संकटांना शरण न जाता भाजीपाला शेतीत यशस्वी वाटचाल

नुकत्याच लागवड झालेल्या टोमॅटो पिकाला अाधार देण्याचे काम सुरू अाहे.
नुकत्याच लागवड झालेल्या टोमॅटो पिकाला अाधार देण्याचे काम सुरू अाहे.

मुंबईसारख्या मायानगरीत जाऊन अायुष्याला अाकार देताना, शेतीच्या आकर्षणापोटी गावाकडे परतणारी माणसे दुर्मिळच. कृष्णा फडतरे (नसरापूर, जि. पुणे) त्यापैकीच एक. आपल्या भागातील पर्जन्यमानाचा विचार करून वर्षातील दोन हंगामांत भाजीपाला पिकांची आखणी हुशारीने केली. विक्री व्यवस्थाही कुशलपणे उभारली. अनेक संकटे आली; पण शरण न जाता त्यांची वाटचाल आश्वासक राहिली आहे. 

पुणे सातारा रस्त्यावर नसरापूर (जि. पुणे) गावाजवळच बनेश्वर हे प्रसिद्ध निसर्गरम्य देवस्थान अाहे. बनेश्वर मंदिराला लागूनच कृष्णा फडतरे यांची १० एकर अाणि काकांची १० एकर अशी २० एकर बागायती शेती अाहे. त्यांचे मूळ गाव बोपगाव (ता. पुरंदर, जि. पुणे) असले तरी आजोबांनी १९७७ मध्ये नसरापूरमध्ये २० एकर शेती खरेदी केली. इथेच फडतरे कुटुंब स्थायिक झाले. 

सुरवातीचे प्रयत्न

कृष्णा सुरवातीला मुंबईत तीन भावांसोबत ऊस रसवंतीचा व्यवसाय करायचे. शेतीच्या आकर्षणामुळे गावी येऊन ते शेती करू लागले. सन २००५ मध्ये वडिलांचे निधन झाले. त्यामुळे शेतीची जबाबदारी स्वीकारत कृष्णा गावी परतले. शेताजवळूनच शिवगंगा नदी वाहते. नसरापूरचा प्रदेश पावसाचा असल्याने पाणी मुबलक असते. गावात जास्त प्रमाणात भाजीपाला, गहू, ज्वारी ही पिके घेतली जातात.

कृष्णा यांनी सुरवातीला आठ एकरांवर उसाची लागवड केली. त्यातून घरच्या रसवंतीला उसाचा पुरवठा होऊ लागला. परंतु परिसरात जंगली प्राण्यांचा वावर असल्यामुळे नुकसानही मोठ्या प्रमाणात होऊ लागले. अखेर कृष्णा यांनी पीकपद्धतीत बदल करण्याचा निर्णय घेतला. 
 

अशी आखली पीकपद्धती

जमिनीचा पोत, पाऊस व हवामान लक्षात घेऊन तसेच वर्षभर मागणी राहील हे पाहताना भाजीपाला पिकांची निवड केली. 
पावसाचा प्रदेश असल्याने जून-जुलैमध्ये लागवड शक्य होत नाही. 
अशा वेळी दोन हंगाम व दोन प्रकार निश्चित केले. 

शेतीची वैशिष्ट्ये

दोन्ही हंगामांत टोमॅटो, काकडीत घेवड्याचे आंतरपीक 
सर्व पिकांसाठी ठिबक सिंचन 
शेणखत, दुग्धोत्पादन अाणि शेतीच्या कामासाठी दोन गायी, दोन म्हशी अाणि दोन बैलांचे पालन
दररोज सहा मजूर कामाला. रोजच्या देखरेखीसाठी दोन सालगड्यांची नेमणूक.
मशागतीच्या कामासाठी ट्रॅक्टर 
बांधावर साग, अांबा, नारळ, पपई, थाई, लिंबू आदींची लागवड
वर्षातून दोन वेळा कांदा. पाऊस जास्त असल्यामुळे हळवी जात येत नाही.
घरच्या जनावरांसाठी एक ते दीड एकरावर चारा पिके 
आॅगस्टची रोपे विकत; मात्र उन्हाळी लागवडीसाठी घरीच तयार केली जातात.
मिश्र खते तसेच शेणखत, निंबोळी खत आदींच्या वापरावर भर. रासायनिक खते वापरणे कमी केल्याने शेतमालाची टिकवण क्षमता वाढली अाहे.
लेबल क्लेम असलेल्या कीडनाशकांचा वापर

लाखोंचे नुकसान; पण थांबणे नाही 
सन २००९ मध्ये वादळी वाऱ्यामुळे चार एकर टोमॅटो अाणि अाठ एकर उसाचे संपूर्ण नुकसान झाले. अलीकडच्या नोटाबंदीच्या काळात तर पूर्ण सात एकरांवरील हाताशी अालेल्या टोमॅटो पिकाला काहीच मूल्य उरले नाही. काही वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे संपूर्ण विहीर पडून बुजून गेली. शेतात पूर्ण दलदल झाली. शेती करणेच ठप्प झाले. या वेळी तब्बल १५ लाख रुपयांचे नुकसान झाले. परंतु न थांबता पुन्हा विहिरींचे अारसीसी बांधकाम केले. यंदाही टोमॅटोला काहीच दर नव्हता. आठ लाख रुपयांचे नुकसान झाले. मजुरांची समस्या तर नेहमीच असते. अनेक वेळा उत्पादनाचा खर्चही निघत नाही. परंतु जिद्दीने, न खचता संकटांवर मात करीत शेतीलाच सर्वस्व मानून मार्गक्रमणा केली अाहे.

विक्री व्यवस्थापन
पुणे येथील मार्केट यार्डमध्ये विक्री.

बनेश्वर हे प्रसिद्ध देवस्थान शेताच्या अगदी नजीक. त्यामुळे पर्यटकांना ताज्या भाज्यांची थेट विक्री केली जाते. शनिवार, रविवार अाणि सुटीच्या दिवशी पर्यटकांची संख्या जास्त असल्याने विक्रीही जास्त  होते.

व्यापारी जागेवर येऊनदेखील खरेदी करतात. 

हातविक्रीतून किलोमागे १० रुपये अधिक मिळतात. 
उदा. घेवडा - मार्केट दर - किलोला ५ ते १२ रु. 
तर हातविक्री - १० ते २० रु.
पालेभाज्या - पेंडीला - ४ ते ५ रु. तर हातविक्री- १० रु.

या गोष्टींमुळे शेती झाली सुकर 
उत्पादनाबरोबर विक्री व्यवस्थेचीही घडी बसवली. 

दरवर्षी अन्यत्र होणारे लागवडीचे क्षेत्र लक्षात घेऊन त्यानुसार आपल्या एकरांत बदल. त्यातून चांगला दर मिळवण्याचा प्रयत्न 

कृष्णा यांना सुरवातीला शेतीचा अनुभव जवळपास नव्हता. मात्र वडिलांच्या निधनानंतर अर्थार्जनाचा दुसरा मार्ग न निवडता काकांच्या मदतीने शेती सुरू केली. आज काका, काकी व पत्नी हेदेखील मोठी साथ देतात. 

काळानुरूप कृषी पर्यटनाची जोड
निसर्गरम्य परिसर अाणि बनेश्वर मंदिरामुळे या भागात पर्यटकांची कायम रेलचेल असते. हीच संधी अोळखून शेतीला कृषी पर्यटन केंद्राची जोड देण्याचे ठरविले आहे. फळझाडे, शोभेच्या झाडांची लागवड केली अाहे. नव्या पिढीची शेतीशी नाळ तुटत चालली अाहे. त्यामुळे पारंपरिक अाणि आधुनिक शेतीच्या प्रशिक्षणासह शालेय सहलींना प्राधान्य देण्याचा कृष्णा यांचा विचार अाहे.
 
शेतकऱ्यांसाठीही सक्रिय 
स्वतःबरोबर अन्य शेतकऱ्यांनाही किफायतशीर शेती करता यावी, यासाठी कृष्णा बळीराजा शेतकरी संघाच्या माध्यमातून सक्रिय अाहेत. उत्पादन, मार्केटिंग, प्रक्रिया व विक्री अशी साखळी विकसित करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी संघ कार्यशील अाहे.

ॲग्रोवनचे नियमित वाचन

ॲग्रोवनच्या पहिल्या दिवसापासून कृष्णा ॲग्रोवनचे नियमित वाचक अाहेत. विविध पीक सल्ले, हवामानाचा अंदाज यामुळे शेतीचे व्यवस्थापन ठेवणे सोपे जाते. तसेच ज्ञानातून प्रेरणा मिळते असे ते सांगतात.
- कृष्णा फडतरे, ९८८१८९३२०८

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com