावर मोठ्या प्रमाणावर येतो. तो लीफकर्ल विषाणूमुळे होतो. विषाणूचा प्रसार  एका झाडापासून दुसऱ्या झाडावर मावा, पांढरी माशी, तुडतुडे या किडींद्वारे होतो. पाने खालच्या बाजूस वळतात. वेडीवाकडी होतात. फुलातील भागाची विकृती होते. शेंगांची संख्या कमी होते व झाडाची वाढ खुंटते. शेंगातील बियांचे वजन घटते व उत्पादनात घट होते.

नियंत्रण 
रोगट झाडे काढून नष्ट करावीत. 
शेतातील रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी किडींचे नियंत्रण करताना शिफारशीत कीटकनाशकाचा वापर करावा.

सोयाबीन  

शेंगावरील करपा/अॅन्थ्रॅकनोज -
नियंत्रण 

रोगग्रस्त झाडे व झाडांचे अवशेष जाळून नष्ट करावेत. 
रोगाची लक्षणे दिसताच मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम १५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

पानावरील ठिपके (अल्टरनेरिया व सर्कोस्पोरा) 
नियंत्रण 

रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. रोग दिसताक्षणी पायरॅक्लोस्ट्राॅबीन २० टक्के डब्ल्यूजी ८ ते १० ग्रॅम किंवा मॅन्कोझेब किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भुरी 
या रोगाचा प्रादुर्भाव अलीकडील काळात वाढत असून कोरडे-उष्ण व दमट हवामान पोषक आहे.

लक्षणे 
पानांच्या दोन्ही पृष्ठभागावर अनियमित आकाराचे पांढरे चट्टे दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास संपूर्ण पानावर पांढऱ्या बुरशीची पावडर पसरलेली दिसते. अशी रोगग्रस्त पाने कालांतराने वाळून पानगळ होते.

नियंत्रण 
रोग दिसताक्षणी पाण्यात मिसळणारे गंधक ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मोझॅक 
हा रोग सोयाबीन मोझॅक व्हायरस (पॉटीव्हायरस) या विषाणुमुळे उद्भवतो. 

नियंत्रण -
पेरणीसाठी विषाणुमुक्त बियाणे वापरावे. सोयाबीनचे प्रतिवर्षी तेच ते वाण घेण्याऐवजी एक ते दोन वर्षांनी वाणांची अदलाबदल करावी. शेतातील विषाणूबाधित रोगग्रस्त झाडे त्वरीत उपटून जाळावीत किंवा जमिनीत खोल पुरुन टाकावीत. विषाणू वाहक मावा किडीच्या नियंत्रणासाठी शिफारशींत कीटकनाशकांचा वापर करावा. 

तांबेरा 
या रोगास साधारणत: २० ते ३० अंश से. तापमान व ८० ते ९० टक्के सापेक्ष आर्द्रता अनुकूल असते. रोगाच्या बुरशीचा दुय्यम प्रसार हवेद्वारे होतो.
लक्षणे : पानांच्या खालील पृष्ठभागावर मुख्य शिरेजवळ लहान आकाराचे पिवळसर तांबूस ठिपके दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास पानांच्या      दोन्ही बाजूंना, पानाचे देठ, कोवळे खोड, फांद्या आदींवर क्षणे आढळून येतात. रोगग्रस्त झांडाची पाने वाळून गळतात. शेंगातील दाणे बारीक व सुरकुतले होतात. त्यामुळे उत्पादनात ४० ते ९० टक्क्यांपर्यंत घट येते.

नियंत्रण -
रोगास प्रतिकारक्षम वाणांची (उदा. फुले कल्याणी, एमएयूएस-७१, एमएयूएस-१६२ ) लागवड करावी. 
रोगाची लक्षणे दिसताक्षणी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल १० मिली किंवा प्रॉपीकोनॅझोल १० मिलि प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

तूर 

मर रोग (फुजॅरियम ऑक्सीस्पोरम)
या रोगाचा प्रादुर्भाव रोपावस्थेपासून ते फुले व शेंगा येईपर्यत होतो. जमिनीचे तापमान २५ ते २८ अंश सेल्सिअस व ओलावा २० ते २५ टक्के असल्यास मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. शेंगा पक्व होण्याच्या कालावधीत प्रादुर्भाव झाल्यास उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येते. 

नियंत्रण 
पीक फेरपालट करावी .
तुरीत ज्वारी, बाजरी, मका यासारख्या तृणधान्यांचे आंतरपीक घ्यावे. 
रोगग्रस्त झाडे उपटून नष्ट करावीत. 
मर रोगास प्रतिकारक्षम वाणांची उदा. विपुला, बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५३, आयसीपीएल ८७१९१ आदींची लागवड करावी.
पेरणीपूर्वी ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाची ६ ग्रॅम प्रति किलो प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

वांझ रोग (विषाणू)
हा रोग विषाणूमुळे होतो. विषाणूचा प्रसार एरिओफाईड कोळीमार्फत होतो. तुरीची कोवळी पाने पिवळसर पडतात. पानांची, फांद्याची व झाडाची वाढ खुंटते. रोगग्रस्त झाडाला फुले किंवा शेंगा लागत नाहीत. 

नियंत्रण 
तूर पिकाचा खोडवा घेण्याचे टाळावे.
रोगग्रस्त झाडे त्वरित उपटून नष्ट करावीत.
कोळी किडीच्या नियंत्रणासाठी पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वांझ रोगास प्रतिकारक्षम तुरीचे वाण उदा. विपुला, बीएसएमआर ७३६, बीएसएमआर ८५३ यांची  लागवड करावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com