मार्केट अभ्यासातून निवडली टोमॅटो- कारली पद्धती 

अभिजित डाके 
बुधवार, 12 जुलै 2017

वर्षभर मागणी राहणारी, एकरी उत्पादनवाढ देणारी व आर्थिकदृष्ट्या शक्यतो नुकसान न देणारी पिके म्हणून टोमॅटो व कारले यांची निवड सुधीर चव्हाण (येलूर, जि. सांगली) यांनी केली. मार्केटच्या अभ्यासाबरोबरच अर्थशास्त्राचाही तेवढाच अभ्यास केला म्हणून आज या पीकपद्धतीतील ते जाणकार झाले आहेत. केवळ तीस गुंठ्यांत प्रत्येक पीक घेणारी त्यांची ही हुशार पद्धती आहे.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सांगली जिल्ह्यात येलूर फाट्यापासून पश्‍चिमेला अवघ्या किलोमीटरवर येलूर (ता. वाळवा) गाव लागते. हे गाव ऊसशेतीसाठी प्रसिद्ध आहे. येथील भिकूजी श्रीपती चव्हाण यांची सुमारे सात एकर शेती. निचरा न होणारी मध्यम प्रतिची जमीन. पाण्याच्या कमतरतेमुळे पूर्वी एक एकरच शेती व तीही पारंपरिक केली जायची. कुटूंब मोठे असल्याने कसातरी खर्च भागायचा. 

मध्यंतरीच्या काळात भिकूजी यांना नोकरी लागली. प्रतिकूल परिस्थिती मुलांचे शिक्षण पूर्ण झाले.टप्प्याटप्प्याने संपूर्ण शेती बागायती केली. शेतीची जबाबदारी भिकूजी यांचे बंधू रामचंद्र आणि मुलांनी स्वीकारली.   

मामांंची शिकवणी 
भिकूजी यांचा मुलगा सुधीर हे सुमारे १८ किलोमीटरवरील शिराळा येथे जाऊन येऊन नोकरी करतात. 

मात्र सकाळी व संध्याकाळी ते शेतीत लक्ष घालतात. बंधू यशवंत व चुलतबंधू प्रसाद हे मात्र पूर्णवेळ शेतीकडेच लक्ष देतात. वाळवा येथील प्रताप कृष्णा पाटील हे त्यांचे मामा तीस वर्षांपासून भाजीपाला पिके घेतात. त्यांच्या सान्निध्यात राहिल्याने सुधीरदेखील या शेतीत पारंगत झाले. त्यातील बारकावे त्यांनी आत्मसात केले. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन हंगामाची निवड अशा बाबी शिकायला  मिळाल्या. 

टोमॅटो व कारले पीकपद्धती 
गेल्या सात वर्षांपूर्वी चव्हाण यांनी टोमॅटो व कारली या पिकांची निवड मार्केटच्या अभ्यासातून केली. आज त्यात सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. 
उसाचे क्षेत्र कायम ठेवले आहे. टोमॅटोची उन्हाळ्यात व आॅगस्ट अशी दोनवेळा लागवड. उन्हाळ्यात टोमॅटोचे दर वाढतात. त्याचा फायदा मिळतो. 
कोल्हापूर येथील शाहू मार्केटमध्ये जाऊन बाजारपेठेचा अभ्यास, तेथेच विक्री 
कारल्याची गुढीपाडव्यानंतर लागवड
दोन्ही पिकांसाठी प्रत्येकी ३० ते ३५ गुंठ्यांपर्यंत क्षेत्र  

अर्थशास्त्राचा केला अभ्यास 
कारले- सुधीर सांगतात की कारल्याचे ३० ते ३५ गुंठ्यांत १४ टनांपर्यंत उत्पादन मिळते. गेल्या चार वर्षांत त्याला किलोला ३० ते ४० रुपये दर राहिला आहे. अगदी १० टन उत्पादन मिळाले व दर किलोला २० रुपये मिळाला तरी दोन लाख रुपये उत्पन्न होते. त्यातून ७५ हजार रुपये किंवा थोडा अधिक खर्च वजा जाता एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. सद्यस्थितीत कारल्यास ४० ते ४५ रुपये दर सुरू आहे. यंदा आत्तापर्यंत ३५ गुंठ्यांतून सुमारे सहा टन कारल्याची विक्री झाली आहे. अद्याप ९ टन उत्पादनाची अपेक्षा असल्याचे सुधीर यांनी सांगितले. 

टोमॅटो 
टोमॅटोचेही कारल्याप्रमाणेच आहे. कारल्याएवढ्या क्षेत्रात २० टन उत्पादन मिळाले व दर किलोला १० रुपये राहिला तरी खर्च वजा जाता एक लाख रुपये शिल्लक राहतात. अर्थात काही वेळा केलेला खर्च सुध्दा भरून येत नाही अशी अवस्था येते. मात्र शेतीत नुकसान हे लक्षात घ्यावेच लागते असे सुधीर म्हणतात. 

ही पिकेच का निवडली? 
सुधीर सांगतात की दोन्ही पिकांतून एकरी उत्पादन वाढीला चांगला वाव असतो. 
वर्षभर मागणी राहते. 
अर्थशास्त्र शक्यतो नुकसानीत जाणारे ठरत नाही.  
ताजा पैसा हाती येतो. 

चव्हाण यांच्या शेतीची वैशिष्ट्ये 
संयुक्त कुटूंब पद्धती. त्याचबरोबर शेतीत घरातील किमान दोन व्यक्ती तरी पूर्णवेळ शेतीतील हव्यात असेच नियोजन.
पॉली मल्चिंग व बेड पद्धतीने लागवडीवर भर 
अलीकडे भाजीपाल्याच्या नव्या संकरीत जाती आल्या आहेत. त्यांची एकरी उत्पादनक्षमता चांगली आहे. त्यांच्या वापरावर अधिक भर. 
अधिकाधिक उत्पादन ए ग्रेडचे घेण्यावर भर. म्हणजे त्याला तसा दर मिळून उत्पन्न वाढते. 
कारल्याची लागवड पावसाळ्यात केली तर रोगांचा प्रादुर्भाव होतो. यामुळे उत्पादन कमी तर खर्चात वाढ होते. त्यामुळे ते उन्हाळ्यात घेण्यासाठी प्राधान्य 
पाच एकरांत ठिबक सिंचन. त्याद्वारेच फर्टिगेशन 
आडसाली उसाचे क्षेत्र दरवर्षी सुमारे अडीच एकर. 

कुटूंब राबते शेतीत 
टोमॅटो, कारली ही दोन्ही पिकं खूप संवेदनशील. त्यासाठी मनुष्यबळदेखील महत्त्वाचे असते. त्यामुळे घरातील सर्वच सदस्य शेतात राबतात. त्यातून खर्चात बचत होते. बाजारपेठ, वाहतूक, पॅकिंग, काढणी असे सर्व नियोजन सुसूत्र पद्धतीने केले जाते. 

आपण कोणतेही पीक घेत असताना त्याचे दर कधी कमी होतात, तर कधी वाढतात. हे ठरलेलेच आहे. मात्र अनेकवेळा दर अगदी घसरले तर काहीवेळा त्या पिकापासून दूर जाण्याची आपली प्रवृत्ती राहते.तसे न करता नियोजनात सुधारणा करावी. पिकात सातत्य ठेवावे. म्हणजे यश मिळायला अडचण येत नाही. 
सुधीर चव्हाण,  : ९४२१३७१४८५

Web Title: agrowon news agriculture tomato