राज्यात गाजर ११०० ते ८००० रुपये प्रतिक्विंटल

carrot
carrot

सोलापुरात गाजराला सर्वाधिक १५०० रुपये 
सोलापूर - सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात गाजराची आवक कमी झाली. पण मागणी असल्याने त्याचे दरही काहिसे स्थिर राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. गाजराला प्रतिक्विंटलला सर्वाधिक १५०० रुपयांपर्यंत दर मिळाला. बाजार समितीत गाजराची आवक रोज राहिली नाही. एक-दोन दिवसाआड अशी त्याची आवक होती. गाजराची आवक स्थानिक भागातूनच झाली. गाजराला प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १५०० रुपये असा दर मिळाला. या आधीच्या सप्ताहातही गाजराची आवक २० ते ५० क्विंटल आणि दर किमान २०० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १४०० रुपये असा दर मिळाला. त्या आधीच्या आठवड्यात हाच दर सर्वाधिक १८०० रुपयांपर्यंत होता. तर सरासरी १५०० रुपये आणि किमान ३०० रुपये असा दर मिळाला. सध्या गाजराला चांगली मागणी आहे. पण मागणीच्या प्रमाणात आवक नसल्याने दर काहीसे स्थिर आहेत, असे सांगण्यात आले. 

परभणीत प्रतिक्विंटला  ७००० ते ८००० रुपये
परभणी - जुना मोंढा भागातील फळे -भाजीपाला मार्केटमध्ये गुरुवारी (ता. १७) गाजराचे दर प्रतिक्विंटल ७००० ते ८००० रुपये होते. पाथरी रस्त्यावरील फळे-भाजीपाला मार्केटमध्ये सध्या स्थानिक परिसरातून आवक सुरू झालेली नाही. याशिवाय इतर ठिकाणहून गाजराची आवक सुरू झालेली नाही. शहरातील जुना मोंढा भागातील तसेच क्रांती चौकातील भाजी मार्केटमध्ये तेलंगणातील हैदराबाद येथील मार्केटमधून आठवड्याला २ ते ३ क्विंटल गाजराची आवक येत आहे. या हैदराबाद मार्केटमधील व्यापाऱ्यांकडून दर आठवड्याला परभणी येथील व्यापारी गाजराची मागणी करतात. २००० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी केली जाते. ग्राहकांकडून फारशी मागणी नसते, परंतु चायनीज खाद्यपदार्थाच्या हॅाटेल चालकाकडून तेलगंणातील गाजरांना मागणी आहे. गुरुवारी (ता. १७) प्रतिकिलो ७० ते ८० रुपये दराने किरकोळ विक्री सुरू होती, असे व्यापारी मोहमद नविद यांनी सांगितले.

सांगलीत दहा किलोस ४०० ते ५०० रुपये
सांगली - येथील शिवाजी मंडईत गाजराची आवक कमी अधिक आहे. गुरुवारी (ता. १७) गाजराची १० ते १५ पोत्यांची (एक पोते ६० ते ७० किलोचे) आवक झाली आहे. त्यास प्रतिदहा किलोस ४०० ते ५०० रुपये असा दर मिळाला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. मंडईत बेळगाव येथून गाजराची आवक    होते. 

बुधवारी (ता. १६) गाजराची ८ ते १० पोत्यांची आवक झाली. गाजरास प्रतिदहा किलोस ३५० ते ४०० रुपये असा होता. मंगळवारी (ता. १५) गाजराची १० ते ११ पोत्यांची आवक झाली आहे. त्यास प्रतिदहा किलोस ३५० ते ४०० रुपये असा दर मिळाला. सोमवारी (ता. १४) गाजराची १० ते १५ पोत्यांची आवक झाली. त्यास प्रतिदहा किलोस ४०० ते ५०० रुपये असा दर मिळाला. जिल्ह्यातील कवलापूर येथे आगाप लागवड केलेल्या गाजराची आवक पुढील आठवड्यात सुरू होईल, असे व्यापारी वर्गाने सांगितले.

पुण्यात प्रतिक्विंटल २००० ते ३००० रुपये
पुणे - गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. १७) गाजराची सुमारे १ हजार गोणी आवक झाली होती. या वेळी दहा किलोला २०० ते ३०० रुपये दर होता. गाजराची आवक ही प्रामुख्याने पुणे विभागातील विविध जिल्ह्यांमधून होत आहे. तर यामध्ये पुरंदर तालुक्याचा समावेश आहे. सध्याची आवकही सरासरीच्या तुलनेने कमी असल्याने दर १० ते २० टक्क्यांनी जास्त असल्याचे ज्येष्ठ अडतदार आणि अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले. 

कोल्हापुरात दहा किलोस ४०० ते ५०० रुपये
कोल्हापूर - बाजार समितीत गाजरास दहा किलोस ४०० ते ५०० रुपये दर मिळत आहे. गाजराची दररोज २५ ते ३० पोती आवक होत आहे.  येथील बाजार समितीत सांगली भागातून बहुतांशी करून गाजराची आवक होते. गेल्या महिन्यापासून गाजराच्या आवकेत काही प्रमाणात घट झाली असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. मध्यंतरी आलेल्या पुरामुळे आणि ठिकाणी गाजराचे नुकसान झाले. यामुळे साधारण दहा ते वीस टक्के प्रमाणात आवक घटली होती. आता हळूहळू आवक वाढत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

नगरला गाजराला दोन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर 
नगर - नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत दर दिवसाला गाजराची साधारण दहा ते वीस क्विंटलची आवक होत असते. गुरुवारी (ता. १७) १० क्विंटलची आवक होऊन गाजराला दोन हजार रुपयांचा प्रती क्विंटल दर मिळाला. 

नगर बाजार समितीत नगरसह मराठवाड्यातून गाजराची आवक होत असते. १० आक्टोबर रोजी १८ क्विंटलची आवक होऊन दीड हजार ते दोन हजार रुपये व सरासरी दीड हजार रुपयाचा दर मिळाला. ३ आक्टोबर रोजी २० क्विंटलची आवक होऊन १२०० रुपयांचा सरासरी दर मिळाला. ३० सप्टेंबर रोजी १० क्विंटलची आवक होऊन १२०० ते १६०० रुपये प्रती क्विंटल दर मिळाला. बाजार समितीत गाजराची आवक मागील महिन्याच्या तुलमेत कमी झाली असून दरात काहीशी वाढ झाली आहे.

औरंगाबादेत प्रतिकिलोस २२ ते २५ रुपये दर 
औरंगाबाद - शहरात तूर्त हायब्रीड गाजरांची आवक आठवड्यातून एक दोन वेळच होते. नाशिक, मध्यप्रदेशातून ही आवक होत आहे. त्यास प्रतिकिलो २२ ते २५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद बाजार समितीमध्ये नोव्हेबर ते डिसेंबर दरम्यान गाजरांची आवक सुरू होते. त्यानंतर जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान ही आवक मोठ्या प्रमाणात होत असते. तूर्त नाशिक भागातून तुरळक, तर मध्यप्रदेशातून आठवड्यातील एक ते दोन वेळाच हायब्रीड गाजरांची आवक होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. 

आठवड्यातून कमी अधिक प्रमाणात एक टनापर्यंत गाजरांची आवक तूर्त होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसाचा परिणाम शहरात येणाऱ्या या गाजरच्या आवकेवर दिसत आहे. त्यामुळे आजघडीला साधारणत: २२ ते २५ रुपये प्रतिकिलोने गाजर विकले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये या गाजरांचीही आवक वाढण्याची शक्‍यताही त्यांनी वर्तविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com