यंत्रांच्या साह्याने सकस गोळीपेंड पशुखाद्यनिर्मिती

Animal-feed
Animal-feed

नंदूरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) गोळीपेंड स्वरूपात पशुखाद्य निर्मितीचे तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे. येथील विजय कासार यांना केव्हीकेने मार्गदर्शन व तंत्रज्ञान सहकार्य केले. त्यानुसार कासार यांनी यांत्रिकीकरणाच्या साह्याने संतुलित, सकस खाद्यनिर्मितीचा हा प्रकल्प यशस्वी केला आहे. परिसरातील दूध उत्पादकांची गरज ओळखून चोख सेवा देत त्यांनी या खाद्याची विक्रीव्यवस्थाही सक्षम केली आहे. 

नंदुरबार जिल्हा प्रामुख्याने आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो. 

कापूस, मिरची, विविध भाजीपाला, अन्नधान्यांच्या बरोबरीने येथील शेतकऱ्यांचा पशुपालन हा देखील मुख्य व्यवसाय आहे. प्रत्येकाच्या घरी पशुधन आढळतेच. अलीकडील काळात दुष्काळ किंवा अन्य विविध कारणांनी चाराटंचाईची समस्या तीव्र झाली आहे. पशुपालन व्यवसाय शाश्वत करायचा असल्यास जनावरांना योग्य, समतोल व सातत्यपूर्ण आहार देणे महत्त्वाचे असते. परंतु, अनेक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांसाठी सकस आहार उपलब्ध करणे शक्य होत नाही.

पशुखाद्यनिर्मितीसाठी राईस ब्रान 
नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राने (केव्हीके) आपल्या भागातील पशुआहाराची समस्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडवण्याचे ठरवले. येथील प्रयोगशील व्यावसायिक विजय कासार हे केव्हीकेच्या संपर्कात होते. पशुआहार व त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्ती या विषयी केव्हीकेचे  पशुवैद्यक डॉ. महेश गणापुरे यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. जिल्ह्यात भात लागवड मोठ्या प्रमाणात होते. केव्हीकेच्या माध्यमातून ग्रामस्तरावर साळीपासून तांदूळ तयार करण्यासाठी ‘मोबाईल राईस मिल’ची शृंखलाच नवापूर तालुक्यात तयार होत आहे. या प्रक्रियेतून मिळणारा ‘राईस ब्रान’ हा निघणारा घटक मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात उपलब्ध होतो. मका लागवडदेखील जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते. ही बाब जाणून कासार यांनी जिल्ह्यातील उपलब्ध कच्चा माल वापरून योग्य प्रमाणात पशुखाद्य बनविण्याचे निश्‍चित केले.

यंत्राव्दारे सुलभ पशुखाद्यनिर्मिती  
पारंपरिक पद्धतीने पशुखाद्य तयार करण्यासाठी महिला जात्याचा तसेच चक्कीचा वापर करतात. यामुळे त्यांना शारीरिक श्रम पडतात. तसेच चक्कीमध्ये धान्य भरडल्यामुळे त्याचे पिठात रूपांतर होते. असे पीठ पशूंच्या आरोग्यास लाभदायक नसते. यावर उपाय करण्यासाठी पशुखाद्य यंत्रसामग्रीचा वापर करण्याचे केव्हीकेने ठरवले. या सामग्रीत धान्य भरडा यंत्र, मिक्सर, गोळीपेंड यंत्र (पॅलेटींग मशीन) यांचा समावेश होतो. या यांत्रिकीकरणासाठी ‘थ्री फेज’ विद्युतपुरवठा गरजेचा आहे. गोळीपेंड यंत्रासाठी पाच एचपी क्षमतेच्या मोटरची गरज असते. या यंत्राच्या सहाय्याने कोंबडी, शेळी, गाई, म्हशी यांच्यासाठी वेगवेगळ्या आकाराच्या गोळीपेंड बनविता येतात. 

पशुखाद्यनिर्मिती सुविधा 
या यंत्राव्दारे दररोज एक टन गोळीपेंडनिर्मिती करणे शक्य होते. त्यासाठी सुमारे १० बाय १० फूट जागेची गरज भासते. तर मालाच्या साठवणुकीसाठी १० बाय ५० फूट जागा असावी लागते. गोळीपेंडचे पॅकिंग ४० किलो क्षमतेच्या बॅगमध्ये करण्यात येते. अशा प्रकारच्या गोळीपेंड पशुखाद्याचे विशेष फायदे आहेत. याद्वारे पशुखाद्याचे सर्व घटक योग्य प्रमाणात मिसळले जातात. त्यामुळे जनावरांना ते खाऊ घालणे सोयीचे होते. 

तंत्रज्ञान प्रत्यक्षात साकारण्यास चालना   
कासार यांनी जिल्ह्यातील अनेक प्रयोगशील दुग्ध व्यावसायिकांची भेट घेतली. त्यांच्याकडील तंत्रज्ञान तसेच आपल्या दुधाळ जनावरांना देत असलेल्या खाद्यांविषयी माहिती घेतली. अनेक शेतकऱ्यांना सकस खाद्य उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे त्यातून लक्षात आले. तशी संकल्पनाही त्यांना मांडली. त्यास दुग्ध व्यावसायिकांनी चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर कासार यांनी केव्हीकेच्या मदतीने यांत्रिक पध्दतीने पशुखाद्य बनविण्याची सर्व प्रक्रिया समजून घेतली. त्या दृष्टीने त्यांची पुढील वाटचालही सुरू झाली. 

व्यवसाय उभारणी
पशुखाद्य प्रक्रिया यंत्रासाठी आवश्‍यक दीड लाख रुपये भांडवल उभे केले. भरडा तसेच पॅलेटिंग यंत्र पुणे येथून खरेदी करण्यात आले. यंत्र ठेवण्यासाठी नवापूर तालुक्यातील वडसत्रा येथे शेड निर्मिती करण्यात आली. संबंधित कंपनी प्रतिनिधी येऊन त्याद्वारे यंत्र चालविण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष पशुखाद्य बनविण्यास सुरवात झाली.

पशुखाद्य बनविण्यासाठी घटक
सकस पशुखाद्य बनविण्यासाठी ऊर्जा, प्रथिने, खनिज मिश्रण, क्षार आदी घटकांची गरज असते. यासाठी जिल्ह्यातील कच्चा माल उपलब्ध होण्याविषयीचा अभ्यास कासार यांनी केव्हीकेच्या मदतीने केला. मका, राईस ब्रान, सोयामिल, गव्हाचा भुसा, डाळचुणी, शेंगदाणा व सरकी पेंड, खनिज मिश्रण हे घटक खाद्यनिर्मितीसाठी निश्चित करण्यात आले. यामधील महत्त्वाचा म्हणजे क्षेत्रनिहाय खनिज मिश्रण हा घटक केव्हीकेमार्फत पुरविण्यात येतो. 

रोजगारनिर्मिती 
कासार यांनी व्यवसायाच्या माध्यमातून आठ युवकांना रोजगारनिर्मिती करून दिली आहे. सुशिक्षित बेरोजगार युवकांना आपल्याच गावात रोजगार मिळण्याची ही संधी मिळाली. त्याचबरोबर परिसरातील कच्चा माल योग्य दरांमध्ये शेतकऱ्यांकडून विकत घेतल्यामुळे शेतकऱ्यांनाही परिसरातच हुकमी बाजारपेठ उपलब्ध झाली. 

विक्री व्यवस्था
कासार यांच्या लघु कारखान्यात दररोज दोन टन पशुखाद्यनिर्मिती केली जाते. विक्री हा या प्रकल्पातील महत्त्वाचा घटक होता. त्यासाठी कासार यांनी केव्हीकेमध्ये सलग दोन महिने सतत भेट दिल्या. विक्री व्यवस्थापन विषय समजून घेतला. केवळ विक्री केंद्र असे स्वरूप न ठेवता कासार पशुपालकांच्या गोठ्यांना स्वत: भेटी देऊ लागले. त्यांना सकस पशुखाद्याचे महत्त्व पटवून देऊ लागले. एवढेच नव्हे तर ग्राहक सेवा हा मुद्दा महत्त्वाचा मानून पशुखाद्य त्यांच्या गोठ्यावर पोच करून देऊ लागले. खाद्याची गुणवत्ताही त्यांनी नेहमीच चांगली ठेवली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करण्यातही ते कुठे कमी पडत नाहीत. या अथक प्रयत्नांतूनच सुमारे ३८ दूध व्यावसायिक त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत.

अपारंपरिक पशुखाद्यनिर्मिती 
पशुखाद्याचा खर्च कमी करण्यासाठी कासार यांनी विविध प्रथिनयुक्त झाडपाले, अझोला, मका, डाळ, चुणी, पेंड योग्य प्रमाणात वापरून अपारंपरिक पशुखाद्यनिर्मिती सुरु केली आहे. ज्या पशुपालकांकडे भाकड गाई, बैल आहेत ते हेच खाद्य वापरण्यावर भर देतात. 

जनावरांचे आरोग्य सुधारले 
गोळीपेंडीच्या स्वरूपात दिलेल्या पशुखाद्यामुळे आमच्याकडील दुधाळ जनावरांचे दूध उत्पादन वाढले. शिवाय त्यांचे आरोग्यही सुधारले आहे. या खाद्याचे महत्व चांगल्याप्रकारे पटले असून त्याचा नियमित वापर मी करीत आहे.

भैय्या वना धनगर, भोणे, ता. जि. नंदुरबार,९६३७०१७१२२
डॉ. महेश गणापुरे, ८२७५१७२८७०
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, नंदूरबार येथे विषय विशेषज्ज्ञ आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com