रुंद वरंबा सरी पद्धतीमध्ये आंतरमशागत

डॉ. आनंद गोरे
मंगळवार, 4 जुलै 2017

रुंद वरंबा सरी पद्धत ही जलसंधारण, तसेच अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. विशेषतः भारी तसेच मध्यम ते भारी जमिनीमध्ये रुंद वरंबा सरी पद्धत अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळी वरंब्यावर येतील यानुसार नियोजन करून वरंब्याच्या दोन्ही बाजूंना सऱ्या काढण्यात येतात. यासाठी रुंद वरंबा सरी यंत्र (बीबीएफ) उपयुक्त आहे. 

रुंद वरंबा सरी पद्धत ही जलसंधारण, तसेच अतिरिक्त पाण्याच्या निचऱ्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. विशेषतः भारी तसेच मध्यम ते भारी जमिनीमध्ये रुंद वरंबा सरी पद्धत अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये जास्त अंतरावरील पिकाच्या दोन ओळी, तर कमी अंतरावरील पिकाच्या ३ ते ४ ओळी वरंब्यावर येतील यानुसार नियोजन करून वरंब्याच्या दोन्ही बाजूंना सऱ्या काढण्यात येतात. यासाठी रुंद वरंबा सरी यंत्र (बीबीएफ) उपयुक्त आहे. 

या यंत्राद्वारे रुंद वरंबे व सऱ्या पाडणे, पेरणी आणि खते देणे अशी तिन्ही कामे एकाच वेळी केली जातात. यामध्ये दोन फाळ आणि पेरणीचे फण यातील अंतर गरजेनुसार कमी जास्त करता येते. तसेच सऱ्यांची रुंदीही कमी जास्त करता येते. उदा. वरंब्यावर सोयाबीन पिकाच्या ३ ते ४ ओळी ३० सें.मी. किंवा ४५ सें.मी. अंतरावर ३ ओळी घेता येतात. फाळामध्ये तयार होणाऱ्या सऱ्यांची रुंदी ३० ते ४५ सें.मी. गरजेनुसार ठेवता येते. कोरडवाहू शेतीमध्ये जलसंधारणाच्या दृष्टीने बीबीएफ पद्धत अतिशय उपयुक्त आहे. तसेच अधिक व सततच्या पावसामध्ये अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टीने बीबीएफ पद्धत उपयोगी आहे. या पद्धतीमुळे सर्वसाधारणपणे २० ते २७ टक्क्यांपर्यंत जलसंधारण तर २५ टक्के उत्पादनात वाढ दिसून आली आहे.

आंतरमशागतीचे नियोजन
ट्रॅक्‍टरचलित बीबीएफ यंत्राचा वापर आंतरमशागत व तण नियंत्रणाच्या दृष्टीने करता येतो. यामध्ये पेरणीचे फण काढून तेथे आंतरमशागत आणि तण नियंत्रणासाठी ‘व्ही` आकाराची पास बसविता येते.

हे पास पिकाच्या दोन ओळीमध्ये बसवावे लागतात. तसेच सरीमध्ये रिजर ठेवून आंतरमशागत होते. याशिवाय स्वतंत्र आंतरमशागत यंत्र वापरता येते. ट्रॅक्टरचलित आंतरमशागत यंत्राचा वापर आंतरमशागत आणि तण नियंत्रणाच्या दृष्टीने बीबीएफ पद्धतीमध्ये करता येतो. यामध्ये इंग्रजी ‘व्ही` आकाराच्या पास वापरावी.

बीबीएफ पद्धतीमध्ये पिकाच्या ओळीनुसार ‘व्ही` पासची संख्या ठेवता येते. बाजारात सर्वसाधारणपणे तीन ओळींसाठी तीन पास उपलब्ध असलेले अवजार उपलब्ध आहे. गरजेनुसार पासाची संख्या वाढवता येते.

‘व्ही` आकाराच्या पासमुळे त्यामध्ये गवत अडकत नाही तसेच त्या स्वयंचलितपणे स्वच्छ होतात. कसळ पास (आडव्या) वापरल्या तर त्यात गवत अडकते. गवत अवजारामध्ये थांबवून पास स्वच्छ कराव्या लागतात. तसे ‘व्ही` आकाराच्या पासमध्ये होत नाही.

पिकाच्या ओळीच्या अगदी जवळ आंतरमशागत/तणनियंत्रण करण्याच्या दृष्टीने ‘एल` आकाराच्या पासचा उपयोगही या ठिकाणी करता येतो.

‘व्ही` आकाराच्या पासच्या दोन्ही बाजूंना ४५ अंश कोनामध्ये (उजव्या व डाव्या बाजूला) हाताच्या पंज्याप्रमाणे पत्रा (पाते) बसवलेला असतो. यामुळे पिकाला मातीची भर दिली जाते. तसेच तणही काढले जाते.

या अवजारामध्ये सऱ्यांमध्ये फाळ (रिजर) ठेवून आंतरमशागत होते. तसेच सऱ्यामध्ये तणही प्रभावीपणे काढता येते. यामध्ये रुंद वरंब्यावर पिकाच्या किती ओळी आहेत, त्याप्रमाणे व्ही पात्यांची संख्या ठेवता येते. गरजेनुसार असे अवजार बनविता येते.

बीबीएफ पद्धतीमध्ये सरसकट कोळप्याचा (अंतरानुसार पास घेऊन) वापर करून नंतर रिजरच्या साह्याने सऱ्यांचे पुनर्निर्माण किंवा त्या खोल करता येतात. यामध्ये ट्रॅक्टरचलित किंवा बैलचलित अवजारांचा उपयोग करता येतो.

डॉ. आनंद गोरे, ९५८८६४८२४२.  (कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

Web Title: agrowon news agriculture