खते महागणार नाहीत म्हणताय, हा घ्या पुरावा...

राजकुमार चौगुले 
सोमवार, 26 जून 2017

कोल्हापूर - नव्या ‘जीएसटी’ कायद्यात खते महागणार नसल्याचे कृषिमंत्री सांगत असले, तरी खतपुरवठा करणाऱ्या अनेक कंपन्यांनी शेतकऱ्यांसाठी वाढीव दराचे परिपत्रक जारी केले आहे. शेतकऱ्यांसाठी जारी केलेल्या या पत्रकात जुने दर आणि नव्या दरांची यादी दिली आहे. यामध्ये केंद्र शासनाने बारा टक्के ‘जीएसटी’ केल्याने खतांच्या किमती वाढवाव्या लागत असल्याचे म्हटले आहे. 

कोल्हापूर - नव्या ‘जीएसटी’ कायद्यात खते महागणार नसल्याचे कृषिमंत्री सांगत असले, तरी खतपुरवठा करणाऱ्या अनेक कंपन्यांनी शेतकऱ्यांसाठी वाढीव दराचे परिपत्रक जारी केले आहे. शेतकऱ्यांसाठी जारी केलेल्या या पत्रकात जुने दर आणि नव्या दरांची यादी दिली आहे. यामध्ये केंद्र शासनाने बारा टक्के ‘जीएसटी’ केल्याने खतांच्या किमती वाढवाव्या लागत असल्याचे म्हटले आहे. 

अनेक नामवंत कंपन्यांनीही अशा प्रकारची परिपत्रके विक्रेत्यांना पाठविली आहेत. यात नव्या आकारणीनुसार खतांच्या किमती दिल्या आहेत. यामुळे खताच्या प्रत्येक पोत्यामागे साठ ते सत्तर रुपयांची वाढ ही निश्‍चितच होणार आहे. कंपन्यांनी नवी पत्रके पाठविल्याने विक्रेतेही त्याच दरात खतांची विक्री करणार असल्याने शेतकऱ्यांना वाढीव दरानेच खते खरेदी करावी लागणार असल्याचे स्पष्ट आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून कृषी निविष्ठा महागणार, याबाबत तपशीलवार वृत्त ‘अॅग्रोवन’मधून प्रसिद्ध होत आहे. परंतु या वृत्ताचे खंडन करीत शासनाने कोणत्याच निविष्ठा महाग होणार नसल्याचे सांगत बोळवण केल्याने शेतकऱ्यांतून तसेच विक्रेत्यांकडूनही संतप्त भावना व्यक्त होत आहेत. एक तर या कायद्याचे निकष स्पष्टपणे संबंधितांपर्यंत गेले नाहीत. याबाबत निर्माण होणाऱ्या प्रश्‍नावर सरकारचेही समाधानकारक उत्तर नाही. यातच निविष्ठा महागणार नाहीत, असे उत्तर दिल्याने शेतकऱ्यांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. 

रासायनिक खतांच्या किमती वाढणार
एका कंपनीने युरिया, डी.ए.पी., पोटॅश या खतांच्या वाढीव किमतींचे पत्रक जारी केले आहे. प्रत्येक खताच्या किमतीत पन्नास ते साठ रुपयांची वाढ ही ठरलेलीच आहे. ‘जीएसटी’ कमी करण्याबाबत कोणत्याच सूचना नसल्याने वाढीव दराने विक्री अपरिहार्य असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. येत्या काही दिवसांत प्रमुख कंपन्या दरवाढीची पत्रके प्रसिद्ध करतील, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला. 

विक्रेत्यांमध्ये संभ्रमावस्था कायमच

खत विक्रीच्या नोंदीबाबत विक्रेत्यांमध्ये संभ्रमच असल्याचे चित्र सध्या आहे. गेल्या चार दिवसांपासून असणारा स्टॉक, येणारा स्टॉक, शेतकऱ्यांना विक्री करायची किंमत, ठेवायच्या नोंदी, याबाबतच कंपन्यांचे प्रतिनिधी, विक्रेते, विक्रेत्यांच्या संघटना यांत चर्चा होत आहेत; पण नेमकेपणा नसल्याने सगळेच अधांतरी आहेत.

Web Title: agrowon news