पक्षघाताने ४० जनावरांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

भोर, जि. पुणे (सकाळ वृत्तसेवा) - अतिदुर्गम भागातील भुतोंडे खोऱ्यातील गुहिणी (ता. भोर, जि. पुणे) येथे १५ दिवसांत सुमारे ४० जनावरे अशक्तपणा व पक्षघाताच्या आजाराने दगावली आहेत. यात गाय, बैल व वासरांचा समावेश आहे. 

भोर, जि. पुणे (सकाळ वृत्तसेवा) - अतिदुर्गम भागातील भुतोंडे खोऱ्यातील गुहिणी (ता. भोर, जि. पुणे) येथे १५ दिवसांत सुमारे ४० जनावरे अशक्तपणा व पक्षघाताच्या आजाराने दगावली आहेत. यात गाय, बैल व वासरांचा समावेश आहे. 

मागील आठवड्यात गुहिणी येथील संपत धनावडे यांची एक गाय, एक बैल, गणपत गुहिणे यांचा एक बैल, शिवराम वऱ्हे यांची चार जनावरे, रघुनाथ गुहिणे यांची दोन जनावरे, रामाजी उफाळे यांचा एक बैल, विठ्ठल गुहिणे यांची तीन जनावरे, गणेश रेणुसे यांची तीन जनावरे, राम धनावडे यांची चार अशी जनावरे दगावली आहेत. गावात आजपर्यंत सुमारे ४० जनावरे या रोगाला बळी पडल्याची माहिती नथू गुहिणे यांनी दिली. पशुगणनेनुसार गावात २१२ जनावरे असून, सव्वाशे ते दीडशे जनावरे जिवंत आहेत.

दरम्यान, शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांनी गुरुवारी (ता. २४) गुहिणी येथे भेट दिली. पशुतज्ज्ञांनी अत्यवस्थ असलेल्या तीन जनावरांवर उपचार केले. बाधित जनावरांच्या रक्ताचे व लाळेचे नमुने तपासणीसाठी त्यांनी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

याबाबत भोर येथील तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन देशपांडे म्हणाले, की ‘सह्याद्री’च्या घाटमाथ्यावरील गुहिणी हा अतिवृष्टीचा प्रदेश असल्याने येथील गवत पौष्टिक नसते. जनावरांच्या आहारात कॅल्शिअम व फॉस्फरसचा अभाव असतो. यामुळे अशक्तपणामुळे जनावरे दगावण्याची शक्‍यता आहे. करंदी (ता. भोर) येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. मांगडे यांनी नऊ ऑगस्टपासून गावात उपचार सुरू केले आहेत. जनावरांच्या रक्ताचे व लाळेचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून, अहवाल प्राप्त होताच सध्याच्या उपचारपद्धतीत बदल केला जाईल. 

जनावरांना झाला पक्षघात 
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉ. मिलिंद मेश्राम, डॉ. चंद्रशेखर मोटे आणि डॉ. अजित माळी यांनी गुहिणी गावाला भेट दिली. या गावातील जनावरांच्या मृत्यूच्या कारणांबाबत डॉ. चंद्रशेखर मोटे म्हणाले, की डोंगराळ भागातील जनावरांना पोषक आहार मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरसची कमतरता होऊन रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. गाव परिसरात मृत्युमुखी पडलेली जनावरे जंगलात किंवा मोकळ्या माळावर टाकली जातात. या मृत जनावरांच्या हाडात जिवाणूंच्या प्रादुर्भावामुळे विष तयार झालेले असते. माळभाग, जंगलात जनावरे चरताना चाऱ्याबरोबरीने  मृत जनावरांची हाडे काहीवेळा चघळतात. या हाडात तयार झालेले विष शरीरात पसरून १२ ते २४ तासांत जनावरांना मागाच्या पायाचा पक्षघात होतो. जनावरे अशक्त होतात. वेळेत उपचार न मिळाल्याने तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याने जनावरे मृत्युमुखी पडलेली आहेत.

Web Title: agrowon news bhor animal