शेतीतील दीपस्तंभ 'ऍग्रोवन'ची तपपूर्ती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 एप्रिल 2017

उपक्रमशील ऍग्रोवन 
गेल्या बारा वर्षांपासून राज्यभर सुरू असलेल्या 'ऍग्रो संवाद' उपक्रमामुळे आज शेकडो गावे कृषी साक्षर बनली आहेत. ऍग्रोवन सरपंच महापरिषदेमुळे सहा हजार सरपंचांना प्रशिक्षित करण्याची कामगिरी ऍग्रोवनने पार पाडली. राज्यस्तरीय व राष्ट्रीय पातळीवरील ऍग्रोवनची कृषी प्रदर्शने, विदेशातील आधुनिक शेतीचा मंत्र देण्यासाठी ऍग्रोवनच्या शेतकरी सहली असोत, की शेतीमधील खऱ्या आदर्शांना समाजासमोर आणणारा ऍग्रोवन स्मार्ट शेतकरी पुरस्कार असो, यातून राज्यातील शेतकऱ्यांना सतत उभारी मिळाली आहे.

राज्यभर आज विविध कार्यक्रम, तीन विशेषांक 

पुणे - महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रगतीच्या अनेक वाटा दाखवीत सुखदुःखाच्या वळणावर भक्कमपणे साथ देत हजारो शेतकऱ्यांना समृद्धीच्या शिवारात पोचविणारा 'सकाळ- ऍग्रोवन' आज (ता. २०) बारा वर्षांचा झाला आहे. शेती क्षेत्रातील दीपस्तंभ असलेल्या 'ऍग्रोवन'च्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांसाठी राज्यभरातील विविध ठिकाणी १२ कार्यक्रम होत असून, तीन स्वतंत्र विशेषांकांचा नजराणादेखील सादर केला जात आहे. 

पत्रकारिता व शेती यातील अनोखा मिलाफ ठरलेला 'सकाळ-ऍग्रोवन' एक तपाची नेत्रदीपक वाटचाल पूर्ण करून तेराव्या वर्षात पदार्पण करतोय. विशेष म्हणजे दररोज १६ पानांची शेतीसंबंधी माहिती प्रसिद्ध करणाऱ्या 'ऍग्रोवन'ने एक वर्तमानपत्र म्हणून गेल्या बारा वर्षांत ७० हजारांपेक्षा जादा पानांची निर्मिती केली. अर्थात, ही पाने म्हणजे शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचा इतिहास ठरला आहे. कृषिविषयक सखोल माहिती आणि शेतीमधील व्यथांची बारकाईने मांडणी केल्यामुळे ऍग्रोवन अल्पावधीत तळागाळातील शेतकऱ्यांचा आवाज बनला. शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी वारंवार घेतलेल्या संघर्षाच्या भूमिकेमुळे ग्रामसभेपासून ते विधिमंडळापर्यंतच्या चर्चेत ऍग्रोवनला स्थान मिळत गेले. ऍग्रोवनमुळे अनेक वेळा राज्याची विधानसभा, विधान परिषद दणाणली. त्यातून शेतकरीभिमुख निर्णय सरकारला घ्यावे लागले. 

भारतातील एकमेव कृषी दैनिक म्हणून २०१३ मध्ये लिम्का बुकमध्ये ऍग्रोवनची नोंद झाली. मात्र तळागाळात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या वैयक्तिक जीवनाचा ऍग्रोवन हा एक भाग बनल्याचे दिसून आले आहे. जालना जिल्ह्यातील शेतकरी बाळासाहेब बिडवे यांनी आयुष्यभर कष्ट करीत उभारलेल्या नव्या बंगल्याला 'ऍग्रोवन' असे नाव दिले. एकप्रकारे ऍग्रोवन परिवाराला मिळालेले हे सर्वांत मोठे पारितोषिक होते. त्यानंतर यवतमाळ भागातील एका प्रयोगशील शेतकऱ्यानेदेखील ऍग्रोवन मळा असे नाव दिले. वाशीम भागातील मंगळूरपीरच्या एका सायकल दुकानदाराने स्वतः पुढाकार घेत 'ऍग्रोवन कट्टा' नावाने अनोखा उपक्रम सुरू केला. 

कृतिशील वाचक चळवळ 
विस्तार कार्यात ऍग्रोवन अतिशय मोठी भूमिका पार पाडत असल्याचे कृषी खात्याला दिसून आले. त्यामुळे 'आत्मा'मधील शेतीमित्र, शेतीशाळांमधील शेतकरी सभासद यांच्यापर्यंत ऍग्रोवन पोचविण्याची जबाबदारी कृषी खात्याने घेतली. आधुनिक शेतीचे प्रसिद्ध होणारे तंत्र शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी किसन वीर सहकारी साखर कारखान्याने आपल्या सभासदांना ऍग्रोवन पुरविण्याचा निर्णय घेतला. तर सातारा मध्यवर्ती बॅंकेने हरितगृहाच्या कर्जधारक शेतकऱ्याला ऍग्रोवनचे वाचक करण्यात पुढाकार घेतला. त्यामुळे ऍग्रोवन ही राज्याची एक कृतिशील वाचक चळवळ बनते आहे. 

 

Web Title: agrowon decade sakal