‘क्रॉप कव्हर’ने केली पीक संरक्षण खर्चात बचत

‘क्रॉप कव्हर’ने केली पीक संरक्षण खर्चात बचत

वातावरणातील बदलामुळे पीक संरक्षणाचा खर्च सातत्याने वाढत आहे. त्यात बचत करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत शेतकरी घेऊ लागले आहेत. जळगाव सुपे (ता. बारामती, जि. पुणे) येथील शेतकऱ्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या साह्याने क्रॉप कव्हर, पॉली मल्चिंग तंत्राचा वापर करीत कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. ‘केव्हीके’ने घेतलेल्या क्रॉप कव्हर वापराच्या प्रयोगाचे निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. 

पुणे जिल्ह्यातील जळगाव सुपे (ता. बारामती) येथील सुनील बबन जगताप यांनी पदवीपर्यंत शिक्षण झाल्यावर १९९७ पासून २०१२ पर्यंत जेजुरी आणि औरंगाबाद येथे खासगी नोकरी केली. मात्र, नोकरीमध्ये मन रमत नव्हते. त्यांची वडिलोपार्जित कोरडवाहू साडेचार एकर शेती होती. कोरडवाहू शेतीतून घर चालवणे तसे अडचणीचे असले तरी धाडस करीत २०१२ मध्ये नोकरीचा राजीनामा दिला. जमवलेल्या थोड्याबहुत रकमेतून एक विहीर व एक बोअर घेतली. सुरवातीला ठिबक सिंचन करीत एक एकर डाळिंबाची लागवड केली. डाळिंबामध्ये आंतरपीक म्हणून कलिंगड व नंतर झेंडू पिकांची लागवड केली. त्यातून आर्थिक प्राप्ती झाल्याने आणखी एक एकर डाळिंब लागवड केली. 

पूरक व्यवसायातही घेतली भरारी 
 २०१२ मध्ये जगताप यांनी पूरक व्यवसाय म्हणून दुग्धोत्पादन करण्याचा निर्णय घेतला. दोन  गाईपासून सुरवात केली. आता त्यांच्याकडे आठ गाई आहेत. प्रति दिन सरासरी ९० ते १०० लिटर दूध डेअरीला जाते. 

चाऱ्यासाठी २.५ ते ३ एकर क्षेत्रामध्ये मका, ज्वारी व मेथी घास या चारा पिकांची लागवड केली आहे. 

चार वर्षापूर्वी गावातील पहिला मुरघास प्रकल्प राबविला. आज गावात १०० ते ११० लोकांकडे मुरघास प्रकल्प असून, गावातील दूध उत्पादन प्रति दिन ४ ते ४. ५ हजार लिटर आहे. 

हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेसाठी हायड्रोपोनिक्स पद्धतीचा वापरही जगताप यांनी केला होता. गेल्या वर्षी १० क्विंटल मक्याचा चारा शेळ्यांसाठी तयार केला. 

२०१३ मध्ये सुरवातीला २४ हजार रुपये गुंतवत केवळ सहा शेळ्यांपासून शेळीपालनाला सुरवात केली. आता त्यांच्या ६५ शेळ्या असून, आतापर्यंत बोकड विक्रीतून १ लाख ७० हजार रुपये मिळाले आहेत. 

पाणी साठवण्यासाठी ३० मी. बाय ३० मी. बाय ३ मीटर आकाराचे शेततळे उभारले आहे. ठिबक सिंचनद्वारे पाण्याचा काटेकोर वापर केल्याने अद्यापही शेततळे अर्ध्यापर्यंत भरलेले आहे.  
 
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर 
 डाळिंबामध्ये विविध आंतरपिके घेतली. प्रथम प्लॅस्टिक आच्छादनावर कलिंगड लागवड केली होती. आता त्यामध्ये दोडका लागवड आहे. प्लॅस्टिक आच्छादनामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन पिकास पाण्याच्या दोन पाळ्या कमी लागल्या. तसेच तणांचा प्रादुर्भावही कमी झाल्याने तणनियंत्रणाच्या खर्चात बचत झाल्याचे सुनील जगताप यांनी सांगितले. 

कलिंगडामध्ये प्रथमच त्यांनी नॉन ओव्हन (क्रॉप कव्हर) चा वापर केला होता. त्यासाठी एकरी १३ हजार रुपये खर्च झाला. पिकावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव एकदम कमी होता. यामुळे पीक संरक्षणाच्या खर्चात व कष्टामध्ये बचत झाली. एकूण पिकाच्या कालामधीमध्ये केवळ दोन फवारण्या कराव्या लागल्या. 

पेपर नसलेल्या कलिंगडाच्या ओळीमध्ये पिकाची उगवण सावकाश झाली. तसेच वाढ कमी राहून किडीचा प्रादुर्भाव अधिक असल्याचे दिसून आले. 

आमच्या भागामध्ये वन्य प्राण्यांचा विशेषतः हरणांचा वावर अधिक आहे. ते पिकांचा फडशा पाडतात. या क्रॉप कव्हरमुळे कलिंगड पिकांचे संरक्षण झाले असल्याचे सुनील जगताप यांनी सांगितले. 

डाळिंबामध्ये आंतरपीक असल्याने कलिंगडाच्या रोपांची संख्या कमी (३८००) असल्याने एकरी ८ टन उत्पादन मिळाले. त्याला सरासरी ६ ते ८ प्रति किलो असा दर मिळाला आहे. 
सुनील बबन जगताप, ९१५८३८६६६७.
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे विषय विशेषज्ञ आहेत.) 

कृषी विज्ञान केंद्रातर्फे तंत्रज्ञान प्रसार 
वातावरणातील बदलांचे पिकांवर होणारे विपरीत परिणाम टाळण्यासाठी आणि किडी रोगांचा प्रादुर्भाव कमी ठेवण्यासाठी पिकांवर आच्छादन करण्याचे तंत्र वापरले जाते. त्याला क्रॉप कव्हर किंवा नॉन ओव्हन (पॉली प्रॉप्रीलीन) कव्हर असे म्हणतात. या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांमध्ये प्रसार करण्यासाठी बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राने पुढाकार घेतला आहे. जळगाव सुपे येथील तीन शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये या वर्षी कलिंगडामध्ये प्रयोग केला होता. या प्रयोगासाठी म्हणून अनुदानावर क्रॉप कव्हर शेतकऱ्यांना पुरवण्यात आले होते. या शेतकऱ्यांना विषय विशेषज्ञ वाय. एल. जगदाळे यांनी मार्गदर्शन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com