गांधीग्राम झाले शेतकरी उद्योजकांचे गाव

गोपाल हागे
गुरुवार, 6 जुलै 2017

अकोला जिल्ह्यातील गांधीग्राम हे गाव महाराष्ट्रभर आपली ओळख तयार करते आहे. याचे खास कारण म्हणजे या गावात तयार होणारी गूळपट्टी (चिक्की). कधीकाळी शेतीवर आधारित असलेल्या गावात आता या पूरक व्यवसायामुळे आर्थिक संपन्नता वाढीस लागली आहे. घरोघरी रोजगार तयार झाला आहे. एखादा व्यवसाय गावाच्या संपूर्ण विकासाला कसा पोषक ठरू शकतो याचे गांधीग्राम हे उदाहरण सांगता येईल. 

अकोला तालुक्‍यातील गांधीग्राम गाव ४७ वर्षांपूर्वीपर्यंत म्हणजेच १९७० पर्यंत वाघोली म्हणून ओळखले जायचे. परंतु या वर्षी गावाचे नाव गांधीग्राम असे ठेवल्याचे सांगितले जाते. नावातील "गांधी'' हा संदर्भ महात्मा गांधी यांच्याशी जुळलेला आहे. हे गाव विदर्भातील प्रमुख नदी पूर्णाच्या काठी वसले आहे. चौदा फेब्रुवारी, १९४८ मध्ये महात्मा गांधी यांच्या अस्थींचे विसर्जन या ठिकाणी करण्यात आले होते. गावात १९५० मध्ये गांधीजी यांचा उंच पूर्णाकृती पुतळा उभारला असून, देशात गांधीजींचे असे मोजकेच पुतळे असल्याचे गावकरी सांगतात. गावाला भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे यांनीही भेट दिली आहे. गावाला लागून असलेल्या पूर्णा नदीवर इंग्रजकालीन बांधलेला पूल अद्यापही वापरात आहे. गांधीजींच्या अशा प्रकारच्या संपर्कामुळे वाघोलीचे गांधीग्राम झाले. हे गाव १९७० मध्ये आदर्शग्राम झाले तेव्हा कै. यशवंतराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते.

खारपाण पट्ट्याचा अभिशाप
अकोला-अकोट मार्गावर वसलेले गांधीग्राम पूर्णा खोऱ्यात येते. या नदीमुळे अनेक गावे सुपीक बनली. मात्र दुर्दैवाने गांधीग्रामची शेती क्षारपड स्वरूपाची आहे. हे गाव खारपाणपट्ट्यात मोडते. परिणामी, पावसावर आधारित शेती करावी लागते. खरीप हंगाम हाच प्रामुख्याने गावच्या अर्थकारणाचा अनेक वर्षे आधार होता. सोयाबीन, कपाशी, तूर, मूग, उडीद ही पारंपरिक पिके घेतली जातात. पाऊस व्यवस्थित झाला तर कपाशी, सोयाबीनचे उल्लेखनीय उत्पादन घेणारे अनेक शेतकरी भागात आहेत. पीक पद्धतीत मर्यादा असल्याने आज गावाने पूरक व्यवसायांवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे.

गांधीग्रामची प्रसिद्ध गूळपट्टी
गावात गूळपट्टीचा (चिक्की) प्रमुख व्यवसाय आहे. त्यालाही एक इतिहास आहे. ब्रिटिश काळात येथील पूर्णा नदीवर पुलाची निर्मिती झाली. या बांधकामावेळी शेकडो मजूर होते. त्या वेळी त्यांना ऊर्जा देण्यासाठी गूळ-शेंगदाणे दिले जात. येथील एका व्यावसायिकाने गूळ व शेंगदाण्याचे मिश्रण करून त्याची विक्री सुरू केली. याला खूप प्रतिसाद मिळाला. त्यानंतर अनेक वर्षे गावात किरकोळ स्वरूपात हा व्यवसाय सुरू होता.

अढाऊ यांनी केले सीमोल्लंघन 
गूळपट्टीला व्यावसायिक स्वरूप देण्याचे श्रेय गावातील उत्साही व्यक्तिमत्त्व सुखदेवराव अढाऊ यांना द्यायला हरकत नाही. सन २००१ पासून गावात गूळपट्टीचा व्यवसाय जोर धरू लागला. छोटे-छोटे उत्पादक तयार होऊ लागले. गावात गूळपट्टी बनवून बस स्थानकावर विकली जायची. यात अढाऊ यांचा महत्त्वाचा पुढाकार होता. छोट्या-मोठ्या यात्रा, उरसात ते गूळपट्टी नेऊन विकायचे. सन २०१३ मध्ये या व्यवसायातील महत्त्वाचा बदल झाला. अढाऊ यांनी व्यवसायाचे सीमोल्लंघन करण्यासाठी त्याचा विस्तार करण्याचे ठरविले. गूळपट्टीचे गावागावांत मार्केटिंग करण्यासाठी चारचाकी घेतली. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. अढाऊ यांच्यापासून प्रेरित होऊन अन्य व्यावसायिकांनीही गाड्या घेऊन व्यवसाय सुरू केला. राज्यातील प्रसिद्ध यात्रा, मोठ्या गावांमध्ये ही गूळपट्टी आज अढाऊ पाठवतात. त्यांनी विक्रेत्यांची साखळी तयार केली आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा अशा विविध राज्यांत गांधीग्रामच्या गूळपट्टीचा लौकिक तयार होत आहे.

दिवसाला ५० क्विंटल निर्मिती 
कधीकाळी शेतीवर अवलंबून असलेल्या गावातील किमान ५० कुटुंबे आता पूर्णवेळ गूळपट्टी व्यवसायात गुंतले आहेत. घरातील एखादा सदस्य शेती पाहतो. उर्वरित सर्वजण गूळपट्टी तयार करतात. सुमारे दीडशे जणांना वर्षभर रोजगार मिळू लागला. अनेकजण दुचाकीवरून १५ ते २० किलो गूळपट्टीची गावोगावी जाऊन विक्री करतात. आज रोजी गांधीग्राम गावात ५० क्विंटल गूळपट्टी तयार होते. किलोला १२० रुपये दर असतो. महिन्याला दीड कोटींपेक्षा अधिक तर वर्षाला १५ कोटींहून अधिक उलाढाल गावात या व्यवसायातून होते. 

व्यवसायातून समृद्धी 
व्यवसायातून गावात आर्थिक समृद्धीचे वारे वाहू लागले. कुणाचे सिमेंटचे घर बनतेय, कुठे घरासमोर दुचाकी-चारचाकी उभी राहते आहे. बस स्थानकावर जागोजागी हॉटेल्स उभी राहिली असून, प्रत्येकजण "गूळपट्टी''च्या व्यवसायात मग्न असतो. दिवसाला २५ क्विंटलपेक्षा अधिक गूळ तर १५ क्विंटलपर्यंत शेंगदाणे लागतात. गूळ शक्यतो कोल्हापूर, लातूरहून येतो. 

सामाजिक एकोपा 
गांधीग्राममध्ये सर्व जाती-धर्मांचे लोक राहतात. गूळपट्टी व्यवसायाने या सर्वांना एकत्र आणले. त्यातून चांगल्या प्रकारे रोजगारनिर्मिती झाली आहे. सर्वजण एकमेकांना व्यवसायासाठी कुठलेही साहित्य लागले, तर त्याची देवाणघेवाण करतात. बाहेरगावी गेलेल्याला वाहनाची अडचण आली तर दुसरा आपले वाहन घेऊन जातो. 

सर्वांगीण विकासालाही चालना
गावात पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा योजना तयार झाली. आता गल्लोगल्ली सिमेंटचे रस्ते बनविले जाणार आहेत. काही काम पूर्ण झाले आहे. गावच्या शिवारात बांधबंदिस्ती करण्यात आली आहे. पदरी पैसे आल्याने शेतकऱ्यांनी पूर्णा नदीपात्रातून दोन-तीन किलोमीटरपर्यंत पाइपलाइन करून गोडे पाणी शेतात नेले. गावशिवारात २० शेततळी तयार झाली आहेत. यातून पिकाला हंगामी पाण्याची व्यवस्था केली जाते. गरजेच्यावेळी एक-दोन पाणी पिकाला दिले तर उत्पादकता वाढते हे दिसून आले. खारपाण जमीन असूनही या भागात कापसाचे एकरी १२ ते १५ क्विंटलपर्यंत, तर सोयाबीनचे सात ते आठ क्विंटल  उत्पादन काढणारे शेतकरी येथे आहेत.  

गांधीग्राममध्ये रस्ते, नाले-सांडपाण्याचे व्यवस्थापन, आरोग्य सुविधा अशा पायाभूत गोष्टी करण्याकडे प्राधान्य आहे. लवकरच सांडपाणी नाल्याचे सरळीकरण, आरोग्य उपकेंद्राची मंजूर झालेली इमारत उभारणी ही कामे करणार आहेत. गूळपट्टी व्यवसायाद्वारे आमचे गाव नकाशावर पुढे येत आहे.
- सुषमा शरद ढाकरे, सरपंच, गांधीग्राम, ता.जि. अकोला

आमच्या शेतीप्रधान गावात पूरक व्यवसाय म्हणून गूळपट्टी निर्मितीने आपले पाय घट्ट रोवले आहेत. घरोघरी ही उद्योगशीलता वाढते आहे. या ठिकाणावरून राज्याच्या विविध शहरांत दर्जेदार गूळपट्टी पाठवली जाते. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी प्रयत्नशील आहोत.
-सुखदेवराव अढाऊ, गूळपट्टी उद्योजक, गांधीग्राम, ता.जि. अकोला

गावातील रस्ते चांगले झाले. गावात रोजगाराच्या संधी वाढत आहेत. नवीन व्यवसाय विकासाला पोषक ठरत आहेत.  
- नंदकिशोर विनायकराव नाहटे, मुख्याध्यापक, महात्मा गांधी विद्यालय, गांधीग्राम

मी १९९२ पासून गावाला पाहत आहे. गेल्या २५ वर्षांत गाव खूप बदलले आहे. गूळपट्टी व्यवसाय तेव्हा जेमतेम होता. आता गावातील गूळपट्टी पाच राज्यांत जाते. एक जण उत्पादनात असतो तर दुसरा विक्री करतो. त्यातून गावाचा आर्थिक विकास होत आहे. आजूबाजूच्या खेड्यांसाठी ही बाजारपेठ तयार होत आहे.
-विलास सुखदेव झामरे, गांधीग्राम, जि. अकोला

 सुखदेवराव अढाऊ, ९०११७३९५८८

Web Title: agrowon news akola news agriculture