कापूस पिकासाठी यवतमाळ जिल्हा पोषक नाही

कापूस पिकासाठी यवतमाळ जिल्हा पोषक नाही

नागपूर - यवतमाळ जिल्ह्यात उथळ ते मध्यम खोल जमिनी (मातीची खोली ० ते ५० सें.मी. च्या मध्ये) सर्वाधिक असल्याने या जमिनीत अधिक अन्नद्रव्य तसेच पाण्याची गरज असणारा बीटी कापसाचा पर्याय फायदेशीर ठरत नसल्याचा निष्कर्ष राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व जमीन उपयोग संस्थेने नोंदविला आहे. कापसाऐवजी ज्वारीसारख्या पिकाचा पर्याय निवडल्यास त्यामुळे या भागातील आत्महत्या थांबतील, असाही दावा करण्यात आला आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात साडेसात लाख हेक्‍टरचे पीक क्षेत्र आहे. त्यापैकी सर्वाधिक साडेचार लाख हेक्‍टरवर कपाशीची लागवड होते. परंतु अपेक्षित उत्पादकता व उत्पन्नाअभावी या जिल्ह्यात शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍य वाढीस लागत आत्महत्या होत आहेत. दरम्यान, राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व जमीन उपयोग संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात यवतमाळ जिल्ह्यातील जमिनी कापूस पिकाकरिता पोषक नसल्याचा निष्कर्ष नोंदविण्यात आला आहे. कमी खोलीच्या जमिनीत पिकाला अन्नद्रव्य मिळण्यास मर्यादा येतात. कपाशी पिकाच्या कार्यशील मुळ्या खोलवर रुजतात. ५० ते ६० से.मी.पर्यंत त्या खाली जातात. यवतमाळ जिल्ह्यातील उथळ जमिनीत काही अंतरावरच मुरूम लागतो परिणामी मुळ्या खाली रुजण्यास अडथळे निर्माण होतात.

मध्यम खोल जमिनीत कापसाच्या सोट मुळ्यांनाही खाली रुजण्यात अडसर उत्पन्न होतो. सोट मूळ हे पिकाची पाण्याची गरज भागविते. बोंड लागल्यानंतर पुरेसा पाणीपुरवठा होत नाही, त्यामुळे बोंडगळीची समस्या निर्माण होते. त्याचा उत्पादकतेवर परिणाम होत असल्याचे निरीक्षण आहे. 

देशी कपाशी वाण घ्या
बी.टी. कापूस पिकास अन्नद्रव्य आणि पाणी अधिक लागते. त्या तुलनेत देशी किंवा सरळ कपाशी वाणाला पाण्याची गरज कमी राहते. त्यामुळे देशी किंवा सरळ कपाशी वाण देखील या भागात बी.टी.च्या तुलनेत चांगले येऊ शकते. 

जमिनीची प्रत
यवतमाळ जिल्ह्यात ४० टक्‍के जमीन खोल ते मध्यम खोल, तर ६० टक्‍के जमीन उथळ ते अतिउथळ आहे. या जमिनीत २२ सें.मी. नंतर मुरूम लागतो. त्यामुळे या जमिनीत घेतल्या जाणाऱ्या पिकाला दर तीन ते चार दिवसांआड पाण्याची गरज लागते, असेही डॉ. सिंह म्हणाले. 

ज्वारी, मका ठरला फायद्याचा सौदा 
यवतामळ जिल्ह्यात ज्वारी, मका यासारखी पीक पद्धती फायदेशीर ठरू शकते, असे संस्थेचे संचालक डॉ. एस. के. सिंह यांनी सांगितले. ज्वारीच्या मुळ्या या १५ सें.मी.पर्यंतच अन्नद्रव्याकरिता खाली जातात. मका, बाजरी देखील असेच पीक आहे. याच्या मुळ्यादेखील कमी रुजतात. अशा पिकातून मनुष्यासोबत जनावरांच्यादेखील अन्नाची गरज भागविता येते. त्यामुळे अशा पिकांची निवड या भागातील शेतकऱ्यांकरिता फायद्याचा सौदा ठरणारी राहणार आहे.

३७ टक्‍के जमीनच शेती उपयोगी
यवतमाळ जिल्ह्यात केवळ ३७ टक्‍के जमीनच शेती उपयोगी असल्याचे या संस्थेच्या अभ्यासातील निरीक्षण आहे. उर्वरित जमीन हलकी असल्याने त्यामध्ये सिंचनात सातत्य राहिले तर उत्पादकता घेणे शक्‍य होईल. त्याकरिता सक्षम सिंचन सोयीची गरज आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील जमीन
२.१६ टक्‍के शेतीसाठी अत्यंत उपयोगी
१८.५ टक्‍के साधारण शेती उपयोगी जमीन
१५.८७ टक्‍के साधारण
एकूण सरासरी - ३७ टक्‍के जमीन शेती उपयोगी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com