वेळीच करा शेळ्यांमधील जंतनिर्मूलन

डॉ. तेजस शेंडे
बुधवार, 28 जून 2017

दूषित चारा अाणि पाण्यातून जंत शेळ्या-मेंढ्यांच्या शरिरात प्रवेश करून पचन संस्थेमध्ये, रक्तामध्ये व विविध अवयवांमध्ये वाढतात. त्यामुळे शरीरातील रक्त कमी होणे, जनावर अशक्त होणे, वजन घटणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे शेळ्यांमधील जंतनिर्मूलनाकडे वेळीच लक्ष द्यावे. 
 

दूषित चारा अाणि पाण्यातून जंत शेळ्या-मेंढ्यांच्या शरिरात प्रवेश करून पचन संस्थेमध्ये, रक्तामध्ये व विविध अवयवांमध्ये वाढतात. त्यामुळे शरीरातील रक्त कमी होणे, जनावर अशक्त होणे, वजन घटणे, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे शेळ्यांमधील जंतनिर्मूलनाकडे वेळीच लक्ष द्यावे. 
 

जंत नेहमी चरणाऱ्या जनावरांमध्ये जास्त प्रमाणात होतात. जंताचे गोल, चपटे अाणि पर्णाकृती असे  तीन प्रकार अाहेत. चरताना गवताद्वारे शेळ्यांमध्ये जंताचा प्रादुर्भाव होतो. लेंढ्यांबरोबर जंतांची अंडी बाहेर पडतात. अनुकूल हवामानात अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. अळ्या हवेतून अाणि दवाच्या मदतीने गवताच्या पात्यांवर जाऊन बसतात. शेळी जेव्हा गवतावर चरते, तेव्हा गवताबरोबर अळ्याही पोटात जातात. पोटात अळीचे जंतात रूपांतर होऊन जीवनचक्र पुन्हा सुरू होते. काही प्रकारच्या जंतांच्या अळ्यांची वाढ इतर प्राण्यांच्या शरीरात होते उदा. गोगलगाय.

जंतामुळे होणारे नुकसान 
शेळ्यांमधील जंतप्रादुर्भावामुळे तीन प्रकारे नुकसान होते.
स्पष्ट नुकसान - शेळ्या मरणे, बारीक होणे अाणि खाद्य न खाणे.
लक्षात न येणारे नुकसान - वजनवाढ कमी होणे, खाद्याचे वजनात रुपांतर कमी प्रमाणात होणे, दूध कमी व कमी काळासाठी देणे, कातडी व केस राठ होणे. त्यामुळे औषधोपचार, कामगार, प्रक्षेत्र जमिनीचा अकार्यक्षम वापर यावर अनियंत्रित खर्च होतो.

जंतप्रादुर्भावाची लक्षणे 
शेळ्यांना अपायकारक जंतांची जात म्हणजे हिमाँकस कॉन्टॉर्टस. ही जात रक्ताचे शोषण करणारी आहे. या जातीचा एक प्रौढ जंत एका दिवसात ०.०५ मिली रक्त शोषण करतो.

जर शेळी-मेंढीला मोठ्या प्रमाणात जंतप्रादुर्भाव झालेला असेल म्हणजे  या जातीचे २००० जंत पोटात असतील तर त्या शेळी-मेंढीच्या शरीरातील एकूण रक्ताच्या रोज ५ ते ७ टक्के रक्त शोषले जाते.

त्यामुळे शेळीला पंडुरोग होतो, उत्पादनक्षमता कमी होते व प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर झालेला असेल (विशेषतः शेळी-मेंढी आधीचीच आजारी असेल किंवा नुकतीच विलेली असेल) तर मृत्यू होणे असे घातक परिणाम संभवतात.
शेळीच्या पुढच्या पायांच्या व पोटाच्या खाली पाणी होते.
शेळ्या, करडे खंगत जातात, वाढ खुंटते, मलूल दिसतात व खाणे कमी करतात. खाल्लेले अन्न पचत नाही, हगवण लागते.
अंगावरील चमक जाऊन केस उभे राहतात.
जबड्याखाली व पोटाखाली सूज येते. जनावरे पोटाळलेली दिसतात.
शरीरातील रक्त कमी होते.
वेळीच उपचार न केल्यास शेवटी खाणे बंद होऊन जनावरे दगावतात.
लेंडी व रक्ताची तपासणी केल्यास जंतांची अंडी किंवा जंत दिसतात.
शेळ्या-मेंढ्या अशक्य होतात व वजन घटते, नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने बसतात व लोळतात.
अशक्तपणामुळे प्रतिकारशक्ती कमी होऊन फुफ्फुसाचा दाह होणे या सारख्या इतर आजारांनासुद्धा बळी पडू शकतात.
मोठ्या प्रमाणात जंतांचा प्रादुर्भाव असलेल्या शेळ्या-मेंढ्यांचे डोळे अलगद उघडून पाहिले असता नेहमी लालसर असणारा पापण्यांचा आतील भाग पांढरट दिसतो.
हगवण लागणे, पातळ संडास होणे हे जंतप्रादुर्भावाचे प्रमुख लक्षण नाही. जंतप्रादुर्भावाशिवाय इतर कारणांनीसुद्धा शेळ्या-मेंढ्यांना हगवण लागते. हगवण लागल्यानंतर बऱ्याच शेळ्या-मेंढ्यांना लगेचच जंतनाशक पाजले जाते. काही वेळा शेळ्या-मेंढ्यांना जंतप्रादुर्भावामुळे हगवण लागू शकते. नेमके कारण शोधण्यासाठी आजारी शेळ्या-मेंढ्यांच्या लेंडीची तपासणी करून जंताच्या प्रादुर्भावाचे नेमके प्रमाण पाहणे गरजेचे असते.

जंतनाशकांचा वापर 
जंतनाशकचा वापर करताना वर्षभराच्या चार जंतनिर्मूलनावेळी वेगवेगळी औषधे देणे/ औषधे बदलणे टाळावे. ज्यामुळे सर्वच जंतनाशका विरुद्ध जंतांची प्रतिकारशक्ती वाढू शकते त्यामुळे औषधोपचार निरुउपयोगी ठरू शकतात.
त्यावर उत्तम उपाय म्हणजे जोपर्यंत एका विशिष्ट जंतनाशकाचा गुण येत नाही, तोपर्यंत त्या विशिष्ट जंतनाशकाचा वापर सुरू ठेवावा.
जंतनाशकाचा पूर्ण डोस जनावराच्या वजनानुसार देणे आवश्यक आहे.
कळपामध्ये नवीन जनावर मिसळण्याआधी त्याला जंतनाशकाची मात्रा द्यावी. 

जंतनाशकाचे स्वरूप 
गोळ्या - खाद्यातून गोळ्या देणे सोपे जाते.
पातळ जंतनाशक - ही जंतनाशके तोंडावाटे पाजावी लागतात व पाजताना जनावरांना ठसका लागणार नाही, याची काळजी घ्यावी.
पेस्ट - देण्यासाठी विशिष्ट उपकरण (डिसपेन्सर) लागते.
औषधी अवरोध - यामध्ये किती औषध शोषून घेतले जाईल यावर नियंत्रण ठेवता येत नाही.
हळूहळू शोषली जाणारी जंतनाशके - ही जंतनाशके जनावराच्या कोठी पोटामध्ये ठेवली जातात व हळूहळू बरेच दिवस शोषली जातात.
शरीरातील जंतांची संख्या, जात तपासणे 
प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब केल्यास जंतनशकाचा वापर कमीत कमी करूनसुद्धा जंतप्रादुर्भाव आटोक्यात ठेवता येतो. यामुळे जंतांमध्ये जंतनाशक औषधांविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होण्यास आळा बसेल. पशुवैद्यकीय महाविद्यालयातील, पशुसंवर्धन विभागामध्ये लेंडी तपासून त्यातील जंतांचे प्रमाण व जंतांची जात सांगण्याची सोय उपलब्ध आहे.

लेंडीचे नमुने घेण्याच्या पद्धती 
जंतप्रादुर्भावाच्या तपासणीसाठी शेळ्या-मेंढ्यांच्या लेंडीचे नमुने दोन प्रकारे घेता येतात.
कळपातील प्रत्येक शेळी-मेंढीची लेंडी वेगवेगळी गोळा करणे.
यामध्ये प्रत्येक शेळी-मेंढीच्या गुदद्वारातून प्रत्येकी अंदाजे २ ग्रॅम लेंडी (४-५ लेंड्या) बोटाने काढून काचेची बाटली/ प्लॅस्टिक पिशवी/ रिकामी काडेपेटी किंवा कॅमेरा रोलच्या डबीमध्ये वेगवेगळी भरावी. लेंडी भरलेल्या प्रत्येक बाटलीवर शेळी-मेंढी ओळखण्यासाठी खुणा/ बिल्ला क्रमांक नोंद करावा.
कळपातील शेळ्या-मेंढ्यांची एकत्रित लेंडी गोळा करणे.
कळपातील प्रत्येक शेळी-मेंढी ओळखण्यासाठी त्यांच्या कानात नंबरचे बिल्ले मारलेले असतातच असे नाही. त्यामुळे जरी प्रत्येक शेळी-मेंढीची वेगवेगळी लेंडी गोळा केली तरी त्या सर्व शेळ्या-मेंढ्या ओळखता येतीलच असे नाही. म्हणून एकत्रित लेंडी गोळा करणे सोईचे होते. एकत्रित लेंडी गोळा करताना कळपातील एकूण शेळ्या-मेंढ्यांच्या संख्येच्या अंदाजे ३० टक्के शेळ्या-मेंढ्यांची अंदाजे प्रत्येकी २ ग्रॅम लेंडी गुदद्वारातून काढून एकाच बाटलीमध्ये एकत्रित भरावी. बाटलीवर मालकाचे नाव व पत्ता नोंद करावा. लेंडी काढण्यासाठी निवडलेल्या शेळ्या-मेंढ्यांमध्ये प्रामुख्याने आजारी, कळपातून मागे राहणाऱ्या, हगवण लागलेल्या शेळ्या-मेंढ्यांचा समावेश असावा.

लेंडी तपासणीतील महत्त्वाच्या बाबी 
लेंडी काढताना अगोदर हात पाण्यात भिजवावा.
बोटांना नखे असू नयेत.
एखाद्या शेळी-मेंढीची लेंडी मिळत नसेल तर थोडा वेळ थांबून परत लेंडी काढण्याचा प्रयत्न करावा.
कळपातील सर्व शेळ्या-मेंढ्याची लेंडी काढून झाल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
लेंडी काढल्यानंतर त्याच दिवशी प्रयोगशाळेत न्यावी.
लेंडी पोचवण्यास ५ ते ६ तासांपेक्षा जास्त वेळ लागत असल्यास थर्मोकोलच्या खोक्यामध्ये बर्फ घालून त्यामध्ये लेंडी भरलेल्या बाटल्या ठेवाव्यात.
बर्फाचा व लेंडीचा प्रत्यक्ष संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी. याकरिता बर्फ प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून खोक्यात ठेवल्यास बर्फाचे पाणी लेंडीला लागत नाही.
प्रयोगशाळेत शेळ्या-मेंढ्यांची लेंडी तपासून आपल्या कळपामध्ये जंतुप्रादुर्भावाचे प्रमाण किती आहे व कोणते जंतनाशक औषधे पाजणे आवश्यक आहे, हे सांगणे सहज शक्य होते.

- डॉ. तेजस शेंडे, ९९७०८३२१०५ 
(क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

जंतप्रादुर्भाव आटोक्यात ठेवण्याचे उपाय 
जंत वाढल्यानंतर उपचार करण्यापेक्षा ते वाढू नये, म्हणून पुढीलप्रमाणे प्रतिबंधक उपाय योजनेच चांगले.
लेंडीच्या ढिगाभोवती शेळ्या चरायला सोडू नये.
सकाळी गवताच्या टोकावर असलेल्या दवामध्ये जंताच्या अळ्या असतात. त्यामुळे सकळच्यावेळी शेळ्यांना चरण्यासाठी सोडू नये. 
चरण्यास जाणाऱ्या शेळ्यांना जंताची लागण होतच राहते, म्हणून पावसाळा सुरू होताना आणि पावसाळा संपताना असे दोनदा पशुवैद्याच्या सल्ल्याने जंतनाशक पाजावे.
लेंड्यांची तपासणी करून आवश्यक असल्यास औषध पाजावे.
गोठा नेहमी स्वच्छ व कोरडा ठेवावा.
तळ्याच्या परिसरात अथवा दलदलीत शेळ्यांना चरू देऊ नये.
तळ्याच्या परिसरातील गोगलगाईंमध्ये काही जंतांच्या अळ्या वाढतात. म्हणून गोगलगाय निवारणासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.
तळ्यात बदक पाळण्यानेही गोगलगाईंचा नायनाट होतो.
हिरवा चारा थोडा वेळ उन्हात वाळवून मग द्यावा. शेळीचे व्यवस्थापन चांगले केल्यास मृत्यूचे प्रमाण फक्त २ टक्के राहते.

Web Title: agro news at the time of goat Waste eradication