शिवारात साकारले आंतरपिकांचे वैविध्यपूर्ण प्रयोग 

शिवारात साकारले आंतरपिकांचे वैविध्यपूर्ण प्रयोग 

नांदेड जिल्ह्यात हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील ४५ वर्षीय उच्चशिक्षित उमेश मधुकरराव मामीडवार यांना विविध आंतरपिकांचे सातत्याने प्रयोग करण्याचे वेडच लागले आहे. कापूस, सोयाबीन, तूर, शेवगा, कोबी काकडी, हळद, केळी, भेंडी, टोमॅटो अशी किती पिके सांगावी. वर्षभर विविध पिके या पद्धतीने घेताना एका पिकातून दुसऱ्या पिकातील जोखीम त्यांनी कमी केली आहे. 

चिंचगव्हाण (ता. हदगाव, जि. नांदेड) येथील उमेश मामीडवार यांची तीन भावांची मिळून सुमारे  शंभर एकर शेती आहे. मात्र या शेतीची सर्व जबाबदारी उमेश हेच सांभाळतात. अलीकडील काळात एखादे, दुसरे पीक हवामान व दराच्या अनुषंगाने परवडत नाही. त्यामुळे भविष्यातील शेतीचे धोके कमी करण्यासाठी उमेश यांनी पिकांची विविधता जपली. त्याचबरोबर विविध आंतरपिकांचे प्रयोगही केले. काही यशस्वी झाले, काही फसलेदेखील. पण म्हणून हा ध्यास त्यांनी काही सोडलेला नाही. 

मागील वर्षीचा प्रयोग
मागील वर्षी उन्हाळ्यात शेतीची चांगली मशागत करून ५ फुटांचे बेड पाडले. त्यावर नावीन्यपूर्ण रीतीने दोन एकरांवर कापूस, तूर, सोयाबीन व शेवगा लावला. शेवग्याच्या दोन रोपांतील अंतर सात फूट ठेवले. तिसऱ्या बेडवर तुरीच्या दोन ओळी लावल्या. दोन बेडमधील जागेत एक ओळ सोयाबीन घेतले. अशा क्रमाने उर्वरित क्षेत्रावर लागवड झाली. पिकांतील अंतराचा विचार केला असता तुरीची लागवड १५ बाय दीड फूट, शेवग्याची १० बाय सात फुटांवर झाली. कापसाच्या दोन रोपांत एक फूट अंतर ठेवले. कापूस, सोयाबीन व तुरीचे दोन एकरांत अनुक्रमे २० क्विंटल, १० क्विंटल व १० क्विंटल उत्पादन  मिळाले. 

हळद + तूर 
हळद अधिक तुरीची लागवड खरीप २०१६ मध्ये नऊ एकरांवर केली. दोन्ही पिके ठिबक सिंचनावर घेतली. हळदीची लागवड करण्याअाधी ट्रॅक्टरच्या मदतीने प्रत्येकी पाच फुटांवर बेड पाडले. तीन सलग बेडवर हळदीच्या दोन ओळी लावल्यानंतर चौथ्या बेडवर एका ओळीत हळद तर दुसऱ्या ओळीत दोन रोपांमध्ये दीड फूट अंतर ठेवून तुरीची लागवड केली. अशा रीतीने तुरीची १५ बाय दीड फुटांवर लागवड झाली. या पद्धतीत दोन्ही पिकांची वाढ अत्यंत समाधानकारक झाली. नऊ एकरांत २३० क्विंटल वाळलेली हळद तर ५० क्विंटल तुरीचे उत्पादन मिळाले. तुरीची विक्री ५०५० प्रति क्विंटलप्रमाणे केली. हळदीला क्विंटलला ५४०० ते ५८०० रुपये दर मिळाला. हळदीचा बंडा यंदाच्या हंगामासाठी बियाणे म्हणून उपयोगात येणार आहे.

मिरची + तूर
मिरची अधिक तूर एक एकरावर घेतली. मिरचीच्या पाच ओळींनंतर सहावी ओळ तुरीची घेतली. तुरीच्या दोन रोपांत एक फुटाचे अंतर ठेवले. या पद्धतीत तूर १५ बाय एक फुटावर येते. परंतु पुढे  पावसाची झड लागल्यामुळे बरीचशी मिरची वाळून गेली. केवळ ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. तुरीचे उत्पादन मात्र सहा क्विंटल मिळाले.

टोमॅटो + तूर
टोमॅटोत शेतकरी सहसा तूर घेत नाहीत. परंतु उमेश यांनी हा प्रयोग चार एकरांत केला. प्रत्येकी चार फुटांचे बेड पाडून सुरवातीच्या चार बेडवर टोमॅटोची लागवड दोन रोपांत एक फुटाचे अंतर ठेवून केली. टोमॅटोच्या प्रत्येक चार ओळींनंतर तुरीची एक ओळ लावली. तुरीच्या दोन रोपांमध्ये एक फुटाचे अंतर ठेवले. चार एकरांमध्ये तीन हजार क्रेट (प्रति क्रेट २५ किलो) टोमॅटोचे उत्पादन मिळाले. प्रति क्रेट सरासरी १३० रुपये दर मिळाला. या काळात टोमॅटोचे दर पडले होते. तुरीचे २० क्विंटल उत्पादन मिळाले.

काही प्रयोग दृष्टिक्षेपात
केळी + कोबी 

सहा बाय पाच फुटांवर केळीची पाच एकरांत ठिबकवर २३ जून २०१६ मध्ये टिश्‍युकल्चर (जी-९) रोपांची लागवड केली. पाच एकरांत केळीच्या १०० ओळी बसल्या. केळीच्या दोन्ही बाजूंने एक फूट अंतरावर कोबी लावला. कोबीच्या दोन रोपांत एक फूट अंतर ठेवले. कोबीचे एकूण क्षेत्रातून खर्च वजा जाता एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. केळीचे उत्पादन सुरू झालेले नाही.

भेंडी + तूर 
भेंडी अधिक तूर हा प्रयोग दीड एकरांवर केला. क्विंटलला सात हजार रुपये हमीभावाने बियाणे खरेदी करण्याचा करार त्यांनी एका कंपनीसोबत केला. भेंडीच्या सात ओळींनंतर तुरीची एक ओळ होती. दीड एकरांतून ११ क्विंटल भेंडी बीजोत्पादन तर तुरीचे सात क्विंटल उत्पादन झाले. सन २०१५ मध्ये हळदीत लावलेला तीन एकर व २०१५ मध्ये कापसातील दोन एकर असा पाच एकर शेवगा होता. यंदा मात्र शेवग्याचे दर मोठ्या प्रमाणात खाली आल्याने शेवगा सद्यःस्थितीत तरी घेतलेला नाही. 

कापूस + तूर 
कापूस अधिक तूर- क्षेत्र २० एकर- कापूस ४ बाय एक फुटांवर. कापसाच्या तीन ओळींनंतर तुरीची एक ओळ. तुरीच्या दोन रोपांत एक फूट अंतर. २० एकरांतून कापसाचे २२५ क्विंटल, तर तुरीचे ८५ क्विंटल उत्पादन मिळाले.

सोयाबीन + तूर 
५५ एकरांत सोयाबीन अधिक तूर- सोयाबीनच्या सात ओळींनंतर आठवी अोळ तुरीची घेतली. पेरणी ट्रॅक्टरने केली. संपूर्ण एकरांत सोयाबीनचे ५०० क्विंटल तर तुरीचे २७५ क्विंटल उत्पादन मिळाले.

हळदीमध्ये शेवगा
खरीप २०१४ मध्ये दोन एकरांत ४ बाय एक फुटावर कापूस व कापसाच्या दोन ओळींत एक ओळ सोयाबीनची घेतली. या दोन एकरांत कापसाचे २६ क्विंटल तर १० क्विंटल सोयाबीनचा बोनस मिळाला. 
खरीप २०१५ मध्ये हळद अधिक शेवगा अशा नावीन्यपूर्ण प्रयोगाची तीन एकरांवर लागवड केली होती. शेवटी शेवटी हळदीला पाणी कमी पडले. त्यामुळे हळदीचे तीन एकरांत ४० क्विंटल उत्पादन मिळाले. मात्र हळदीला ८००० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे दर मिळून उत्पन्न आश्वासक मिळाले.
शेवग्याला किलोला ८ ते १० रुपये दर तर एक लाख रुपये उत्पन्न मिळाले. प्रति झाड दोन क्विंटल शेवगा उत्पादन मिळाले.
या प्रयोगात हळदच निघाल्यानंतर शेवग्यात कोबी व काकडी घेतली. काकडीचे ४० हजार रुपये मिळाले. किलोला १० रुपये दर जागेवर मिळाला. कोबी गड्ड्यालाही पाच रुपये दर मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com