देशी तुलैपुंजी तांदळाचा सुगंध देशभर

गणेश हिंगमिरे
शुक्रवार, 21 जुलै 2017

प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत सुगंधी तांदळाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भातशेतीचा सुमारे २५०० वर्षांचा इतिहास भारताला लाभलेला आहे. त्यामुळे भारतीय तांदळाला जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तांदळाचे वर्गीकरण साधारणपणे त्याची गुणवत्ता आणि लागवडीचा भौगोलिक प्रदेश असे केले जाते. त्याचबरोबर बासमती आणि त्याव्यतिरिक्त (नॉन बासमती) असेही वर्गीकरण होते. 

प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत सुगंधी तांदळाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. भातशेतीचा सुमारे २५०० वर्षांचा इतिहास भारताला लाभलेला आहे. त्यामुळे भारतीय तांदळाला जगभरात मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तांदळाचे वर्गीकरण साधारणपणे त्याची गुणवत्ता आणि लागवडीचा भौगोलिक प्रदेश असे केले जाते. त्याचबरोबर बासमती आणि त्याव्यतिरिक्त (नॉन बासमती) असेही वर्गीकरण होते. 

तुलैपुंजी तांदळाची कथा 
तुलैपुंजी हा पश्चिम बंगालचा नॉन बासमती मात्र सुगंधी तांदूळ आहे. केंद्र सरकारने २०१५-१६ मध्ये जाहीर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणात पश्चिम बंगालसाठी उज्ज्वल चित्र तयार केले. त्यानुसार अनेक बाबतींत सर्वोत्तम कामगिरी किंवा उल्लेखनीय बाबी असलेले हे राज्य मानले जात आहे. केंद्र सरकारद्वारे नुकत्याच जूनमध्ये प्रकाशित झालेल्या भौगोलिक मानांकनपत्रिकेत तुलैपुंजी तांदळाच्या भौगोलिक संकेताची पुष्टी सरकारद्वारे करण्यात आली. एका उपलब्ध माहितीनुसार पश्चिम बंगाल हे भारतातील सर्वांत मोठे भात उत्पादक राज्य आहे. राज्याचे भाताचे वार्षिक उत्पादन सुमारे १५८ लक्ष टन आहे. यापैकी सुमारे ११० लक्ष टन भाताची खरीप हंगामात कापणी होते. त्यामुळेच पश्चिम बंगाल हे देशातील भातशेतीच्या विविधतेचे सर्वांत श्रीमंत आगार मानले जाते. तांदूळ हा बंगालमधील लोकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक मानला जातो. बंगाल राज्याच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे मोठे योगदान आहे.

इतिहास तुलैपुंजीचा
तुलैपुंजी या शब्दाचा अर्थ “तुळान” किंवा “तुळशी” या शब्दापासून घेतला आहे. कारण, या तांदळाला तुळशीसारखा सुगंध आणि कापसासारखा रंग प्राप्त झाला आहे. ज्याचा उल्लेख बांगलादेशी लिखाणामध्ये आलेला आहे. मुख्यतः तुलैपुंजी भाताचे उत्पादन पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील रायगंजच्या उपविभागात घेतले जाते. सन १९७६ च्या सुमारास या तांदळाचा पहिला लेखी शासकीय पुरावा दिनाजपूर जिल्ह्यातील गॅझेटियर मध्ये “तुला पुंज” नावाने आढळला गेला; मात्र सांस्कृतिक पुरावा लक्षात घेता या तांदळाच्या शेतीला १७५ ते २०० वर्षांचा इतिहास आहे, असे मानले जाते. त्याचप्रमाणे हा तांदूळ अनेक वर्षांपासून या भागातील भैरवी आणि कल्याण गोस्वामी मंदिरात नैवेद्य म्हणून देवाला दाखविला जायचा.

तांदळाची शेती  
दिनाजपूर जिल्ह्यातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने तुलैपुंजीची शेती करतात. जून आणि जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात रोपवाटिकेचे काम सुरू होते. रोप २५ ते ३० दिवसांचे होते तेव्हा पुनर्लागवड केली जाते. काही ठिकाणी रोपलावणी सप्टेंबरच्या अखेरीस केली जाते. मूलतः योग्य प्रमाणात ओलावा आणि माती हेच लागवडीसाठी प्रमुख घटक आहेत. तुलैपुंजी हा देशी तांदूळ आहे. मध्यम-लांब सडपातळ असे त्याचे दाणे आहेत. चव स्वादिष्ट आहे. त्यात अमायलोजचे प्रमाणही असल्याने चमकदार स्वरूप मिळाले आहे. यात ७.३ टक्के प्रथिने आहेत. या वाणात रोग व कीटक प्रतिकारशक्तीही आहे. पुलाव, बिर्याणी तसेच गोड पदार्थ तयार करण्यासाठीही या सुगंधी तांदळाला चांगली मागणी आहे. या तांदळाची शेती करण्यासाठी अत्यंत काटेकोर व्यवस्थापनाची गरज लागते.  त्याअनुषंगाने विशेष काळजी घेणे आवश्यक ठरते. अनेक वर्षांपासून या तांदळाचे सेंद्रिय पध्दतीने उत्पादन अनेक शेतकरी घेत आहेत. लागवडीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांनंतर कापणी होते. उशिरा कापणी केल्यास पिकाचे नुकसान होऊ शकते.

तांदळाचे वैशिष्ट्य 
या तांदळाचे वैशिष्ट्य म्हणजे मध्यम-सडपातळ, पांढरा रंग असलेले दाणे हे एका वर्षापेक्षा जास्त काळापर्यंत आपला सुगंध टिकवून ठेवतात. दिनाजपूर जिल्ह्यातील माती विखुरलेली आहे. या भागाच्या उत्तरेकडील भाग दक्षिणेकडील भागापेक्षा अधिक समान आहे. चिकट माती असल्याने या भागात चांगल्या पध्दतीने तुलैपुंजीची लागवड केली जाते. या भागातील माती गाळाची, सुपीक असून ती साधारणतः अाम्लीय स्वरूपाची आहे. पश्चिम बंगाल कृषी विभागाच्या सर्वेक्षणसंबंधित माहितीनुसार तुलैपुंजीचे वार्षिक उत्पादन सुमारे आठ हजार हेक्टर क्षेत्रात घेतले जाते. त्यापैकी एक हजार क्षेत्र दक्षिण दिनाजपूर भागात, तर बाकीचे उर्वरित दिनाजपूर भागात घेतले जाते. एकूण क्षेत्राची व्याप्ती आणि सरासरी उत्पादकता पाहता दिनाजपूर जिल्ह्यात दरवर्षी सुमारे १८ हजार टन तुलैपुंजीचे उत्पादन येत्या काही वर्षांत होईल.

- गणेश हिंगमिरे, ९८२३७३३१२१ (लेखक जीआय विषयातील आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ व राष्ट्रीय पुरस्कार विजेते अाहेत.)

Web Title: agro news tulaipunji rice