मजूर समस्येवर अशी करा मात!

मजूर समस्येवर अशी करा मात!

आपुलाची धाक आपणाशी...
मिलिंद ऊर्फ आबाजी पाटील 

सुरवातीला आठवडा बाजाराच्या आदल्या दिवशी पगार न्यायला बायका यायच्या तेव्हा बुजून दारातच थांबायच्या. आपले घामाचे पैसे न्यायला येतानासुद्धा चेहऱ्यावर आश्रिताचा भाव असायचा. एखाद्या जोखडातून जेव्हा एखादी परंपरा मानगुटीवर बसते तेव्हा काय घडते याचं ते प्रातिनिधिक उदाहरण वाटायचं मला. मी त्यांना आपलेपणाची दादागिरी करत म्हणायचो, ``आधी घरात आत यायचं, बसायचं, चहा प्यायचा आणि मगच पगार घेऊन जायचं.`` त्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावरचं सुखद आश्चर्य एक वेगळंच समाधान देऊन जायचं. काम केलेल्यानेच पगार न्यायला यायचं हा पण आमचा एक कडक नियम. कारण इकडं व्हायचं काय की घरातल्या कुणीही म्हणजे सासूने, मुलाने, नवऱ्याने परस्परच यायचं आणि पगार अथवा उचल मागायची. लाख खोटंनाटं बोलून नवऱ्याने पगार न्यायचा आणि दारूत नाही तर जुगारात घालवायचा. बायकांना मारहाण करायची. बरं पैसे उचलल्याची किंचितही कल्पना त्या बाईला नसायची. तिने नाइलाजाने तो पैसा उन्हात राबून फेडायचा, आणि भरीस भर काय तर अशा नवऱ्यांना काही लोक मुद्दामच पैसे द्यायचे. म्हणजे याची बायको हा कामाला पाठवतोच. असे प्रकार इथे सर्रास आहेत. मी असे पैसे कधीच दिले नाहीत. उलट मी या असल्या नवरोबांना दारातून हाकलून लावलंय. याबद्दल माझी त्यांची जोरदार भांडणेही झाली आहेत. माझी बायको आता तुमच्यात कामाला कशी येते तेच बघतो, असं म्हणत ते गुरगुरत राडा करू पाहायचे. मी म्हणायचो, की नको पाठवूस जा आणि तुला काय करायचं ते कर; पण माझा नियम मी मोडणार नाही. आणि यावर कडी केली ती त्या बायकांनीच. काय धीर एकवटला देव जाणे पण आपल्या नवऱ्यांना खोपड्यात बसवून त्यांनी पण आपला सन्मान राखायला सुरवात केली!  

तुमच्या शेतात तुमचे घरचेच यायला धजेनात, मग कोण मजूर आता रिकामा बसलाय? ... असली म्हणजे दिवाळी नी नसल्यावर शिमगा, अशी आमची कर्मदरिद्री नीती. मग सरकार कधी डोळा उघडतंय याची वाट बघत बसायचं. 

मग कुणी विचारलं "काय किसनमामा कसं काय चाललंय ?" मग दाढी खाजवत मामाने म्हणायचं. " काय सांगू बाबा, यंदा काय न्हाई गा. सरकारनं बी ...!" मग बसायचं दात टोकरून पोट भरत. आज कामाची ही घात आहे. पण कामाला माणसं नाहीत. मग कुणाला तरी गणित घालायचं, "ये बाबा ये की आजच्या दिवस, तुला संध्याकाळी एक क्वार्टर देतो."  मग त्या बेवड्याला बायकापोरं असून `क्वार्टर`पुढं कोण आठवत नाही. तो संध्याकाळची क्वार्टर डोळ्यापुढे धरूनच दे दणादण काम करतो. असे सगळे नालायक उपद्व्याप आपले. म्हणजे आपणही वळणावर राहायचं नाही आणि दुसऱ्यालापण स्वार्थापायी डबऱ्यात घालण्याचे धंदे. 

आपलीच पत आपण राखेनासे झालोय म्हटल्यावर कोण आपल्या मदतीला येणार? ह्याला स्वतःला जगवायला जमत नाही, तर हा कसला अन्नदाता? मग तो पण जातोय तुम्हाला सोडून सिमेंट कालवायला, लोखंड वितळवायला, नाही तर लोकांनी जेवलेली ताटं धुवायला. आणि का जाऊ नये त्याने? त्याला तिथे पैसा जास्त मिळतो. त्या मुळे तो शहरातलं त्याला सुखाचं जे वाटतं ते गावाकडे आणू शकतो...

------------------------------------------------

सालगडी
महारुद्र मंगनाळे

सालगडी, सालकरी, बैलकरी, गडी यापैकी कोणतंही नाव वापरलं तरी, त्याचा अर्थ एकच होतो, तो म्हणजे शेतकऱ्याकडची वर्षभराची नोकरी. साधारण `पाडवा ते पाडवा` हा नोकरीचा काळ. साधारण ४५-५० वर्षांपूर्वी पगारासोबत पोते, दोन पोते धान्यही ठरायचे. तो काळ अन्नधान्याच्या टंचाईचा होता. चांगलं खायला मिळणं ही चैन होती. गहू, तांदळाचा वापर सणावारांनाच व्हायचा. त्याचं मोठं कौतुक वाटायचं. प्रत्येक सालगड्याचं दुपारचं जेवण शेतमालकाकडचं असायचं. वयस्कर, विधुर असलेले शेतगडी तीन वेळचं जेवण धरूनच पगार ठरवायचे. म्हशी, गाई राखणारे गुराखी हे किमान दोन वेळा जेवते असायचे. 

आमच्या सालगड्याच्या आठवणी जिवंत करताना मी थेट वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षात शिरतो. गावाच्या पूर्वेला सर्वांत शेवटी आमचं मोठं घर. भला मोठा लाकडी दरवाजा. त्याला लागूनच उजव्या हाताला कचरा, शेण गोळा करण्यासाठीचा उकांडा. प्रशस्त अंगण. पूर्वेला जनावरांचा गोठा. जमिनीपासून तीन-चार फूट उंचीवर स्वयंपाकघर. त्याच्या बाजूला लादणी. त्यावर ओसरी, बैठक, दोन छोट्या खोल्या. ओसरीवर छोटीशी माडी. तिला भली मोठी खिडकी. ओसरीवरच शेणानं लिपलेल्या धान्याच्या तीन-चार मणाच्या कणगी. या कणगीत उतरून धान्य काढल्याच्या आठवणी ताज्या आहेत. वडील संतुकराव मंगनाळे ५२ एकर कोरडवाहू शेतीचे मालक. चार-सहा बैल, दुधाच्या म्हशी, गाई, वासरं असा मोठा बारदाना होता.

बाशूमामा गुराखी म्हणूनच आमच्या शेतात आले. पुढे ते सालगडी बनले. इथं कामाला असतानाच त्यांचं लग्न झालं. सलग १८ वर्षे त्यांनी आमच्याकडं नोकरी केली. त्यांच्या विषयीच्या बालपणाच्या अनेक सुखद आठवणी आहेत. ते सालगडी आहेत, हे आम्हाला कधीच वाटलं नाही. २००४ मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर बाशूमामांनी घरी येऊन फोडलेला हंबरडा माझ्या आजही स्मरणात आहे. त्यांची वेदना आमच्यापेक्षाही तीव्र होती.

सालगडी पहाटे चार-साडेचारलाच बैल चरायला सोडत. आपले बैल इतरांपेक्षा धष्टपुष्ट बनले पाहिजेत, अशी त्यांची जिद्द असायची. बैल तयार झाले नाहीत तर तो गड्याचा कमीपणा मानला जायचा. त्यांचा आपल्या बैलांवर जीव असायचा. आपण नोकर आहोत, ही भावना त्यांच्यात नसायची. राशीच्या काळात रात्री शेतात जागलीला यावं लागायचं. हे सगळं गृहीत होतं. नोकरी धरली, की ती पूर्ण केली पाहिजे, ही भावना होती. काम करणं ही संस्कृती होती. 

साधारण २००० साल सुरू होण्याच्या आधी दोन-तीन  वर्षे ही परिस्थिती बदलू लागली. लोकांना शेतीतील कामं नकोशी वाटू  लागली. शिरूरसारख्या चौरस्त्यावरील मोठ्या गावात सालगडी मिळणं मुश्कील झालं....
(सविस्तर वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com