किफायतशीर शेती, सामूहिक शेती 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 मे 2017

सामूहिक शेतीतून शेतकऱ्यांची ताकद वाढणार असून, कठीणात कठीण समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर विविध प्रयोगांच्या माध्यमातून शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीरही होऊ शकते.

आज भारतीय शेतीवर घोंघावणारे सर्वांत मोठे संकट कोणते असेल तर ते शेतीचे लहान लहान तुकड्यात होणारे विभाजन हे होय. उद्योग आणि विकासकामांसाठी मुळात मर्यादित असलेल्या शेती क्षेत्राचे अधिग्रहण चालू आहे. त्यातच विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतीचे तुकडे पडत आहेत. आज देशातील जवळपास ८० टक्के अल्प-अत्यल्प भूधारकांची शेती आर्थिकदृष्ट्या परवडणारी तर दूरच मात्र त्यातून कुटुंबाचा चरितार्थही व्यवस्थित भागविला जात नाही.

असे असताना अजून लहान लहान तुकड्यात शेतीचे विभाजन सातत्याने चालू आहे. विशेष म्हणजे या भीषण वास्तवाकडे कोणी फारसे गांभीर्याने पाहत नाही. लहान आकाराची शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. शेती क्षेत्र कमी - उत्पादन कमी - आणि त्यामुळे उत्पन्नही कमी, यामुळे असा बहुतांश शेतकरी आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे.

शेतीच्या लहान तुकड्यात पायाभूत सुविधा निर्मितीत अडचणी येतात. अशा शेतीत वैविध्यपूर्ण पीक पद्धती, आधुनिक यंत्र-तंत्राचा अवलंबही शेतकरी करू शकत नाही. वाढती मजूरटंचाईची समस्या सर्वत्रच भेडसावत आहे. आकस्मित येणारे रोग-किडी, वन्यप्राण्यांचा त्रास याबरोबर दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक आपत्तीनींही गावोगावचे शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत.

वैयक्तिक शेतकऱ्याला शेती क्षेत्रात भेडसावणाऱ्या अशा अनेक समस्यांवर मात करण्यासाठी जामदरा जि. वाशीम येथील गावकऱ्यांनी आगामी खरीप हंगामात सामूहिक शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. वर्तमानकाळातील शेतीतील अडचणी दूर करून ती फायदेशीर ठरण्यासाठी हा रामबाण उपायच म्हणावा लागेल. 

शेती क्षेत्रातील समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. वैयक्तिक पातळीवर अशा समस्यांचे समाधन अवघड होत चालले आहे. सामूहिक शेतीतून शेतकऱ्यांची ताकद वाढणार असून, कठीणात कठीण समस्या सुटण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर विविध प्रयोगांच्या माध्यमातून शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीरही होऊ शकते. असे असले तरी नव्यानेच सामूहिक शेतीत उतरताना कामाचे नियोजन आणि पीक व्यवस्थापन याच्या पद्धती ठरवून घ्याव्या लागतील.

सामूहिक शेतीच्या माध्यमातून विविध आर्थिकस्तर तसेच वेगवेगळ्या कामांचे कौशल्य असलेले शेतकरी एकत्र येणार आहेत. त्यामुळे आर्थिक नियोजनाबरोबर एकत्र आलेल्या शेतकऱ्यांमध्ये मशागत ते मार्केट अशा कामांची विभागणीही महत्त्वाची ठरणार आहे. सामूहिक शेतीच्या नियोजनाकरिता गावपातळीवर सल्लागार समितीची स्थापना करण्यात आली ते योग्यच झाले. त्याचबरोबर राज्यात अनेक ठिकाणी गट, सामूहिक शेतीची यशस्वी उदाहरणे आहेत.

ज्या जमिनीतून एकरी एक पैसाही मिळत नव्हता तेथे सामूहिक शेतीतून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू लागले आहे. अशा मॉडेल्सचा अभ्यास करून तेथील यशस्वितेची मूलमंत्रे आपल्या गावातही सोयीनुसार जपली जातील याची काळजी घ्यायला हवी. सामूहिक शेतीतून खर्च कमी होतो, उत्पादन वाढते. उत्पन्नाचे विविध स्रोत पुढे येतात. यातून तरुणांना नव्या रोजगाराच्या संधी लाभू शकतात.

कौटुंबिक आणि गावपातळीवरील कलह कमी होण्यासही हातभार लागू शकतो. एवढेच नव्हे तर एकोप्याने दु:खही वाटून घेतले गेल्याने शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या थांबविण्याची ताकद सामूहिक शेतीत आहे. आज अनेक गावे सामूहिक शेतीच्या वाटेने जाऊ पाहत असताना त्यांना योग्य दिशा मिळत नाही. अशा गावांना जामदरा गाव मार्गदर्शक ठरेल, अशी सामूहिक शेती विकसित करण्यावर गावकऱ्यांचा भर हवा.

Web Title: Agrowon editorial on Group Farming in Maharashtra