संपन्नतेच्या ‘छापा’खाली जगणं अवघड  

संपन्नतेच्या ‘छापा’खाली जगणं अवघड  

कोल्हापूर : कर्ज भागवायचं कसं, या भीतीने आम्ही कर्ज घेत नाही. खरिपातलं भात, नाचणी झालं की दुसऱ्याच्या शेतात, इतर कामासाठी रोजगाराला जायचं आणि वर्षभरातला खर्च कसा तरी भागवायचा. कोल्हापूरपासून पंचवीस किलोमीटर असणाऱ्या जाधववाडी (ता. पन्हाळा) येथील शिवारात रिपरिप पावसात धनाजी जाधवांचे हात भात शेतीत मशागत करण्यात व्यस्त होते. अशा रिपरिपीतच त्यांनी संवाद साधायला सुरवात केली. कोल्हापूर म्हटलं की समृद्ध जिल्हा, कशाची ददात नाही, असं चित्र प्रशासन पातळीवर ऊस शेती गृहीत धरून रंगवलं जाते. हे चित्र किती खोटे आहे हेच जाधव यांच्या संवादातून जाणवत होते.

गावात दोन महिने टॅंकरने पाणी
ऊसपट्ट्यात दुर्लक्षिल्या गेलेल्या भात व नाचणी उत्पादकांची परवड त्यांच्यातून प्रत्येक वाक्‍यानजीक बाहेर पडत होती. कधीही कोणताही शेती अधिकारी न फिरकणाऱ्या गावात मी माहिती घ्यायला आल्याचे सांगताच त्यांना आश्‍चर्य वाटले. एका शाळेच्या वर्गात बसून त्यांनी परिस्थिती सांगायला सुरवात केली, माझी दोन एकर शेती आहे. आमच्याकडं पाऊस बक्कळ पडतो. पण पाणी साचत नाही. यामुळे वर्षातले दोन महिने टॅंकरने गावाला पाणीपुरवठा होतो. 

गेल्या वर्षीची भरपाई नाही 
शेतीचं बघायला गेले तर माझी दोन एकर शेती आहे. जे काय पावसावर येईल तेवढंच. भात व नाचणी हे आमचं पीक. जे येईल ते पोटापुरतं. रोजच्या जगण्याला दूध धंदा आणि इतरांच्यात रोजगार. हाच उपाय. गेल्या वर्षी या भागात निसर्गाने रौद्र रुप दाखविले. एका दिवसात प्रचंड पाऊस झाला. भात, नाचणी नुकतीच भरात येत होती. एका दिवसाच्या पावसाने नाले फुटून रुपयातल पाऊण आणे पीक वाहून गेलं, आता करायचं काय?..तलाठ्यांनी कसला तरी फॉर्म आणून नुकसानीची माहिती पाठवून दिली. पण त्यानंतर कायच झालं नाही. गेल्या वर्षी केवळ चार आण्यावरच भागवायची पाळी आली. गेल्या वर्षीच थोडं पिकलेलं आतापर्यंत कसा तरी पुरवून खातोय असं सांगत त्यांनी निसर्गापुढील अगतिकता स्पष्ट केली. जाधव यांना दोन मुले आहे. त्यांच शालेय शिक्षण सुरू आहे. त्यांना लागणारा पैसा हा दूध आणि रोजगारातूनच मिळवत असल्याचे त्यांनी सांगितलं. 

लोकप्रतिनिधी म्हणतात, कर्ज झेपायचं नाही 
जाधववाडी हे गाव करवीर व पन्हाळा तालुक्‍याच्या सीमेवरच. जाधववाडीपासून केवळ सहा किलोमीटर अंतरावर एक मोठा साखर कारखाना आहे. पण या गावात सिंचनाची सोय नसल्याने ऊस नाही. गावापासून पाच किलोमीटरवर कुंभी नदी आहे. नदीवरून पाणी आणण्यासाठी काही शेतकऱ्यांनी प्रयत्न केले. पण खर्च खूप येतोय तुम्हाला कर्ज झेपायच नाही असे सांगून लोकप्रतिनिधींनी त्यांना परत पाठवले. जर राजकीय इच्छाशक्तीच नसेल तर गाव सुधारणार कसे, या प्रश्‍नाला हे उत्तर होतं. आमची शेती मऊशार, पण उन्हाळ्यात एक थेंब पाणी नसतंय, करणार काय? या त्यांच्या प्रश्‍नाला सद्यस्थितीत तरी प्रशासनाकडे उत्तर नाही 

योजना आम्हाला कळतच नाहीत 
गावात अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. कृषी विभागाचे कर्मचारी तीनशे लोकसंख्या असणाऱ्या या वाडीसदृश गावात फिरकत नसल्याचे चित्र जाधव यांच्या बोलण्यातून जाणवले. ढोल बडवून कृषी उन्नतीचे स्वप्न दाखविणाऱ्या कृषी विभागाचा कारभार कसा आहे हे यातून जाणवले. कृषी उन्नत योजना सुरू आहे. पण या गावात याअंतर्गत एकही कार्यक्रम झाला नाही, असे जाधव यांनी सांगितले. आमच्यासाठी काय आहे हे आम्हाला कधीच कळत नाही. यामुळे आमच्या जीवावरच आम्ही शेती करतोय. असे सांगत त्यांनी शासन स्तरावरची उद्विग्नता स्पष्ट केली. त्यांच्या सोबत असणारे आनंदा मोरे यांनी दहा हजारचे कर्ज काढले. ते फेडले देखील पण ते फेडल्याबद्दल मला किती पैसे मिळतील याची कोणी माहिती दिली नसल्याचे सांगत शेतकऱ्यांना अजूनही कर्जफेडीबाबत माहिती नसल्याचा पुरावा दिला. 

भात नाचणी उत्पादक दुर्लक्षितच 
मर्यादित शेती, मर्यादित उत्पन्न, घरात खाण्यासाठी  पीक घेण्यास प्राधान्य अशी मानसिकता डोंगराळ तालुक्‍यातील शेतकऱ्यांची आहे. जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे ऊस हे पीक या भागात अत्यंत कमी आहे. भात व नाचणी मात्र मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात. पण त्यांच्याकडे कृषी विभाग, सहकारी बॅंका याचे फारसे लक्ष नाही. अथवा या शेतकऱ्यांसाठी काही तरी नियोजन करावे या मानसिकतेत ही या भागाचे प्रतिनिधित्व करणारे राजकीय नेते नाहीत. 

कोण कर्ज देणार?
संवाद साधत असताना सहज विचारले, एवढं हलाखीत जगता, दोन एकर शेती आहे तर कर्ज का घेतलं नाही. यावर एका क्षणात त्यांनी प्रतिक्रिया दिली. अहो साहेब, भात, नाचणीला कोण कर्ज देणार, आणि काय तरी करून कुठनं तरी घेतलं तर फेडायचं कुठून ही भ्या आम्हास्नी पडत्या. शेतकरी कर्ज मुद्दाम बुडवतात या अपप्रचाराला छेद देणारं हे वाक्‍य विचार करावयास लावणारे होते. पोटापुरतं पिकवायचं आणि इतर खर्चासाठी दूध धंदा करायची व इतरांच्या कामाला जायचं ही त्यांची जीवन जगण्याची पद्धत नक्कीच शेतकऱ्यांची अवस्था स्पष्ट करणारी होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com