मुदतीत परतफेड करणाऱ्यांना द्यावे लागणार ८७५० कोटी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

मुंबई - राज्यात सुमारे ९० लाख शेतकरी पीक कर्ज घेतात. त्यामधील सुमारे ३५ लाख शेतकरी नियमितपणे मुदतीत पीक कर्जाची परतफेड करतात, असे सहकार विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना सुमारे ८७५० कोटी रुपये द्यावे लागतील, असा अंदाज आहे. 

सहकार आणि वित्त विभागाद्वारे आकडेमोड सुरू 

राज्यातील ३५ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार 

मुंबई - राज्यात सुमारे ९० लाख शेतकरी पीक कर्ज घेतात. त्यामधील सुमारे ३५ लाख शेतकरी नियमितपणे मुदतीत पीक कर्जाची परतफेड करतात, असे सहकार विभागाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना सुमारे ८७५० कोटी रुपये द्यावे लागतील, असा अंदाज आहे. 

राज्य सरकारच्या पातळीवर थकबाकीदार कर्जदार शेतकरी आणि नियमित परतफेड करणारे शेतकरी यांना मदत देण्यासाठी किती रक्कम लागेल याची आकडेमोड करीत आहे. सहकार आणि वित्त विभागाचे अधिकारी एकत्रितपणे यावर काम करीत आहेत. नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही काहीअंशी दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे.

त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षात म्हणजेच २०१५-१६ आणि चालू म्हणजेच २०१६-१७ या वर्षातील पीक कर्जाची मुदतीत परतफेड करणे आवश्यक आहे. तरच त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्यातील सुमारे ३५ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याची माहिती सहकार खात्यातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

पश्चिम महाराष्ट्रालाही फायदा होणार
पश्चिम महाराष्ट्रात पीक कर्ज वाटपाचे प्रमाण सर्वाधिक आहे. या विभागातील शेतकऱ्यांकडून कर्ज परतफेडीचे प्रमाणही अधिक असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या योजनेतील नियमित परतफेड करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक संख्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची राहील. त्यामुळे या योजनेचा बऱ्यापैकी लाभ पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना होईल, असे कर्जमाफीचे निकष ठरवणाऱ्या समितीत सहभागी असलेल्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांसाठी पीक कर्जाच्या २५ टक्के किंवा २५ हजार रुपये ही रक्कम खूपच कमी असल्याची टीका होत आहे. ही रक्कम ५० हजार रुपयांपर्यंत वाढवावी, अशीही मागणी होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने या निर्णयात फेरबदल केला तर मग मदतीच्या रकमेतही त्यानुसार फरक पडू शकतो, असेही सांगण्यात आले.

Web Title: agro news Those who repay in the period will have to pay Rs 8750 crores