भारताच्या साखरेला म्यानमारची पसंती

Sugar
Sugar

नवी दिल्ली - देशात साखरेचे दर पडल्यानंतर साखर कारखाने आणि शेतकरी अडचणीत आले होते. सरकार मागील अनेक दिवसांपासून साखर निर्यातीसाठी चाचपणी करत होते. आता म्यानमारने २०१६ नंतर यंदा भारताच्या साखरेला पसंती दिली आहे. म्यानमार ८ ते १० हजार टन साखर खरेदी करण्याची शक्यता आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय साखर बाजारातील सूत्रांनी दिली. 

देशातील अडचणीत असलेल्या साखर उद्योगाला आता निर्यातीसाठी नवे दार उघडण्याची शक्यता आहे. म्यानमार येथील साखर खरेदीदार हे भारतातील साखर खरेदीसाठी उत्सुक आहेत. तसेच त्यांनी आतापर्यंत ३५५ डॉलर प्रतिटनप्रमाणे ३०० ते ४०० कंटेनर म्हणजेच ८ ते १० हजार टन साखर खेरदी केली आहे. याआधी म्यानमारने २०१५-१६ मध्ये भारतातून साखर आयात केली होती. त्यातील बरीच साखर ही नंतर चीनला निर्यात केली गेली. या वर्षीही म्यानमारमार्गे काही साखर चीनला निर्यात होण्याची शक्यता आहे. 

‘‘म्यानमारने देशातील व्यापाऱ्यांना साखर आयातीसाठी परवाने देण्यास सुरवात केली आहे. त्यामुळे भारतातील साखरेची लगेच खरेदी येथील व्यापाऱ्यांनी सुरू केली आहे. म्यानमारच्या साखरेचा सर्वांत मोठा आयातदार हा चीन आहे. चीनने देशातील साखरेचे दर पडल्याने पुरवठा कमी करण्यासाठी म्यानमारमधून २०१७ च्या मध्यपासून साखर आयात थांबविली होती. आता मात्र ही आयात सुरू केली आहे,’’ अशी माहिती सूत्रांनी दिली. 

देशात विक्रमी साखर उत्पादन झाल्यानंतर केंद्र सरकारने साखर कारखान्यांना साखर निर्यात बंधनकारक केली होती.

मोठी निर्यात शक्य
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीन हा भारतातून थेट साखर खरेदी करत नाही. देशातील साखरेचा अतिपुरवठा कमी करण्यासाठी भारताने आंतरराष्ट्रीय बाजारात साखर विक्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर म्यानमारमधून मागणी आली आहे. भारत सरकारचे धोरण पूरक असल्यास म्यानमारला ३ लाख टन साखर निर्यातीची संधी आहे. चालू गाळप हंगामात भारतात साखरेचे ३२ दशलक्ष टन उत्पादन झाले आहे. देशाचा वापर होऊन या साखरेतील जवळपास ६ ते ७ दशलक्ष टन साखर शिल्लक राहण्याचा अंदाज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com