आदिवासी शेतकऱ्यांनी मिळवले नवापूर तूरडाळीचे ‘जीआय’

गणेश हिंगमिरे
शुक्रवार, 30 जून 2017

एकूण जीवन शैलीत दैनंदिन प्रमुख अन्न घटकांत तूरडाळीचे विशेष महत्त्व आहे. असे हे तूरपीक यंदाच्या वर्षी सर्वांत चर्चेचे राहिले. यंदा तुरीच्या विक्रमी उत्पादनामुळे डाळीच्या किमती अक्षरशः गडगडल्या. मागील वर्षी ज्या तूरडाळीने प्रति किलो शंभरी ओलांडली होती, त्या डाळीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना सरकार दफ्तरी आंदोलने करावी लागली. अशातच महाराष्ट्रातील एका भागातील तूरडाळीने आपले नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले. ती डाळ म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्याची अोळख आहे. 

एकूण जीवन शैलीत दैनंदिन प्रमुख अन्न घटकांत तूरडाळीचे विशेष महत्त्व आहे. असे हे तूरपीक यंदाच्या वर्षी सर्वांत चर्चेचे राहिले. यंदा तुरीच्या विक्रमी उत्पादनामुळे डाळीच्या किमती अक्षरशः गडगडल्या. मागील वर्षी ज्या तूरडाळीने प्रति किलो शंभरी ओलांडली होती, त्या डाळीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना सरकार दफ्तरी आंदोलने करावी लागली. अशातच महाराष्ट्रातील एका भागातील तूरडाळीने आपले नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेऊन ठेवले. ती डाळ म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्याची अोळख आहे. 

भौगोलिक स्थानाचे महत्त्व 
नवापूर तालुक्यामध्ये स्थानिक पातळीवर उत्पादित होणारी तूर देशी तूर या नावाने प्रसिद्ध आहे. डोंगराळ भाग आणि आदिवासी शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक असलेल्या या क्षेत्रामध्ये भात आणि तूर हे रोजच्या आहारातील मुख्य घटक आहेत. येथील आदिवासी रसायनांचा वापर न पारंपरिक पद्धतीने तूर पिकवतात. नवापूर तालुक्याचे सरासरी तापमान २६ ते ३८ अंश सेल्सिअस तर सरासरी पर्जन्यमान ११६५ ते १२६५ मिमी आहे. म्हणूनच येथील नैसर्गिक शीतलता कायम राखली जाते. त्यामुळे येथील तूर डाळीला विशिष्ट असा सोनेरी पांढरा (गोल्डन व्हाइट) रंग आणि सुगंधही प्राप्त होतो.

गुणवत्तादेखील वाढते. दररोजच्या आहारातील मुख्य घटक मानले जाणारी प्रथिने ही डाळ अधिक प्रमाणात पुरवते. 

निसर्गाचे वरदान 
नवापूर तालुक्यातील बहुतांश भाग मध्यम काळ्या रंगाच्या मातीने समृद्ध आहे. ज्यामुळे येथे घेतल्या जाणाऱ्या तुरीच्या वाढीस अनुकूल वातावरण मिळते. या पिकाद्वारे नत्र स्थिरीकरणाचा फायदाही जमिनीला मिळतो. त्यामुळे पिकाच्या पोषक वाढीला मदत होते आणि डाळीतील अमिनो अॅसिडसचे प्रमाण वाढविण्यासही मदत होते. अमिनो अॅसिड्स हे प्रथिनांचेच रूप आहेत, शिवाय नवापूर देशी तुरीच्या विशेष सुगंधाचे मुख्य कारण देखील. येथील शेतकऱ्यांचा या पिकातील उत्पादन खर्चही कमी आहे. जात्यावर दळल्यामुळे या डाळीला अन्य डाळींच्या तुलनेत वेगळाच सुगंध प्राप्त झाला आहे.

नवापूरची एेतिहासिक नोंद
नवापूरच्या बाबतीत इतिहासात बऱ्याच नोंदी सापडतात. महाराणा प्रताप यांच्या बहिणीला जेव्हा सुरक्षित ठिकाणी घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तेव्हा त्या काळातील रजपुतांना नवापूर हे ठिकाण जास्त योग्य वाटले होते. तेथे निसर्गाच्या सान्निध्यात तिला सुरक्षितरीत्या ठेवण्यात आले होते. 

अशा या निसर्गाच्या कुशीत वसलेल्या नवापूर तुरीला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. ही तूरडाळ विशेषतः गुजरात राज्यात अनेक वर्षांपासून रोजच्या जेवणातील अविभाज्य घटक बनली आहे. नवापूर तूरडाळीला मिळालेला जीआय हा केवळ तिथल्या आदिवासी शेतकऱ्यांना फलदायी ठरणारा नाही. तर आरोग्याविषयी जागरूक असलेल्या प्रत्येक नागरिकाला उपयुक्त ठरणारा आहे. अन्य तूरडाळींसाठी समजा प्रेशर कुकरच्या चार शिट्या कराव्या लागत असतील, तर नवापूरची डाळ केवळ दोनच शिट्ट्यांमध्येच शिजते. म्हणजेच ती इंधनाची बचतही करते. 

शेतकऱ्यांची विशेष मेहनत 
या तूरडाळीला जीआय मिळविण्यासाठी येथील बळिराजा कृषक बचत गटाने विशेष मेहनत घेतली. या भागातील कृषिभूषण री. विशाल गावित यांचे यात विशेष योगदान राहिले. या गटातील मंडळी दिल्ली येथे जीआयसंबंधी पेटंट कार्यालयात आपल्या पारंपरिक वेषात डाळीच्या सादरीकरणासाठी आले होते. त्यांचे सादरीकरण संबंधित अधिकाऱ्यांना मान्य झाले आणि ही मंडळी दिल्लीहून आपल्या घरी जीआय घेऊनच परतली.

- गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ (लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)

आदिवासींच्या तुरीचा सन्मान 
गुजरात राज्याच्या सीमेपाशी नवापूर तालुका आहे. या तालुक्यात पिकणाऱ्या तूरडाळीला नुकतेच जीआय मानांकन मिळाले आहे. पूर्णतः पारंपरिक पद्धतीने आदिवासी समूहाने बनवलेली अशी ही डाळ अाहे. जीआय मिळाल्यामुळे जगासमोर दर्जेदार उत्पादन म्हणून पुढे येण्यास तिला संधी प्राप्त झाली आहे. या डाळीत फोलिक अॅसिड हा स्त्रियांसाठी महत्त्वाचा पोषकघटक असतो. गर्भाच्या विकासासाठी त्याची आवश्यकता असते. अनेक प्रकारचे जन्मदोष टाळण्यासाठी तो मदत करू शकतो. न्यूयॉर्क राज्याच्या आरोग्य विभागाच्या निष्कर्षानुसार आपल्या आहारात फोलिक अॅसिडची पुरेशी मात्रा असल्यास मस्तिष्क आणि पाठीच्या कण्यांमध्ये काही दोष ७० टक्क्यांपेक्षा कमी करण्यास मदत होऊ शकते. एवढेच नव्हे तर काही आजारांचा धोकादेखील कमी होतो. डाळींचे नियमित सेवन केल्याने हृदयविकार, विशिष्ट प्रकारचे कर्करोग, मधुमेह यांचा धोकाही कमी होतो.

Web Title: agro news Tribal farmers have got the 'GI' of Navapur Turadal