बिनभरवशाची शेती पिकलं तर पिकलं

बिनभरवशाची शेती पिकलं तर पिकलं

पुणे : आमची शेती पावसाच्या भरवशावर.... पाऊस असंल तर कांदा, साेयाबीन, मिरची, टाेमॅटाे पीक घेताे. पण गेल्या तीन वर्षांपासून पाऊसच नाही... आता पण नांगरून सगळ रान तयार करून ठेवलय...पावसाची वाट बघताेय... पहिला पाऊस झाला त्यानंतर आता पंधरा दिवस हाेत अाले अजून पाऊस नाही.... शेत पडीक ठेऊन चालणार नाही... म्हणून पाऊस येईल या भरवशावर पेरताेय.... बिनभरवशाची शेती पिकलं तर पिकलं नाही तर गेल सगळं वाया, अशी व्यथा भास्कर जगताप आणि अरुण जगताप हे सख्खे भाऊ सांगत होते. 

सासवड (ता. पुरंदर) येथे भास्कर आणि अरुण जगताप यांच्या नावावर आठ एकर शेती. शेतात विहीर आहे पण.. विहिरीचे पाणी पावसावर अवलंबून. पाऊस झाला तर शेती आठमाही पिकणारी. पाऊस नाही झाला तर खरिपात पावसाच्या भरवशावर पेरण्या करायच्या आणि पिकल त्यावर समाधान मानायचं, अशी बिनभरवशाची शेती. दाेन्हीही भावांना विकास साेसायटीचे ६५ हजाराचं पीक कर्ज मिळत. या कर्जावर आवाक्यात येईल एवढीच शेती करायची त्यांची मानसिकता. शेतीत भांडवली गुंतवणूक करायची तर राष्ट्रीय बॅंक कर्ज देत नाहीत असा त्यांचा अनुभव. 

याबाबत बाेलताना भास्कर आणि अरुण जगताप म्हणाले, ‘‘आमचा भागच कमी पावसाचा. पाऊस पडो अथवा न पडाे शेती पडीक ठेऊन चालत नाही. पडिक ठेवली तर गबाळ (गवत, खुरटी झाड) उगवत. मग ते गबाळ काढण्यात जास्त खर्च हाेताे. म्हणून दरवर्षी जे काय मिळंल ते मिळंल या आशेवर शेती करताे. पाऊस असला, विहिरीला पाणी आलं तर कांदा, साेयाबीन, टाेमॅटाे आणि ज्वारी, गहू पीक करायची. पण गेली तीन वर्षे समाधानकारक पाऊस नसल्यान ही पीक घेता आली नाहीत. यंदा पाऊस वेळवर सुरू झाला. वारीला पाऊस असताे. आषाढात पण पाऊस असताे. पण गेली १५ दिवस पाऊसच झालेला नाही. वावर पेरण्यांसाठी तयार करून ठेवली, बी तयार आहेत. पण पाऊसच नाही. म्हणून थांबलाे. पण आता पावसाच्या भरवशावर पेरणी करायची आहे. पाऊस आला तर ठिक नाही, तर येईल त्यावर समाधान मानायच. शेतीसाठी पीक कर्ज साेसायटीकडून मिळते. दाेघांना ६५ -६५ हजार मिळतं. ते पण वेळच्या वेळी भरताे. त्यामुळे पीक कर्ज माफीचा काही विषयच येत नाही.’’ 

‘‘शेतात काय पिकतच नाही, तर राष्ट्रीय बॅंकांतून कर्ज कशाला काढायच. शेतात सिंचन सुविधा उभारायच्या तर आमच्या सारख्या शेतकऱ्यांना राष्‍ट्रीयीकृत बॅंका उभंच करत नाही. कर्ज काढायच तर ५० कागदपत्रं बॅंका मागतात. त्यामुळ कर्जच नकाे अस वाटत. माेठ्या बॅंकांची कर्ज व्यापाऱ्यांना, माेठ्या शेतकऱ्यांना मिळतात यामुळे लहान शेतकऱ्यांना त्यांचा काय फायदा नाही. शेती आणि शेतकऱ्यांच काय खर नाही हे बॅंकांना माहीत असल्याने ते शेतकऱ्यांना उभ पण करत नाही. आठ एकर शेती आहे. शेतात पाण्याची साेय करावी, पण त्यासाठी कर्ज लागत. पण बॅंका कर्ज देत नाही. देणार नाही हे माहीत आहे. मग कशाला बॅंकामध्ये जायच. म्हणून आहे तशी शेती करायची. अशी भावना या वेळी जगताप बंधूंनी व्यक्त केली. 

शेतकऱ्यालाच आराेपी केलं...
सचिन रघुनाथ राऊत (रा. सासवड, जि. पुरंदर) तिशीतला तरुण शेतकरी पाच एकर शेती कसताे. यामधील अडिच एकर ऊस तर अडिच एकरवर कडधान्य घेताे. यंदा अडिच एकरावर पहिल्या पावसावर घेवडा पेरला. पाऊस येईल या आशेवर बसला. पण गेली १५ दिवस पाऊस नाही, राेज कडक उन पडत. उगवलेला घेवडा सुकायला लागलाय. दाेन चार दिवसांत पाऊस नाही पडला तर दुबार पेरणीच संकट डाेक्यावर आहे. याबाबत सचिन राऊत म्हणाले, ‘‘पहिल्या पावसावर घेवडा पेरला चांगला उगवला, पण एेन वाढीच्या अवस्थेत पाणी नसल्याने सुकायला लागलाय. निम्म्या शेतात तर बी उगवलच नाही. शेतीसाठी दीड लाख साेसायटीच कर्ज घेताे. पण ते दरवर्षी नव जुनं करताे. त्यामुळे कर्जमाफीचा काय फायदाच नाही. लई नियम अटी घालुन ठेवल्यात. कर्जमाफी काेणाला मिळाली काेणाला नाही हेच कळत नाही. सरकारनं शेतकऱ्यालाच आराेपी केलं आहे. द्यायच हाेत तर सरसकट दीड लाखाची कर्जमाफी द्यायला पाहिजे हाेती.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com