रायपनिंग चेंबर, कुशल मार्केटिंगद्वारे आंबा झाला ‘श्री मधुर’  

रायपनिंग चेंबर, कुशल मार्केटिंगद्वारे आंबा झाला ‘श्री मधुर’  

अनिल पडवळ नांदेड येथे राहतात. ते सिंचन विभागात वसमत (जि. परभणी) येथे शाखा अभियंता आहेत. पूर्णा तालुक्यातील कात्नेश्वर (जि. परभणी) येथे त्यांची शेती आहे. कात्नेश्वर हे गाव नांदेड व परभणीच्या मध्यभागी आहे. दररोज संध्याकाळी आॅफिसहून परतताना पडवळ कात्नेशवर येथे शेतात येतात. आंबा बाग व जनावरे संगोपनाचे काम आटोपून संध्याकाळी दहापर्यंत घरी पोचतात. शेतीची आवड असल्यानेच रोजच्या श्रमाचे काहीच वाटत नसल्याचे ते सांगतात. सुट्यांच्या दिवशी ते अधिकवेळ बागेला देतात.   

बागेचा विकास 
एका कंत्राटदाराकडून पडवळ यांनी २००४ च्या दरम्यान केशर आंबा व मोसंबीची जुनी झाडे असलेली बाग खरेदी केली. आंब्यांच्या दोन झाडांमध्ये मोसंबी होती. ॲग्रोवनचे पडवळ नियमीत वाचक आहेत. आंब्याविषयी ॲग्रोवनमधील लेख, यशकथा त्यांच्या संग्रही आहेत. यशकथेतील संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क साधून ते माहिती घ्यायचे. शास्त्रज्ञांच्या भेटीही घेतल्या. कृषी प्रकाशनांचा संग्रह केला. व्यासंग वाढवला. नोकरी सांभाळून बागेकडे लक्ष देऊ लागले. 

पाणी- पाण्याची उपलब्धता कमी आहे. विहीर पुनर्भरण केल्याने फायदा होत आहे. त्याचबरोबर ३४ लाख लिटर क्षमतेचे शेततळे उभारले आहे. 

आजचे उत्पादन
एकूण झाडे- सुमारे ३५०- १४ वर्षे वयाची. त्यातून उत्पादन- २० ते २५ टन. दोन वर्षांपूर्वीचे- ३२ टन.  
यंदा हवामानामुळे केवळ साडे आठच उत्पादन.
रायपनिंग चेंबरचा वापर 
पडवळ २००५ ते ०७ या काळात पाचटात आंबा पिकवायचे. दापोली येथील कृषी विद्यापीठाने आंबा पिकवण्यासाठी तयार केलेल्या पाॅलिथीन पेपरयुक्त इथीलीन चेंबरची माहिती त्यांना मिळाली. मात्र या प्रक्रियेत आंबा थोड्या प्रमाणात पिकवला जायचा. त्यात सुधारणा करून, मुंबई येथील अभियंत्याची मदत घेऊन तीन रायपनिंग चेंबर बसवले. त्यांची माहिती अशी.

एकाचे ६ बाय १२ फूट व अन्य दोघांचे साडेसहा बाय बारा फूट आकारमान 
यात ५० ते १०० पीपीएम प्रमाणात इथिलीन वायू ४० सेकंदासाठी सोडला जातो. तापमान व आर्द्रता नियंत्रित केली जाते. तापमान १९ ते २१ अंश से. ठेवले जाते.
चेंबरमधील कार्बन डाय आॅक्साईड वायू काढण्यासाठी फॅन्स व परिसरात तुळशीची झाडे
प्री कूलिंग- आंबा चेंबरमध्ये ठेवण्यापूर्वी त्याचे तापमान १७ अंश सेल्सिअसपर्यंत आणले जाते. 

मार्केटिंग व विक्री 
वाढ नियंत्रक व अन्य व्यवस्थापनामुळे पडवळ यांच्याकडील आंबा नांदेड शहरात सर्वात आधी विक्रीला येतो. आपला आंबा पडवळ यांनी नांदेड शहरातील चार रिटेल दुकानांतून ठेवतात. त्यांना १५ टक्के कमीशन दिले जाते. दोन किलो पॅकिंग व सुट्टा अशी विक्रीची पद्धत आहे. न विकलेला आंबा तसेच  खराब आंबाही परत घेऊ असे सांगितल्याने या व्यावसायिकांनी उत्साहात भरपूर आंबा विकला. 

विकेत्यांची जोखीम अशी कमी केली आहे. आंब्याचे मोजमाप करताना नेमका एक किलो किंवा अर्धा किलोच न होता ५० ते १०० ग्रॅम वजनात जास्तही भरतो. त्याचे पैसे ग्राहकाकडून घेता येत नाहीत. त्यामुळे विक्रेत्यांना २० किलोमागे एक किलो आंबा जास्तीचा विनामूल्य दिला जातो.  

विक्री
किमान १०० रुपये तर एकेवर्षी १६० रुपये प्रति किलो दराने विक्री
पुण्यातील प्रदर्शनात डझनाला ५०० रुपये दर मिळाला. 
सन २०१३-१४ मध्ये पणन मंडळाच्या मदतीने दोन टन आंबा न्यूझीलंडहा पाठवला. 

सेंद्रिय पद्धतीचा वापर
सुमारे १२ देशी गाई, प्रत्येकी २ बैल व म्हैस. त्यामुळे शेणाची मुबलक उपलब्धता. 
जीवामृत निर्मिती. गांडुळ खत तयार करण्याचीही अभिनव पद्धत तयार केली आहे.  फळांचे निर्जंतुकीकरण 
फळांची काढणी सकाळी किंवा दुपारी ऊन टळल्यानंतर. तोडणी करताना फळावर बोटभर देठ राहील याची काळजी घेतली जाते. यामुळे चीक फळांवर ओघळून आंब्याची प्रत घसरत नाही. 
विशिष्ट रसायनाद्वारे निर्जंतुकीकरण, सुती कपड्याने चांगले पुसून, क्रेट भरुन मग आंबे रायपनिंग चेंबरकडे पाठवले जातात.

ठळक नोंदी 
पडवळ यांचे नियमित ग्राहक आहेत. त्यांना मोबाईलवर आंबे उपलब्ध झाल्याचा ‘मेसेज’ दिला जातो. स्थानिक वर्तमानपत्रात छोटी जाहिरातही दिली जाते.  
लहान, डागी आंब्याची विक्री तरोडा नाका येथे सकाळी भरणाऱ्या बाजारात होते. या ठिकाणी व्यापारी ठोक माल मागतात. परंतु, त्यांना विक्री न करता स्वतः उभे राहून करतात. त्यामुळे जास्तीचा नफा मिळतो.  

पाच रुपये प्रति किलोप्रमाणे अन्य शेतकऱ्यांचा मालही चेंबरद्वारके पिकवून दिला जातो. नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी, नांदेड शहरातील काही निवासी याचा फायदा घेतात. वर्षाकाठी सुमारे ३०-४० टन आंबा पिकवला जातो. ही एक प्रकारे ‘बिझनेस रणनिती’च म्हणायला हवी.  

पडवळ यांचा आंबा नांदेडच्या घराघरांत पोचला तो कृषी विभागाच्या धान्य महोत्सवामुळे. यात आंब्याची प्रत व गोडी पाहून ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात रांगा लावून तो खरेदी केला. तशा बातम्याही वर्तमानपत्रामध्ये झळकल्या. त्यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात वाढला. परभणी व हिंगोली येथील धान्य महोत्सवातही स्टॉल घेतला. अशा उपक्रमामुळे पडवळ यांच्याकडे रायपनिंग चेंबर असल्याचा संदेशही शेतकऱ्यांपर्यंत पोचला.  

केशर आंब्याप्रमाणेच घरून व रिटेल दुकानांमधून मोसंबीची विक्री होते. माल जास्त असेल तेव्हा ते नागपुरला पाठवतात. नांदेडमधील ज्यूस सेंटरलाही मोसंबी पुरवतात. 

शेतीत पत्नी सौ. स्नेहलता व दोन मुलांचा वाटाही महत्त्वाचा. हंगामात सर्व कुटूंबच विक्री व्यवस्थापनात गर्क.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com