पिकांमध्ये जलसंधारणासाठी सरी आवश्‍यक

डॉ. भगवान आसेवार डॉ. आनंद गोरे
शुक्रवार, 7 जुलै 2017

उभ्या पिकांमध्ये पेरणीनंतर आंतरमशागतीची कामे झाल्यावर साधारपणे ३० ते ३५ दिवसांनंतर सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांमध्ये प्रत्येक चार ओळींनंतर एक उथळ सरी काढावी. या सरीमुळे येत्या काळात पडणारा पाऊस मुरून पिकाला फायदा होईल.

या  वर्षी पावसाचे आगमन वेळेपूर्वी होऊन जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यात चांगला पाऊस झाला, परंतु मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. सध्याच्या परिस्थतीचा विचार केला, तर ५० ते ६० टक्के पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. पावसाच्या वितरणामध्ये तफावत दिसून येत आहे. सध्या पिके वाढीच्या अवस्थेमध्ये असून, पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. या पिकांच्या वाढीसाठी जमिनीमध्ये ओलावा असणे गरजेचे आहे.  

कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांमध्ये हलकी कोळपणी करावी. त्यामुळे मातीचे जमिनीवर अाच्छादन तयार होते. पिकातील माती खालीवर करून जमिनीतून उडून जाणारा ओलावा थांबवणे, ज्या ठिकाणी भेगा पडल्या आहेत त्या बुजविणे आवश्यक आहे. या माध्यमातून पिकाला मातीची भर द्यावी.

सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांना संरक्षित सिंचन द्यावे. यासाठी शेततळे, विहीर, नालाबांधातील साठविलेल्या पाण्याचा वापर करावा. पाणी बचतीसाठी तुषार सिंचनाचा वापर करावा. या वर्षी जूनमध्ये सुरवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता आहे.  

ज्या ठिकाणी खरीप पिकांचे क्षेत्र कमी आहे, त्या ठिकाणी आच्छादनाचा वापर करावा. जमिनीतील ओलावा राखण्यासाठी आच्छादनाचा फायदा होतो. वाळलेले गवत लाकडी भुसा, उसाचे पाचट, पालापाचोळा, गव्हाचे काड, सोयाबीन भुसा किंवा गिरिपुष्प, सुबाभूळ याचा पाला ३ ते ५ टन प्रतिहेक्टर वापरावा. 

वाऱ्याचा वेग कमी असताना सकाळी किंवा सायंकाळी पाणी द्यावे. बाष्पीभवन कमी होईल याची काळजी घ्यावी. पिकाला एक सरी आड एक सरी पाणी द्यावे. पाण्याच्या चाऱ्यांची दुरुस्ती करावी. त्यामुळे पाणी वाया जाणार नाही.

उसामध्ये पाचट अच्छादन करावे. प्रतिटन पाचट कुजविण्यासाठी आठ किलो युरिया, दहा किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक किलो पाचट कुजविणारे जिवाणूसंवर्धक पाचटावर पसरून द्यावे.

अन्नद्रव्ये व ओलावा यासाठी पिकाशी स्पर्धा करणाऱ्या तणांचे नियंत्रण करावे. विशेषत: जिरायती शेतीमध्ये तणांचे वेळीच नियंत्रण करावे. सोयाबीन, ज्वारी या पिकांत १५ ते ४५ दिवस, बाजरी, मूग, उडीद १५ ते ३० दिवस आणि कपाशी ६० ते ७० दिवस हा पीक- तण स्पर्धेचा संवेदनशील कालावधी आहे.

जिरायती शेतीमध्ये हेक्टरी योग्य झाडांची संख्या राखणे महत्त्वाचे आहे.

पिकाच्या अवस्थेनुसार जमिनीतील ओलावा कमी झाल्यास अन्नद्रव्यांची मात्रा फवारणीतून द्यावी. यामध्ये पीक ३० दिवसांपर्यंत असल्यास पोटॅशिअम नायट्रेट १०० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यामुळे पिकांची पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता वाढते. 

मूग, उडीद, खरीप ज्वारी यांची पेरणी ७ जुलै पर्यंत करणे शक्य आहे. कापूस आणि सोयाबीन या पिकांची पेरणी १५ जुलै पर्यंत करणे शक्य आहे.

जलसंधारणाचे उपाय
उभ्या पिकांमध्ये पेरणीनंतर आंतरमशागतीची कामे झाल्यावर साधारपणे ३० ते ३५ दिवसांनंतर सोयाबीन, तूर, मूग, उडीद, ज्वारी, बाजरी या पिकांमध्ये प्रत्येक चार ओळींनंतर एक उथळ सरी काढावी. या सरीमुळे येत्या काळात पडणारा पाऊस मुरून पिकाला फायदा होईल.

पेरणीनंतर सुरवातीस आंतरमशागतीची कामे पूर्ण झाल्यावर दोन पिकांच्या ओळींमध्ये ठराविक अंतरावर जलसंधारण सरी काढावी. या सरीमध्ये पावसाचे पाणी जमा होऊन ओलावा जास्त काळ टिकून राहतो.

ज्या ठिकाणी अजून पेरणी झालेली नाही अशा ठिकाणी रुंद वंरबा सरी यंत्राचा वापर करून रुंद वरंब्यावर पिकाची पेरणी करावी. भारी, खोल काळ्या जमिनीमध्ये ही अतिशय उपयुक्त लागवड पद्धती आहे. यामध्ये १२० ते १८० से.मी. रुंदीचे वरंबे  आणि १५ ते ३० सें.मी. खोलीच्या सऱ्या केल्या जातात. या सऱ्यांमध्ये पावसाचे पाणी जास्त कालावधीसाठी राहते व मुरते. त्याच प्रमाणे पिकाची लागवड रुंद वरंब्यावर असल्याने जास्त पाऊस झाला तरी त्याचा पिकाच्या वाढीवर दुष्परिणाम होत नाही. जास्त झालेल्या पावसाचे पाणी सऱ्यांवाटे निघून जाते.

डॉ. भगवान आसेवार, ९४२००३७३५९
(अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी

Web Title: agrowon news agriculture