वयाच्या पंचाहत्तरीतही मुख्याध्यापक झाले विद्यार्थी

डी. के. वळसे पाटील
शुक्रवार, 7 जुलै 2017

ॲग्रोवन हाच गुरू मानून सुलतानपूर (ता. आंबेगाव, जि. पुणे) येथील रामचंद्र शिंदे हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आपल्या अडीच एकरांवर विविध प्रयोग करीत आहेत. आज शेतीतील नवी पिढी शेतीपासून दूर जाता नोकरीच्या मागे लागताना दिसत अाहे. अशा परिस्थितीत वयाच्या पंचाहत्तरीतही गुरुजी मात्र विद्यार्थ्यांची मनोवृत्ती ठेवत शेतीत प्रगतिशील होण्यासाठी प्रयत्नशील आहेत.  

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुका भाजीपाला पिकांसाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यातील सुलतानपूर येथील रामचंद्र महादेव शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. सेवानिवृत्त होऊन त्यांना जवळपास १६ वर्षे झाली. मात्र कामातून त्यांनी निवृत्ती घेतलेली नाही. आज वयाच्या पंचात्तरीतही न थकता त्यांनी स्वतःला शेतीत झोकून दिले आहे. पत्नी सौ. सीताबाई यादेखील खांद्याला खांदा लावून पतीचा शेतीतील उत्साह वाढविण्याचे काम करीत असतात.  

‘ॲग्रोवन’ची प्रयोगांमागे प्रेरणा

शिंदे यांची केवळ अडीच एकर शेती आहे. शाळेच्या नोकरीचे ठिकाण शेतीपासून सुमारे ३० किलोमीटर होते. रोज जाऊन येऊन करावे लागे. साहजिकच शेतीकडे पुरेसा वेळ देणे शक्य होत नव्हते. त्या वेळी केवळ देखरेखीची भूमिका बजावली जायची. सेवानिवृत्तीनंतर मात्र गुरुजींनी शेतीचा विकास करण्याचे ठरवले. शेती थोडी अाहे म्हणून निराशा नव्हती. उलट उपलब्ध क्षेत्रातच विविध पिके घेत विकास करण्याची मानसिकता ठेवली. त्यासाठी ॲग्रोवन मदतीला धावून आला. सुरवातीपासून ते ॲग्रोवनचे वाचक आहेत. त्यातील विविध लेख, यशकथा वाचून त्यांनी पिकांची निवड केली. पीकपद्धती बदलली. ॲग्रोवन हाच आपला शेतीतील गुरू असल्याचे शिंदे गुरुजी सांगतात.  

शेती व पीकपद्धती

ऊस हे गुरुजींचे मुख्य पीक आहे. यात पट्टा पद्धतीचा वापर ते करतात. एकरी ५० टन उत्पादन असले तरी ते वाढविण्याचा गुरुजींचा प्रयत्न आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये पाच दिवसांच्या नजीकच्या काळात होणाऱ्या प्रशिक्षणासाठी संबंधित साखर कारखान्याने त्यांची निवड केली आहे. वास्तविक प्रशिक्षण म्हटले, की बऱ्याचवेळा आपल्याला तरुण मंडळीचा सहभाग प्रकर्षाने दिसून येतो. मात्र गुरुजींना उतारवयातही ऊस शेतीत नवे काही करण्याची आस आहे हे त्यांच्या प्रशिक्षणातील सहभागावरून दिसून येते. उसात मेथी, स्वीटकॉर्न अशी आंतरपिके घेण्याचा प्रयोगही त्यांनी केला आहे. 

उसात एक किलो मेथी बियाण्यापासून १०० मोठ्या गड्डींचे उत्पादन घेत ४० हजार रुपयांपर्यंत उत्पन्न त्यांनी घेतले आहे. स्वीटकॉर्नच्या दराने मात्र यंदा निराशा केल्याचे ते म्हणाले. यापूर्वीही टोमॅटो, फ्लॉवर, कोबी आदी पिकांचे प्रयोगही त्यांनी केले आहेत. बाजरीचेही २० गुंठ्यांत १० क्विंटल उत्पादन त्यांनी घेतले आहे. 

दहा गुंठ्यांत उन्हाळी मिरची 

यंदाच्या उन्हाळ्यात शिंदे दांपत्याने दहा गुंठे क्षेत्रात ठिबक सिंचन व पॉलिमल्चिंग पेपरचा अवलंब करून उन्हाळी मिरचीचा प्रयोग केला आहे. उन्हाळ्यात असलेली पाण्याची गरज लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा म्हणून ठिबक त्‍यांना उपयोगी ठरले आहे. यंदा आतापर्यंत १६०० किलो मिरचीची विक्री केली आहे. अजूनही चांगले उत्पादन पदरात पडेल अशी त्यांना आशा आहे. सध्या प्रति किलोला सरासरी ४० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. मल्चिंग पेपरचा वापर केल्यामुळे खुरपणी, मजुरीच्या खर्चात मोठ्या प्रमाणात बचत झाली आहे. विक्री मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत केली जाते. बंधू गंगाराम, मुलगा रवींद्र, सून सौ. सुनीता शिंदे व इंद्रभान पवार यांची वेळोवेळी मदत गुरुजींना मिळाली आहे. 
रामचंद्र शिंदे, ९५०३८२२४७७ 

Web Title: agrowon news agriculture