गोड धाटाची ज्वारी मोठी गुणकारी 

बॉन निंबकर 
मंगळवार, 18 एप्रिल 2017

गोड धाटाची ज्वारी प्रथमच भारतात आणून आम्ही या पिकावर मूलभूत संशोधन केले. रसात साखरेचे चांगले प्रमाण, उत्तम प्रतीचे धान्य आणि धाटाचे चांगले उत्पन्न मिळवण्यात आम्हाला यश आले. पण दुर्दैवाने या पिकाचा म्हणावा तितका प्रसार झाला नाही. 

गोड धाटाची ज्वारी प्रथमच भारतात आणून आम्ही या पिकावर मूलभूत संशोधन केले. रसात साखरेचे चांगले प्रमाण, उत्तम प्रतीचे धान्य आणि धाटाचे चांगले उत्पन्न मिळवण्यात आम्हाला यश आले. पण दुर्दैवाने या पिकाचा म्हणावा तितका प्रसार झाला नाही. 

अमेरिकेच्या दक्षिणेकडे असलेल्या जॉर्जिया राज्यात हिंडत असताना मी रस्त्याच्या कडेला पाहिले की काही लोक ज्वारीची धाटे चरकामध्ये घालून रस काढत होते. माझ्या नेहमीच्या पद्धतीने काय चालले आहे हे पाहायला मी थांबलो. एखाद्या गुऱ्हाळासारखा प्रकार तेथे चालू होता. परंतु, उसाच्या ऐवजी गोड धाटाची ज्वारी होती. अमेरिकेत नाश्त्याला एक पदार्थ बनवतात. पॅनकेक. मका किंवा गव्हाच्या पिठाचा हा एक डोश्यासारखा पदार्थ असतो. त्याच्याबरोबर हमखास सिरप म्हणजे काकवी खाल्ली जाते. ती काकवी बनवण्याचे काम तिथे चालू होते. 

माझ्या मनात आले की हे भारतात केले तर चांगले होईल. तिथल्या ज्वारीचे दाणे लालसर रंगाचे होते. पाखरांना पांढरे दाणे आवडतात म्हणून मुद्दाम या रंगाची जात काढली आहे असे कळले. त्यांच्या प्रयोग केंद्रावर जाऊन मी बियांची चौकशी केली. ५० व ६० च्या दशकांत अमेरिकेतून खूपसे धान्य भारतात येत असे. त्यासाठी अमेरिका पैसे घेत नसे. त्याऐवजी ‘पल्बिक लोन ४८०’ या खात्यावर भारत सरकार धान्याची किंमत रुपयात भरत असे. ते पैसे अमेरिका भारतातील विकास कामासाठीच वापरायला देत असे. फुकट देणार नाही पण घेतलेले पैसे पुन्हा तुमच्याच देशासाठी वापरा अशा प्रकारची ती एक उत्तम योजना होती. 

पब्लिक लोन ४८० च्या कृषी संशोधन योजनेखाली मी गोड धाटाच्या ज्वारीवर काम करण्याचा प्रस्ताव अमेरिकन सरकारच्या कृषी खात्याला सादर केला. दोनेक वर्षे काही उत्तर आले नाही. मी वॉशिंग्टन डी. सी. शहरात काही कामानिमित्त गेलो होतो. तिथे मी कॉंग्रेसमन म्हणून म्हणजेच अमेरिकेच्या संसदेच्या सभागृहात निवडून आलेल्या एडवर्ड बीस्टर या माझ्या वर्गमित्राला भेटायला गेलो. त्याच्याशी बोलताना मी माझ्या प्रस्तावाचा उल्लेख केला. त्याने लगेच कृषी खात्याला दूरध्वनी करून चौकशी केली. १५-२० मिनिटांत उत्तर मिळाले की प्रस्ताव विचाराधीन आहे. 
१९८१ मध्ये पैसे मिळाले. करडीवरील संशोधनासाठी १९७४ मध्येच प्रस्ताव मंजूर होऊन पैसे मिळाले होते. तर गोड धाटाच्या ज्वारीवरील प्रकल्प १९८१ मध्ये सुरू झाला. मी पाहिले होते की मंगळवेढा भागात खोल जमिनीमध्ये ज्वारीच्या बरोबर करडीचे पीक घेतात. पाऊस कमी पडला तर करडी उत्तम येत असे. आणि जास्त पडला तर ज्वारी चांगली येत असे आणि करडी रोगामुळे मरून जात असे. यावर संशोधन करावे असे मी ठरवले. करडीबद्दल मी कॅलिफोर्नियामध्ये डॉ. नोल्स यांना भेटलो. या दोन पिकांवर नारी संस्थेत संस्थेचे पहिले संचालक डॉ. आनंद कर्वेच्या मार्गदर्शनाखाली काम झाले. नव्या जाती निर्माण करण्यासाठीचे भरपूर जननद्रव्य (जर्मप्लाझम) अमेरिकेकडे होते. त्यांनी ते जगभरातून मिळवले होते. करडी आणि ज्वारीच्या प्रत्येकी सुमारे २००० जाती त्यांच्याकडे होत्या. त्यातील बऱ्याचशा आम्हाला या प्रकल्पामध्ये मोफत मिळाल्या. अमेरिकेतून सल्ला आणि मदत वेळोवेळी मिळत होतीच. आम्ही काम सुरू केल्यानंतर बऱ्याच वर्षांनी इक्रिसॅट व भारत सरकारच्या संस्थांनीही गोड धाटाच्या ज्वारीवर काम सुरू केले. त्यांना हव्या असलेल्या जाती आमच्याकडे तेंव्हा उपलब्ध होत्या. कुणी मागितले तर आम्ही त्यांना बियाणे मोफत देत असू. 
या सर्व जाती लावून पाहायला ४-५ वर्षे लागली. संशोधनातून आम्हाला खालील गोष्टी आढळल्या. 

१. लाल ज्वारी ही धान्य म्हणून माणसांना खायला योग्य नव्हती. त्यात जास्त टॅनीन असल्यामुळे ती गुरांनाच द्यावी लागत असे. त्यामुळे आम्ही मालदांडीचा लाल ज्वारी देणाऱ्या गोड धाटाच्या ज्वारीच्या जातीबरोबर संकर करून गोड धाटाच्या ज्वारीत खाण्यायोग्य दाणे निर्माण केले. 
२. धाटातून रस काढायला किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीने चरक दिला होता. रसाचे विश्लेषण केले असता असे दिसले की, त्यात सुक्रोजचे प्रमाण कमी होते. पण इतर प्रकारची क्षपणकारी (रिड्युसिंग) शर्करा होती. शिवाय ही काकवी उसाच्या काकवीप्रमाणे गोड नसून किंचित आंबट असल्यामुळे चविष्ट लागे. 
३. जनावरे या ज्वारीचा कडबा आवडीने खात. कारण रस काढूनसुद्धा चिपाडात गोडवा रहात असे. तो खायला घातल्यास गाई-म्हशीमध्ये दुधाचे उत्पादन किमान १०-१५ टक्क्याने वाढते असे. 
४. अमेरिकेत गोड ज्वारीपासून केवळ रस हवा असल्याने पीक पूर्ण परिपक्व व्हायच्या आधीच रस काढला जाई. पण आपल्याकडे रस आणि धान्य दोन्ही महत्त्वाचे. त्यामुळे आम्ही पिकाचे गुणधर्म बदलले व धान्य आणि जास्त शर्करा असलेला रस मिळेल अशा जातींची निर्मिती केली. रसातील एकूण शर्करेचे प्रमाण ४-५ टक्क्याने वाढवण्यात आम्हाला यश आले. 
५. ज्वारीच्या रसापासून बनवलेल्या गुळात कमी सुक्रोज असल्याने चिकटपणा येतो. त्यात १५-२० टक्के उसाचा रस मिसळला असता उत्तम कणीदार गूळ तयार होतो असे लक्षात आले. 
६. नारी संस्थेचे सद्य संचालक डॉ. अनिल राजवंशी यांनी या रसापासून मद्यार्क तयार करण्याचा विचार केला. त्या मद्यार्कचा वापर करू शकणाऱ्या कंदील आणि स्टोव्हवर उत्तम संशोधन केले. (त्याबद्दल सविस्तर पुढच्या भागात) 
गोड धाटाची ज्वारी प्रथमच भारतात आणून आम्ही या पिकावर मूलभूत संशोधन केले. रसात साखरेचे चांगले प्रमाण, उत्तम प्रतीचे धान्य आणि धाटाचे चांगले उत्पन्न मिळवण्यात आम्हाला यश आले. पण दुर्दैवाने या पिकाचा म्हणावा तितका प्रसार झाला नाही. या पिकाला चांगले भविष्य आहे. संशोधनासही खूप वाव आहे. ब्राऊन मिडरिब (BMR) या जनुकामुळे चाऱ्यातील लिग्निनचे प्रमाण कमी होऊन प्रथिनांचे प्रमाण वाढते. त्यामुळे चाऱ्याची स्‍वादिष्टता व पचनीयता वाढते असे लक्षात आले आहे. 
माझ्या मते या पिकामध्ये भरपूर ताकद आहे. त्याचे सर्व भाग उपयोगास येतात. कणसापासून धान्य मिळते. रसाचा खाद्य म्हणून व इंधन बनवण्यासाठी वापर होऊ शकतो. जनावरांसाठी चारा म्हणून किंवा खत म्हणून पाने तसेच रस काढून उरलेली चिपाडे वापरता येतात. गाव स्वयंपूर्ण व त्याच्या शाश्वत विकासासाठी हे पीक उत्तम आहे असे मला वाटते. 
२१६६ - २६२१०६ 

(लेखक निंबकर कृषी संशोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत.) 
(शब्दाकंन : मधुरा राजवंशी, नंदिनी निंबकर) 
 

Web Title: agrowon editorial