...तरीही शेतीतील धडपड कायम

...तरीही शेतीतील धडपड कायम

पुणे - कशीबशी चार एकर दुष्काळी शेती. ठिबक करायचं तर गाठीला पैसा नाही. दोन भावांचं मोठं कुटुंब. गोठ्याचंच रूपांतर छोटेखानी घरात केलेलं. नऊ लाखांचं कर्ज. पुणे जिल्ह्यातील मेमणवाडी येथील वारे बंधूंच्या कुटुंबाची ही दयनीय अवस्था. शेतीतलं बहुतेक सर्व उत्पन्न मुलांच्या शिक्षणावरच खर्च होतं; मात्र चांगलं शिक्षण देऊन मुलांना मोठं करण्यासाठीच वारे बंधूंची शेतीतील धडपड सुरू आहे. 

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात मेमणवाडी या छोट्याशा गावात मुरलीधर आणि कैलास या वारे बंधूंची चार एकर शेती आहे. त्यात दोन एकरांत मुख्य ऊस. तो कारखान्याला किंवा गुऱ्हाळाला जातो. याच पिकावर वर्षभराच्या खर्चाची भिस्त. मोठ्या उमेदीनं यंदा लाल पेरूचा दीड एकरांत प्रयोग केला; पण पाण्याचं दुर्भिक्ष नेहमीप्रमाणं संकट म्हणून उभं ठाकलं. नदीचं लिफ्ट केलेलं पाणी पंधरा दिवसांतनं एकदा येतं. ठिबक करायची अात्यंतिक इच्छा होती; पण पैसाच नसल्यानं ती मारावी लागली. एक दोन शेतकऱ्यांकडील टाकाऊ ठिबकच्या नळ्या आणल्या; पण तुटलेले ड्रीपर्स देणार तरी काय? अखेर पाण्याअभावी पेरूचा एक प्लॉट खुजा राहिला तो कायमचा. शेतीसाठी घेतलेलं आठ-नऊ लाख रुपयांचं कर्ज पाच वर्षांपासून थकीत आहे. ट्रॅक्टरवरच्या कर्जाचा भार आहे. दोन भाऊ, दोघांच्या पत्नी, दोन मुली, एक मुलगा असं सारं कुटुंब शेतीवरच अवलंबून आहे. 

गावातलं राहतं घर विकून काही वर्षांपूर्वी वारे कुटुंब शेतीवर वस्तीला आले. नाही म्हणायला छप्पर असलेली जागा होती. गोठाही होता. जनावरं कमी झाली. एकच गाय उरली. मग गव्हाण फोडून, थोडी डागडुजी करून गोठ्याचंच रूपांतर छोटेखानी घरामध्ये केले.  

जिद्द सोडलेली नाही 
प्रतिकूलतेतही वारे बंधूंनी उमेद हरवलेली नाही. वर्षाचा घर खर्च पाच लाखांपेक्षा कमी नाही. शेतीतलं बहुतांश उत्पन्न मुलांच्या शिक्षणावरच खर्च होतं. मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं, त्यात कुठं कमतरता ठेवायची नाही हाच ध्यास बाळगून वारे बंधू शेती चांगली करण्यासाठी धडपडताहेत. एक मुलगा उस्मानाबादला बीएस्सी ॲग्रीच्या दुसऱ्या वर्षात शिकतोय. आठवीला शिकणारी मुलगी आणि सहावीला असलेला मुलगा पंधरा किलोमीटरवरील उरळी कांचन गावात शिकतात. स्कूलबसचा मिळून महिन्याचा दोन हजार रुपये खर्च आहे; पण कुटुंब डगमगलेलं नाही. एक मुलगी नातेवाइकांकडे शिक्षणासाठी आहे. बारावी झालेल्या दुसऱ्या मुलीलाही पुढं शिकवायचं आहे. कर्जमाफीच्या निकषांत यंदा बसलो असतो तर मोठा आधार झाला असता, असं वारे बंधू म्हणतात.   

दुष्काळात तेरावा 
एक विहीर आहे; पण तिलाही पाणी नाही. नदीचं पाणी मिळतं तेही क्षारयुक्त. एकेका बोअरला ३५ हजार रुपये खर्च करून तीन बोअर घेतले. एकालाही पाणी लागलं नाही. कर्जमुक्ती हवीच; पण सरकारनं हमीभाव द्यायलाच हवा एवढीच वारे बंधूंची माफक मागणी आहे. 

धडपडीतील संघर्ष 
एकेकाळी पाण्यात मीठ टाकून, भाकरी चुरून खाऊन दिवस काढले. शेती जिद्दीनं केली. आज मुलांना शिकवायची सारी धडपड सुरू आहे. कृषीचं शिक्षण घेऊन मुलगा निश्चित काही घडवेल, शेतीला चांगले दिवस आणेल हीच आशा बाळगून वारे बंधूंची शेतीतील धडपड सुरू आहे.

मुरलीधर वारे,  ९८२३४०४५९६

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com