प्रबळ इच्छाशक्तीद्वारे शून्यातून साकारले पूरक व्यवसाय

प्रबळ इच्छाशक्तीद्वारे शून्यातून साकारले पूरक व्यवसाय

घरची बिकट आर्थिक परिस्थिती. त्यामुळे कधीकाळी वृत्तपत्रविक्रीचे काम केले. मात्र सकारात्मकता व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर अमरावती येथील विवेक गुल्हाने यांनी कष्ट करीत स्वतःला त्या परिस्थितीतून बाहेर काढले. शेळीपालन, दुग्धव्यवसाय व पोल्ट्री व जोडीला शेती अशी कमान बांधत शेतीत आपला ठसा निर्माण केला आहे.  

संघर्ष व विकासाचे टप्पे
टप्पा १

अमरावती येथे राहणारे विवेक गुल्हाने यांचे वडील तुळशीराम पोलिस अधीक्षक कार्यालयातून १९८६ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्या वेळी कुटुंबीयांची एक एकरदेखील शेती नव्हती. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने विवेक यांना दहावीत असतानाच ‘पेपर’ टाकण्याचे काम करावे लागले. यातून येणाऱ्या पैशांच्या बळावरच बीए, बीपीएड, एमएपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 

टप्पा २
परिस्थितीत बदल घडवायची विवेक यांची तीव्र इच्छा होती. त्यासाठी हवे ते कष्ट करण्याची तयारीही होती. सन १९९५ ते ९८ या काळात त्यांना शेळीपालन व्यावसायिक सुनील मानकीकर यांच्याकडे काम करण्याची संधी मिळाली. मानकीकर यांनी शेळीमेंढी महामंडळाची निविदा (टेंडर) भरली होती. महामंडळाकडून शेळ्या घेऊन त्याचा लाभार्थ्यांना पुरवठा करण्याचे काम त्यांची संस्था करायची. पुढे त्याची जबाबदारी मानकीकर यांनी विवेक यांच्याकडे सोपविली होती. शेळ्यामेंढ्या वितरणाचे काम करतानाच विवेक यांना जनावरांचा लळा लागला. या क्षेत्रातील बारकावेही त्यांनी जाणून घेतले. त्यानंतर स्वतःच शेळीपालन क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला. 

टप्पा ३ 
भातकुली तालुक्‍यातील खल्लार (बालाजी) हे विवेक यांचे काका पुंडलीक यांचे गाव. 

त्यांनी विवेक यांचा उत्साह पाहता शेळीपालनाला जागा उपलब्ध करुन दिली. त्यावेळी मानकीकर यांनीच  ६० हजार रुपयांचे भांडवलही उपलब्ध करून दिले. पुढे या व्यवसायात स्थिरता मिळवतानाच दुधाळ जनावरे घेऊन दुग्धव्यवसायात ते उतरले. चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्हयांसाठी शासनाने एकात्मीक दुग्ध विकास प्रकल्प राबविण्याची घोषणा केली होती. पन्नास टक्‍के अनुदानावर गाई, म्हशींचे वाटप यातून व्हायचे. त्या वेळी एक-दोन गाई, म्हशींची खरेदी करून त्यांचा पुरवठा विवेक शासनाला करु लागले. त्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांशी संबंध आले. हे ऋणानुबंध इतके घट्ट झाले की पुढे शेतकरी जनावरांच्या खरेदीसाठी विवेक यांच्या फार्मला भेटी देऊ लागले. 

टप्पा ४ 
दुधाळ जनावरांची संख्या वाढू लागली. दरम्यान याच व्यवसायात २००२ मध्ये चार- पाच लाख रुपयांचे नुकसानही झाले. मात्र सकारात्मक विचार करण्याची वृत्ती, खंबीरपणा व मार्ग काढण्याची वृत्ती कामी आली. शेळीपालनातील अनुभवाचा विचार करून विवेक यांना दुग्धव्यवसायासाठी एक लाख ४० हजार रुपयांचे कर्ज बॅंकेकडून मिळाले. व्यवसाय आकारास आणण्यास सुरवातही  झाली. 

टप्पा ५
पुढे अनुभव वाढत गेला तसा आत्मविश्वासही दृढ होत गेला. व्यवसायातील खाचाखोचा, संघर्ष कळत गेला. मग पोल्ट्री व्यवसाय सुरू केला. त्यासाठीही १२ लाख रूपयांचे कर्ज मिळवणे अनुभवाच्या ताकदीवरच शक्य झाले. 

विवेक यांचा व्यवसाय दृष्टिक्षेपात 
सुमारे २० ते २१ वर्षांचा गाढा अनुभव 
शेती सुमारे १७ एकर  
मजूरबळ -  दुग्धव्यवसाय - ५,  शेळीपालन - २,  व्यवसाय - पोल्ट्री २

दुग्धव्‍यवसाय
महालक्ष्मी डेअरी नावाने. आज जनावरांची संख्या १२ म्हशी, १५ गायी
दररोजचे दूध संकलन- सुमारे २३० लिटर
बाजारपेठ- अमरावती शहरात ८० लिटरपर्यंत दुधाचे ग्राहकांना रतीब, दर ५० रूपये प्रति लिटर. 
उर्वरित दूध एका खाजगी कंपनीला दिले जाते. 

शेळीपालन (उस्मानाबादी)
शेळ्यांची संख्या १२७ पर्यंत.  बोकडांची दरवर्षी ६० ते ७० नगांपर्यंत विक्री. शासनाला दरवर्षी दोन हजारांपर्यंत शेळ्यांचा पुरवठा तर ग्राहकांना २०० ते ३०० संख्येपर्यंत विक्री.  नराची किलोला २४० रुपये तर मादीची २०५ रुपये दराने विक्री  अर्धबंदिस्त पद्धतीने शेळीपालन 

पोल्ट्री
व्यंकटेश पोल्ट्री फार्म असे नाव 
सुमारे दहा हजार ब्रॉयलर पक्षांचे संगोपन. सध्या खासगी कंपनीसोबत करार शेती
एक दिवसीय पिल्लाचे सुमारे ४५ दिवस संगोपन करून देल जाते. किलोला सहा रुपये दर मिळतो. 
वर्षभरात सुमारे चार बॅचेस घेतल्या जातात.  

व्यवस्थापनातील ठळक बाबी
जनावरांच्या विक्रीत अनेक वर्षांपासून सातत्य. त्यातून हरियाणा, राजस्थानमधील व्यापाऱ्यांसोबत चांगले संबंध निर्माण झाले आहेत. त्यामुळे चांगल्या प्रतिची जनावरे मिळतात.  

हिरव्या चाऱ्यासाठी एकूण पाच एकर क्षेत्र. मका, जयवंत, यशवंत गवत यांची लागवड 

गव्हाची पेंड, हरभरा कुटार उन्हाळ्यातच खरेदी करून त्याचा स्टॉक ठेवला जातो. उन्हाळ्यात ते स्वस्त राहत असल्यामुळे त्याची खरेदी त्याच काळात करण्यावर भर  

टप्प्याटप्प्यात शेती खरेदी केली. माहूल जहॉंगीर शिवारातच सर्व पूरक व्यवसाय उभारले आहेत. 

शेतात कापूस, केळी, कलिंगड आदी पिकांचे प्रयोग केले आहेत. 

सायकल व जनावरे यांनीच मोठे केले 
एकेकाळी विवेक यांना सायकलवरून पेपर टाकण्याचे काम करावे लागले. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातूनच त्यांनी शिक्षण घेतले. आज आर्थिक समृद्धीत त्यांच्याकडे फोर व्हीलर आहे. मात्र सायकल व जनावरे यांचे ऋण मानून त्यांनीच आपल्याला मोठे केले असे ते सांगतात. सायकल सांभाळून ठेवली आहे. एका राजकीय पक्षाचे ते जिल्हा उपाध्यक्ष आहेत. मात्र शेतीकडे जराही दुर्लक्ष होत नसल्याचे त्यांनी सांगितले. 

- विवेक गुल्हाने, ९५४५७२४४३१

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com