टोमॅटोत तेजी

दीपक चव्हाण
सोमवार, 3 जुलै 2017

टोमॅटोच्या बाजारभावात जोरदार वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील कसमादे विभागात सुरत मार्केटसाठी फार्म कटिंगचा रेट ३२ रुपये किलोपर्यंत पोचला आहे. चालू कॅलेंडर वर्षात प्रथमच बाजारात तेजी दिसत आहे. यामागे बाजारातील उठाव हे कारण नसून, प्रतिकूल हवामानामुळे उत्पादकता घटल्यामुळे दर वाढले आहेत. 

टोमॅटोच्या बाजारभावात जोरदार वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील कसमादे विभागात सुरत मार्केटसाठी फार्म कटिंगचा रेट ३२ रुपये किलोपर्यंत पोचला आहे. चालू कॅलेंडर वर्षात प्रथमच बाजारात तेजी दिसत आहे. यामागे बाजारातील उठाव हे कारण नसून, प्रतिकूल हवामानामुळे उत्पादकता घटल्यामुळे दर वाढले आहेत. 

मागील दोन महिन्यांत तीव्र उन्हाळा, भुरी व रसशोषक किडींचा प्रादुर्भाव यामुळे ठिकठिकाणचे टोमॅटोचे प्लॉट खराब झाले. रोगाचा प्रादुर्भाव असताना बाजारात मंदी होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीकसंरक्षणाकडे फारसे लक्ष दिले नाही. परिणामी, उत्पादकता घटली, असे सटाण्यातील प्रयोगशील शेतकरी नामदेव भामरे यांचे निरीक्षण आहे. सध्याचे भाव पाहून आता टॉमॅटोच्या रोपांना जोरदार मागणी दिसत असून, त्यामुळे पुढे बाजारभावाबद्दल पुन्हा साशंकता आहे. टोमॅटोसारख्या पिकामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक असते. तेजी-मंदी पाहून घेतलेले निर्णय चुकतात, असेही भामरे यांचे म्हणणे आहे. 

दिल्लीतील आझादपूर मार्केटमध्ये प्रतिकिलो चाळीस रुपयांवर ठोक विक्रीचे दर पोचले आहेत. उत्तर भारतात पावसामुळे मालवाहू ट्रक उशिरा पोचत असल्याचे तत्कालिक कारण या तेजीमागे आहे. तथापि, देशभरातून उत्पादकता घटीमुळे रोडावलेल्या पुरवठ्याने बाजाराला आधार दिला आहे. महाराष्ट्रासह देशभरातील प्रमुख उत्पादक विभागात मे व जून महिन्यात अत्यंत असमतोल वातावरण होते. दिवसाच्या आणि रात्रीच्या तपमानात मोठी तफावत असली की एकूणच फळफळावळ उत्पादन घटते, असा अनुभव आहे. 

गेल्या तीन वर्षांपासून टोमॅटो पिकात शेतकऱ्यांना पैसा मिळालेला नाही. दर वेळी आता नाही तर पुढच्या प्लॉटमध्ये मिळेल, असे म्हणत शेतकरी उत्पादन घेत राहिले आणि सारे भांडवल आटत गेले. आता नव्याने प्लॉट उभा करण्याची ताकद उरली नाही, असे माढा तालुक्यातील मोडनिंबचे शेतकरी शशिकांत सुर्वे सांगतात. या परिसरात '' टोमॅटोपेक्षा कठान बरे'', असे म्हणत शेतकऱ्यांनी उडादासारख्या पिकांचे क्षेत्र तीन -चार पटीने वाढवले आहे. उडीद हे टोमॅटोला पर्याय असू शकत नाही; पण शेतकऱ्यांकडचे भांडवल आटल्याचे ते निदर्शक आहे. 

खामखेडा (देवळा) येथील शेतकरी दीपक बोरसे यांच्या मते, सध्याची टोमॅटोतील तेजी ही हंगामी स्वरूपाची आहे. दरवर्षी जुलैच्या आसपास टोमॅटोला चांगला बाजार मिळतो. याचे कारण एप्रिल- मे महिन्यात केलेली टोमॅटोची लागवड नेहमीच खराब होते. उन्हामुळे पाहिजे तसा प्लॉट तयार होत नाही. रोगराईचा प्रादुर्भाव होतो. त्याचा प्रभाव साठ दिवसांनी जूनच्या शेवटी किंवा जुलैत येणाऱ्या मालावर पडतो. पंधरा जूननंतर वातावरण जसजसे थंड होत जाते, तशी प्लॉटमध्ये सुधारणा दिसू लागते.

गेल्या वर्षीही जुलैमध्ये टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळाला होता. पण नंतरच्या काळात सर्वाधिक मोठी मंदी दिसली. ऑगस्ट २०१६ पासून मंदी सुरू झाली. त्या पुढील सहा महिन्यांतील सरासरी विक्री दर १ ते ५ रु. किलो दरम्यान म्हणजे उत्पादन खर्चाच्या खूपच खाली राहिले. एवढे होऊनही टोमॅटोचा पुरवठा घटला नाही. कारण तेजी येईल या अपेक्षेने उत्पादनाचे चक्र सुरू राहिले. फेब्रुवारी २०१७ पर्यंत मंदी सुरू होती. मार्च ते मे या कालावधीत बाजार सुधारले. जूनमध्ये पुन्हा बाजार पडला. आता  सुधारणा दिसतेय. खरा प्रश्न आहे, ऑगस्टपासून पुढचा. गेल्या वर्षाची पुनरावृत्ती न होता किफायती बाजारभावाची अपेक्षा आहे. 

कृषी मंत्रालयाने २०१६-१७ साठीच्या पहिल्या फलोत्पादन पाहणीत १८९ लाख टन टोमॅटो उत्पादनाचा अंदाज दिला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यात सुमारे एक टक्का वाढ आहे. देशांत आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, महाराष्ट्र, प. बंगाल, बिहार, गुजरात ही प्रमुख टोमॅटो उत्पादक राज्य आहेत. देशातील निम्म्याहून अधिक उत्पादन या राज्यांतून येते. यात महाराष्ट्र आणि गुजरात ही वर्षभर टोमॅटो पिकविणारी राज्य आहेत. अन्य राज्यांत हंगामी पद्धतीने उत्पादन होते. त्यामुळे उत्पादनवाढीची आणि पर्यायाने मंदीची झळ याच महाराष्ट्र व गुजरातला सर्वाधिक बसते. तसेच तेजीचा फायदाही या दोन राज्यांना होतो.  

टोमॅटोसाठी मल्चिंग, नळी, तारा, काठी असा सरंजाम लागतो. मालाच्या गुणवत्तेनिहाय एकरी उत्पादन खर्चात फरक दिसतो. पीक आणि स्ट्रक्चरवरील खर्च लक्षात घेता, मध्येच उत्पादन थांबवणे शक्य नसते. या अपरिहार्यतेमुळे टोमॅटो उत्पादकांची कोंडी होते. ही बाब लक्षात घेता नियंत्रित उत्पादन आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याने स्वयंनियंत्रण राखून क्षेत्र कमी ठेवले तर सर्वांनाच फायदा होतो. उदाहरणार्थ, एकाचवेळी दोन एकर लागवडीऐवजी एक एकर क्षेत्र दोन ते तीन टप्प्यांत लागवडीखाली आणणे आणि दरवर्षी त्यात सातत्य राखणे गरजेचे अाहे. याशिवाय, सर्वांच्या हितासाठी एकरी ५० ते ६० टनांच्या पुढे उत्पादकता जाऊ देऊ नये, कारण त्यामुळे बाजारात पुरवठा वाढून भाव पडतात, सर्वांचेच नुकसान होते.

(लेखक शेतीमाल बाजार अभ्यासक आहेत.)

Web Title: agrowon news agriculture tomato