बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना कर्ज देणार 

बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना कर्ज देणार 

मुंबई - शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील उपलब्ध जागेवर बांबू उत्पादन घ्यावे, यासाठी नाबार्ड आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्याकडून शेतकऱ्यांना कर्ज मिळावे, यासाठी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाने प्रयत्न सुरू केले आहेत.

बांबू  प्रजाती ही बहुउपयोगी असून शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातील उपलब्ध जागेवर बांबू लागवड केल्यास त्यांना अतिरिक्त लाभ मिळू शकतो. याच कारणासाठी शासनाने बांबूला वन विभागाच्या वाहतूक परवान्यातून मुक्त केले आहे. यामुळे आदिवासी तसेच इतर युवकांनाही मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल. उत्पन्नवाढीतून त्यांच्या जीवनमानात सुधारणा होऊ शकेल. यासाठी बांबू विकास मंडळ प्रयत्न करत आहे.

विदर्भातील एकूण ८०० शेतकऱ्यांनी १०३५ हेक्टर जमीन बांबू पिकासाठी वापरण्यास परवानगी दिली आहे. शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध झाले, तर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात बांबूची लागवड करता येईल. बांबू विकास मंडळ शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी तांत्रिक मदत करणार आहे. शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता प्रदान करणारा बांबू नैसर्गिक प्रतिकूल परिस्थितीतही तग धरून राहतो. 

पाच प्रजातींची करणार लागवड
रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी ३ हजार ट्रक मंगा बांबू प्रजातीची विक्री होते. बांबू विकास मंडळाने बंगळूर, जबलपूर, रायपूर, येथील टिश्युकल्चर रोपे मिळविण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून, तेथील संस्थांनी रोपे पुरविण्याचे मान्य केले आहे. मंडळाने बांबूच्या बल्कोआ, ब्रारडीसी, नुतन्स, अस्पेर आणि तुलदा या पाच प्रजातींची लागवड करण्याचे ठरवले आहे, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com