कृषिमंत्र्याच्या जिल्ह्यात ‘दगड’ पेरणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन
पीककर्ज नाही; बॅंकांकडून दहा हजारही मिळत नाहीत
खुटपुरी येथे शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध 

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘स्वाभिमानी’चे आंदोलन
पीककर्ज नाही; बॅंकांकडून दहा हजारही मिळत नाहीत
खुटपुरी येथे शेतकरीविरोधी धोरणांचा निषेध 

बुलडाणा - खरीप हंगामातील पेरणी तोंडावर अालेली असताना शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यात असंख्य अडचणी येत अाहेत. शासनाने तातडीने १० हजार रुपये देण्याचे जाहीर केले. परंतु अद्याप एकही रुपया शेतकऱ्याला मिळालेला नाही. पेरणीसाठी शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत. याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शनिवारी (ता. १७) कृषिमंत्र्यांच्या खामगाव (जि. बुलडाणा) तालुक्यातील खुटपुरी गावात ‘दगड’ पेरणी अांदोलन झाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा कार्यकर्ते श्याम अवथळे यांच्या नेतृत्वात गोपाल काकडे यांच्या शेतात हे लक्षवेधी अांदोलन करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाचा निषेध केला. राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीची प्रक्रिया होईपर्यंत दहा हजार रुपये देणार असल्याचे सरकारने सांगितले. मात्र शेतकऱ्याला अजून एक रुपयाही मिळाला नसल्याने बी- बियाणे आणि रासायनिक खते घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. अार्थिक अडचणीत शेतकरी सापडला अाहे. शासन केवळ घोषणा करीत अाहे. याचा निषेध नोंदविण्यासाठी खामगाव तालुक्यातील खुटपुरी येथे गोपाल काकडे या शेतकऱ्याच्या शेतात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ‘दगड’पेरणी आंदोलन केले आहे. 

या वेळी श्रीकृष्ण काकडे, विष्णू जुमळे, मारोती बोचरे, स्वाती काकड़े, ममता काकडे, संगीता काकडे, शोभा बाठे, शारदा डवंगे, शिला डवंगे, पांडुरंग घोडसे, दशरथ घोडसे, सुनील घोरपडे, गजानन गवळी, मोहन अढायके, तुकाराम बोचरे, पांडुरंग काकडे, देवराम घोरपडे, श्रीराम घोरपडे, दीपक अढायके, विकी बुलबुले, प्रवीण गवळी, प्रशांत बोचरे आदी शेतकरी व महिला उपस्थित होत्या.
 

...तर बँकांवर रुमणे मोर्चा 
शासनाने घोषणा करूनही जर बँका शेतकऱ्यांना पैसे द्यायला तयार नसतील तर स्वाभिमानी शेतकरी संघटना याचा गांभीर्याने विचार करणार अाहे. अशा प्रत्येक बँकेच्या शाखेवर यापुढे शेतकऱ्यांचा रुमणे मोर्चा काढू, असा इशारा स्वाभिमानीचे कार्यकर्ते श्याम अवथळे यांनी दिला आहे.

Web Title: agrowon news dagad perani agitation