मार्केटिंगची हुशारी दाखवत विकली हातोहात डाळ

विनोद इंगोले
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

चिंचोली बु. (ता. अंजनगावसूर्जी, जि. अमरावती) येथील अमोल घोगरे या युवकाने डाळनिर्मिती व्यवसाय सुरू केला. मात्र ‘मार्केटिंग’ची वेगळी पद्धत अवलंबिली. थेट गावात जाऊन शेतकऱ्यांकडून कच्ची तूर वा हरभरा घ्यायचा. त्या बदल्यात पैसे स्वरूपात व्यवहार न करता थेट ब्रॅंडेड डाळ विकायची. या प्रकारे यंदा १८०० क्विंटल डाळीची विक्री करण्यात घोगरे यशस्वी झाले आहेत.  

अमरावती जिल्ह्यात चिंचोली बु. (ता. अंजनगावसूर्जी) येथे अमोल घोगरे यांची सुमारे १३ एकर शेती आहे. त्यात कांदा, कापूस, सोयाबीन अशी पिके असतात. आर्थिक उन्नतीसाठी अमोल यांनी शेतीला पूरक व्यवसायाची जोड द्यायचे ठरवले. त्यांचा पिंडच व्यावसायिक असल्याने त्यातील नव्या बाबी शोधण्याचा प्रयत्न नेहमीच राहिला. त्यातूनच पुढे जाण्याची दिशा मिळाली व त्यातून आत्मविश्वास वाढावा एवढे यशही पहिल्या प्रयत्नात मिळवले.  

डाळ मिलची कल्पना 
मार्केट सर्वेक्षणातून अमोल यांनी डाळनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला.
आपल्या आईच्या नावाने म्हणजे ‘इंदू डाळ मिल’ असे केले नामकरण. 

फुटाणे व्यापाऱ्याची प्रेरणा
डाळनिर्मिती करून नेहमीच्या पद्धतीने विक्री हा प्रकार अमोल यांना पटत नव्हता. त्यांच्या डोळ्यासमोर एका फुटाणा व्यापाऱ्याचे उदाहरण होते. हा व्यापारी गावोगावी जायचा. ग्रामस्थांकडून हरभरा घ्यायचा व त्या बदल्यात फुटाणे द्यायचा. ही पद्धत डाळविक्रीत वापरायची का? यावर अमोल यांनी खूप विचार केला. अखेर ही संकल्पना राबवायचे ठरवले. 

सुरवातीचे संघर्ष 
बॅंकेने नाकारले, स्वतःच उभारला पैसा 
चिंचोली गावात राष्ट्रीयकृत बॅंकेकडून पीककर्जाची उचल अमोल करतात. पीककर्जाची नियमीत परतफेड करीत असताना देखील बॅंकेने अमोल यांच्या डाळमिल उद्योगाला कर्ज देण्यास नकार दिला. तब्बल चार महिने कर्जासाठी बॅंकेचे उंबरठे झिजविले. मात्र बॅंक व्यवस्थापनाने प्रतिसाद दिला नाही. निराश न होता अमोल यांनी मग स्वतःकडील भांडवल, इतरांकडून उचल अशा प्रकारे २५ लाख रुपये उभे केले. अमोल यांचा उत्साह पाहता ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अंबादास मिसाळ तसेच कृषी पणन तज्ज्ञ गणेश जगदाळे यांनी अनुदानासाठी मदत केली.   

ग्रेडिंग व्यवसायात अाजमावले नशीब 
सुरवातीला डाळींच्या क्लिनिंग-ग्रेडिंग व्यवसायात नशीब जमावले. पन्नास किलोच्या बारदान्यात माल भरून तो विकला जायचा. शेतकरी व व्यापारी अशा दोघांसाठी या सुविधेचा फायदा होता. प्रक्रियेवरील खर्च वजा जाता सरासरी तीन टक्‍के उत्पन्न यातून मिळायचे. काही व्यापाऱ्यांकडून अशा मालाला मागणी असते. वर्षाला तूर, हरभरा, सोयाबीन यांचे प्रत्येकी १०० टनांपर्यंत क्‍लिनिंग ग्रेडिंग व्हायचे. यंदाही या बाबीवर भर दिला आहे. 

शेती 
घोगरे कुटुंबीयांची १३ एकर शेती आहे. यात कांदा, सोयाबीन, कपाशी, तूर यासारखी पिके घेतली जातात. सिंचनासाठी दोन बोअरवेल्स आहेत. खारपाणपट्टयाच्या सीमेवर असल्याने खारे पाणी आहे. त्यामुळे पिकांना पाणी देण्यावर मर्यादा असते.  

शेतकरी कंपनी
गावात पारंबी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीची उभारणी झाली आहे. पाच जणांचे संचालक मंडळ त्यासोबतच साडेतीनशे भागधारक आहेत. अमोल कंपनीचे संचालक आहेत. 
 : अमोल घोगरे, ९४०४३३८७३२

मार्केटिंग पद्धतीतून  काय साधले?  
शेतकऱ्यांना एक क्‍विंटल तुरीच्या बदल्यात ६४ किलो डाळ मिळायची. उर्वरित ३६ टक्के वेस्टेज किंवा अन्य घटक हाच अमोल यांचा फायदा.
यात शेतकऱ्यांनाही थेट जागेवर डाळ मिळाली. गावापासून दूर असलेल्या ठिकाणी डाळमिलपर्यंत जाण्याची गरजच उरली नाही. 

एक क्विंटल तूर- त्या बदल्यात   ६४ किलो तूरडाळ 
 एक क्विंटल हरभरा- त्या बदल्यात ७३ किलो हरभराडाळ 
    (पैशांचा व्यवहार नाही)
    शेतकऱ्यांचा मिळाला चांगला प्रतिसाद
 त्यातूनच यंदाच्या हंगामात एकूण १८०० किलो डाळीची झाली विक्री  

Web Title: agrowon news Dal amol ghogare