जमिनीवरील अत्याचार थांबवा!

जमिनीवरील अत्याचार थांबवा!

पुणे  - एक इंच माती तयार होण्यासाठी ५०० वर्षे लागतात. मातीमधील कोट्यवधी जीवजंतुंमुळेच जमीन हा घटक जिवंत असतो. या मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी जमिनीवरील अत्याचार थांबवायला हवेत, असा सूर ''अॅग्रोवन''च्या वर्धापन दिननिमित्ताने आयोजिलेल्या चर्चासत्रात उमटला. अन्न सुरक्षा, पोषण सुरक्षा आणि मानवी आरोग्याच्या गंभीर समस्येपासून बचाव करायचा असेल तर सुपीक जमीन हाच एकमेव पर्याय आहे, असा इशाराही यानिमित्ताने तज्ज्ञांनी दिला. 

'अॅग्रोवन'च्या तेराव्या वर्धापन दिन निमित्ताने  'जपाल माती, तर पिकतील मोती' या विषयावर पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात झालेल्या चर्चासत्राला राज्यभरातील शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर, सुभाष शर्मा, वासुदेव काठे, शास्त्रज्ञ डॉ. अजितकुमार देशपांडे यांची जमीन सुपीकतेवर केलेल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले. 

‘अॅग्रोवन‘चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, अॅग्रोवन हा माध्यम आणि कृषी क्षेत्रातील अनोखा प्रयोग ठरला आहे. कृषी विषयावरील एकमेव दैनिक म्हणून राष्ट्रीय पातळीवर गौरविलेला अॅग्रोवन आता शेतकऱ्यांचा आवाज बनला आहे. जमीन सुपीकतेचा मुद्दा आता कळीचा बनला असल्याने ‘ॲग्रोवन‘ने २०१८ हे वर्ष जमीन सुपीकता वर्ष म्हणून जाहीर केले आहे. या विषयावर वर्षभर विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. 

जमिनीतील जिवाणूंना सांभाळा : शर्मा
नैसर्गिक शेती करणारे सुभाष शर्मा यांनी जमिनीतील जिवाणूंना सांभाळण्याचा सल्ला या वेळी दिला. ते म्हणाले, “निसर्ग हाच शेतीचा गुरू आहे. शेतजमिनीलादेखील हवा, अन्न आणि पाण्याची गरज असते. त्याला आपण ज्ञान, नियोजन, श्रमाची जोड द्यावी. नैसर्गिक शेतीमुळे मला भरपूर उत्पादन, पैसा आणि आनंददेखील मिळतो आहे. तण, हिरवळीचे खत, पिकांचे अवशेष हे आपल्या जमिनीतील जीवजंतुंचे खाद्य आहे. त्याचा नाश होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी.”

मुळासकट तण उपटू नका : चिपळूणकर 
भूसूक्ष्मजीवांचा अभ्यास करणारे प्रयोगशील शेतकरी प्रताप चिपळूणकर यांनी शेतातील तण हेच आपल्या जमीन सुपिकतेचे मुख्य स्त्रोत असल्याचा निष्कर्ष मांडला. ते म्हणाले, “आधीच कुजलेले पदार्थ जमिनीत कधीही टाकू नयेत. कुजण्याची क्रिया जमिनीत होईल असे पदार्थ जमिनीला हवे असतात. मुळासकट तण न उपटता तणनाशकाने उभ्या तणाला मारून पुढे तेच जमिनीत गाडावे. गवताची मुळे, बुडखा यामुळे जमिनीची पाणीधारणा क्षमता वाढून हवा खेळती राहते. जमिनीची काळजी घेतल्यामुळेच मी शून्य मशागत तंत्रातून उत्तम ऊस व भात शेती करतो आहे.”

जमिनीला खतापेक्षाही पाणी घातक : काठे 
द्राक्षमहर्षी श्री. अ. दाभोळकर यांच्या प्रयोगांचा वारसा चालविणारे वासुदेव काठे यांनी जमिनीला खतांपेक्षाही जादा पाणीवापरातून धोका असल्याचा इशारा दिला. “सेंद्रिय कर्ब कमी होणे, रासायनिक खतांचा बेसुमार वापर आणि जादा पाणी दिल्यामुळे जमिनी नापिक झाल्या. मात्र, खतापेक्षाही जादा पाण्यामुळे जमिनीची सुपीकता जाते. प्रत्येक पिकाचे अवशेष हे त्याच जमिनीत गाडले जावेत. मिश्रधान्य, हिरवळीची खते, गवत यातून सुपीकता वाढते. रासायनिक खतांचा संतुलित वापर, पुरेसे पाणी आणि सेंद्रिय घटकांच्या वापरातून उत्तम शेती करता येते, असे श्री. काठे यांनी नमूद केले. 

एकात्मिक खत वापरातून समृद्धी - डॉ. देशपांडे 
आंतरराष्ट्रीय मृदा संशोधक डॉ. अजितकुमार देशपांडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात शेतकऱ्‍यांनी अगदीच सेंद्रिय किंवा फक्त रासायनिक अशी भूमिका न घेण्याचे आवाहन केले. “राज्यात कोणत्याही विद्यापीठाने सेंद्रिय घटक वगळून फक्त रासायनिक खतमात्रा देण्याच्या शिफारशी कधीही केलेल्या नाहीत. सेंद्रिय घटकांचा वापर हा अनिवार्यच आहे. मात्र, संतुलित प्रमाणात रासायनिक घटकांची जमिनीला आवश्यकता आहे. प्रत्येक गावाच्या भौगोलिक स्थितीनुसार मृदा परीक्षण करून सेंद्रिय व रासायनिक तंत्राचा एकात्मिक वापर झाल्यास जमीन सुपीकता धोक्यात येत नाही,” असे डॉ. देशपांडे यांनी स्पष्ट केले. 

जमीन सुपीकता हा विषय शास्त्रीय असूनही चर्चासत्राच्या निमित्ताने शास्त्रीय माहिती शेतकऱ्यांना सोप्या भाषेत मिळाली. त्यामुळे शेतकरी तल्लीन होत टिपण काढताना दिसत होते. ‘अग्रोवन‘चे वरिष्ठ उपसंपादक अमित गद्रे यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.

'ॲग्रोवन'चे कौतुक
जमीन सुपीकतेसारख्या दुर्लक्षित विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी ‘अॅग्रोवन‘ने २०१८ हे जमीन सुपीकता वर्ष जाहीर केले. तसेच, सुपीकतेसाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याबद्दल सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणात ‘अॅग्रोवन’चे कौतुक केले. या वेळी शेतकरी, शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी तसेच कंपनी प्रतिनिधींनी वर्धापनदिन निमित्ताने ‘अॅग्रोवन’ला भरभरून शुभेच्छा दिल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com